नवी दिल्ली : एलपीजी सिलेंडर स्वस्त होण्याच्या अपेक्षेला आज झटका बसला. गॅस सिलेंडर शंभर रुपयांनी महाग झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे ही वाढ केवळ व्यावसायिक सिलेंडरच्या दरांमध्ये झाली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीत व्यावसायिक सिलेंडर २१०० रुपयांच्या पुढे आहे. तर मुंबईत १९ किलोचा सिलेंडर २०५१ रुपयांचा झाला आहे.
पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता मोदी सरकार पेट्रोल, डिझेलप्रमाणे गॅसही स्वस्त करेल, अशी लोकांना अपेक्षा होती. पण या अपेक्षावर पाणी फेरले आहे.
देशात महागाईचा भडका दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. रोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीने हैराण झालेल्या नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री लागली आहे. कारण वर्षाच्या शेवटच्या महिन्यात एलपीजी सिलेंडरमध्ये भरघोस वाढ झाली असल्याने जनतेला मोठा झटका बसला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ही वाढ केली आहे. गेल्या महिन्यात व्यावसायिक सिलेंडर २६६ रुपयांनी महागला होता, आता त्यात १००रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
दिल्लीत व्यावसायिक सिलेंडर २१०० रुपयांच्या पुढे आहे. दोन महिन्यांपूर्वी तो १७३३ रुपये होता. मुंबईत १९ किलोचा सिलेंडर २०५१ रुपयांचा झाला आहे. त्याचवेळी कोलकातामध्ये १९ किलोचा इंडेन गॅस सिलेंडर २१७४.५० रुपये झाला आहे. आता चेन्नईमध्ये १९ किलोच्या सिलेंडरसाठी २२३४ रुपये मोजावे लागणार आहेत.
तुम्हाला तुमच्या शहरातील गॅस सिलिंडरच्या नवीन किमती जाणून घ्यायच्या असतील, तर तुम्ही सरकारी तेल कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर ते पाहू शकता. यासाठी तुम्हाला आयओसीएलची (IOCL) चे वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर, वेबसाइटवर राज्य, जिल्हा आणि वितरक निवडा आणि नंतर शोध वर क्लिक करा. यानंतर गॅस सिलिंडरच्या किमती तुमच्या समोर येतील.