सोलापूर : बाळे येथील वर्धमान रेसिडेन्सी येथील राहत्या घरी ऑर्केस्ट्राबारमध्ये काम करणाऱ्या वादकाने पत्नीच्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पत्नीला समजल्यावर तिच्यावर दु:खाचा डोंगरच कोसळला.
ही घटना सोमवारी (ता. २९) सायंकाळी ६.३० वाजता उघडकीस आली. हेमंत सुधाकर भतांबरे (वय ४५, रा. वर्धमान रेसिडेन्सी बाळे, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या वादकाचे नाव आहे. हेमंत भतांबरे हे दुपारी वरच्या मजल्यावरील खोलीत गेले. आतून कडी लावून त्यांनी पत्नीच्या साडीने पंख्याला गळफास घेतला.
पत्नीला ते रुममध्ये झोपले असतील असे वाटले; मात्र बराच वेळ झाल्याने त्या वर गेल्या. बाहेरून आवाज दिला मात्र आतून प्रतिसाद मिळत नव्हता. पत्नीने आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या मदतीने दाराला छिद्र पाडले आणि आतील कडी काढली. दार उघडताच आत त्यांना पती पंख्याला लटकलेला दिसला. याची माहिती फौजदार चावडी पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. याची नोंद सिव्हिल पोलीस चौकीमध्ये झाली आहे.
हेमंत भतांबरे हे ऑर्केस्ट्राबारमध्ये पियानो वाजवण्याचे काम करत होते. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून ऑर्केस्ट्राबार बंद आहे. त्यामुळे त्याला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण जात होते. बाळे येथे त्याने घर घेतले होते. त्यासाठी होम लोन केले होते. काम बंद असल्यामुळे बँकेचे हप्ते भरणे शक्य होत नव्हते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या प्रकारामुळे हेमंत भतांबरे हे गेल्या काही महिन्यांपासून अस्वस्थ होते. सध्या काम नसल्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली आहे, अशी प्राथमिक माहिती हेमंत भतांबरे यांच्या पत्नीने पोलिसांना दिल्याचे सांगितलंय.
* मंगळवेढ्यात एका वृद्ध महिलेचे ४१ हजाराचे दागिने पळविले
मंगळवेढा – मावशी तुम्हाला आईने चहासाठी बोलावले आहे, अशी थाप मारून दुचाकीवरील एका भामट्याने ७५ वर्षीय वृद्ध महिलेचे ४४ हजाराचे दागिने काढून घेऊन पसार झाला. ही फसवणुकीची घटना मंगळवेढा येथे शनिवारी (ता. २७) दुपारच्या सुमारास घडली.
सुमन नरसु वाकळे (वय ७५ रा.ढवळस) या शनिवारी दुपारी मंगळवेढा येथील महाराष्ट्र बँक जवळ थांबल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या एका अनोळखी इसमाने मावशी, कुठे चालली मला ओळखले नाही का. आईने तुला चहासाठी बोलावले. अशी थाप मारून त्यांना दुचाकीवर बसवून घेतले.
मरवडे रस्त्यावरून पुढे पेट्रोल पंपा जवळ नेऊन त्यांच्या अंगावरील १५ ग्रॅम सोन्याचे दागिने काढून घेऊन पसार झाला. या घटनेची नोंद मंगळवेढा पोलिसात झाली फौजदार शेटे पुढील तपास करीत आहेत .