सोलापूर : बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहर व जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर ओसरणार असून उद्या रविवार, ५ डिसेंबरपासून उघडीप मिळून येणाऱ्या दिवसात थंडीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.
गुजरातच्या किनारपट्टीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून दुसरीकडे बंगालच्या उपसागरात जेवाद चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टीवर येत्या दोन दिवसात धडकणार आहे. परंतु याचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होण्याची शक्यता नसल्याचेही सांगण्यात आले.
नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागात कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. ऐन हिवाळ्यात झालेल्या या अवकाळी पावसाचा द्राक्ष, डाळिंब, कांदा व भाजीपाला पिकांना फटका बसला आहे. ढगाळ हवामान आणि धुक्याचे प्रमाण वाढल्याने जवळपास सर्वच शेती पिकांवर अनिष्ट परिणाम झाला आहे.
सोलापूरसह अहमदनगर सांगली, सातारा, नाशिक, धुळे, नंदूरबार येथे पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. परिणामी येत्या काळात पालेभाज्यांच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. हा पाऊस ज्वारीला पोषक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. ‘ला निनो’ सक्रिय झाल्याने डिसेंबर अखेर ते मार्चपर्यंत आणखी अवकाळी पावसाची शक्यता असल्याचेही हवामान तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. यंदा अतिवृष्टी झाल्याने अगोदरच खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. अशातच रब्बी हंगामात अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दक्षिण व उत्तर सोलापूर, अक्कलकोटसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे गुरुवारी फळबागांसह खरीप व रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. द्राक्ष, डाळिंब पिकांना या पाऊस आणि ढगाळ हवामानाचा मोठा फटका बसल्याने शेतकरी धास्तावले आहेत. पावसामुळे भाजीपाल्यांचे नुकसान झाल्याने दरवाढीचे चटके नागरिकांना सोसावे लागणार आहेत.
गेल्या एक आठवड्यापासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. मात्र २ डिसेंबरला मोठा पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यानुसार गुरूवारी पहाटे शहरात सुरू झालेला पाऊस सकाळी साडेअकरापर्यंत चालूच होता. दुपारी काही काळ उघडीप दिल्यानंतर पुन्हा पावसाची रिपरिप सुरूच होती. रात्री दहानंतर पावसाचा जोर पुन्हा वाढला होता.
दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, वैराग, मोहोळ, मंगळवेढा, सांगोला, करमाळा, माळशिरस, माढा आणि पंढरपूर या तालुक्यांत जोरदार पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. फुलोरा अवस्थेतील द्राक्ष, डाळिंब या पिकांची मोठी हानी झाली असून पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
काढणीस आलेला कांदा, तूर या पिकांवरही अवकाळी पावसाचा परिणाम झाला आहे. सततच्या पावसाने रब्बी ज्वारी आडवी झाली असून गव्हावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे. अतिपावसामुळे हरभरा पीकही हातचे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.