सातारा : विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सध्या सुरू आहे. त्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. एसटीची आर्थिक परिस्थिती वाईट आहे, एसटीचा संप चर्चेतून सुटू शकतो, इतर राज्यातील वेतन पाहता पगारवाढीच्या पर्यायावर विचार करता येईल, असे पवार यांनी म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यानिमित्त शरद पवार महाबळेश्वर येथे आले होते. यावेळी ते बोलत होते. तसेच विलिनीकरणाचा हा मुद्दा सध्या कोर्टात आहे, त्यामुळे यावर बोलणार नाही, असे पवार यांनी सांगितले. एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती वाईट आहे. एसटीचे अर्थकारण कसे सुधारावे, यावर विचार करण्याची गरज आहे, असे स्पष्ट करत एसटीचा संप चर्चेतूनच सुटू शकतो, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज महाबळेश्वर येथे व्यक्त केला.
पत्रकार परिषदेत ते म्हणाले, यावर्षी राज्य सरकारला एसटीचा पगार द्यावा लागला. एसटी महामंडळाला राज्य सरकारने आर्थिक मदत करावी, अशी स्थिती यापूर्वी कधीच नव्हती. एसटीचे अर्थकारण कसे सुधारावे, यावर विचार करण्याची गरज आहे. विलिनीकरणाचा मुद्दा हा उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे यावर भाष्य करता येणार नाही, असेही ते म्हणाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
एसटी कर्मचार्यांच्याबाबत सहानुभूतीने विचार व्हावा हे योग्यच आहे. मात्र या प्रश्नातील आर्थिक बाबींचाही विचार करणे गरजेचे आहे. एखादा निर्णय घेतल्यानंतर त्याचे परिणाम काय होतील, याचाही सरकारला विचार करावा लागतो. महाराष्ट्र सरकारने अन्य राज्यांतील एसटी कर्मचार्यांच्या वेतनाचा अभ्यास करावा, असे आवाहनही शरद पवार यांनी केले.
* शशिकांत शिंदेंनी गांभीर्याने घेतले नाही
सातारा जिल्हा बॅंकेत आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवलेली नाही. जिल्हा बॅंकेची निवडणूक स्थानिक पातळीवरची होती. सांगलीत जिल्हा बॅंकेचे निकाल चांगले लागले आहेत. या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांचा एका मताने पराभव झाला. शशिकांत शिंदे यांनी जिल्हा बँकेची निवडणूक गांभीर्याने घेतली नाही, ही निवडणूक गांभीर्याने घेणे गरजेचे होते, असेही शरद पवार यांनी सांगितले.
पुढील तीन ते चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होवू शकतात, असे संकेतही त्यांनी यावेळी दिले. निवडणुकांच्या तयारीसाठी तरुण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी हा मेळावा होता, असेही त्यांनी यावेळी सांगितले.