सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यात शेतात पिकावर फवारणी करताना तोंडात विषारी द्रव जाऊन बेशुद्ध झालेले रमेश दगडू गवळी हे उपचारादरम्यान शुक्रवारी (ता.३) सकाळी शासकीय रणालयात मरण पावले.
ते २९ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास स्वतःच्या शेतात पिकावर विषारी द्रवाची फवारणी करीत होते. डब्याचे झाकण तोंडाने उघडत असताना विषारी द्रव पोटात गेल्याने ते विशुद्ध झाले होते. त्यांना रामेश्वर गवळी (भाऊ) यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
* नशेत पेटवून घेतलेल्याचा रुग्णालयात मृत्यू
कामती शिवारातील घोडकेवस्ती येथे स्वतःच्या शेतात दारूच्या नशेत पेटवून घेतल्याने जखमी झालेला नारायण देविदास कोकरे (वय ४५ रा. काडादीचाळ, स्टेशन जवळ) हा शासकीय रुग्णालयात उपचार घेताना गुरुवारी रात्री मरण पावला. गुरुवारी ( ता.२) सकाळी त्यांनी स्वतःच्या शेतात दारूच्या नशेत अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले होते. त्याला भाजलेल्या अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तो रात्री मरण पावला. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली असून सहायक फौजदार पवार पुढील तपास करीत आहेत .
* ति-र्हे येथे वृद्ध महिलेस मारहाण
ति-र्हे (ता. उत्तर सोलापूर) येथे पोलिसात केलेली केस मागे घे म्हणून विटाने केलेल्या मारहाणीत सावित्रीबाई किसन गायकवाड (वय ७५) आणि त्यांचा मुलगा औदुंबर ( वय५२) असे दोघे जखमी झाले. ही घटना काल गुरुवारी (ता.२) सकाळी घडली. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. भगवान गायकवाड आणि इतर सहा जणांनी मारहाण केली. अशी प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* गॅस कार्यालयाचे शटर उचकटून ४३ हजाराची रोकड लंपास
अकलूज : म्हाळुंग येथील चैतन्य भारत गॅस एजन्सी या कार्यालया समोरील शटरचे कुलूप उचकटून चोरट्याने ड्राव्हरमधील ४३ हजाराची रोकड पळविली. ही चोरी काल गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेची फिर्याद संजय दत्तात्रय साळुंके यांनी अकलूज पोलिसात दाखल केली. हवालदार गायकवाड पुढील तपास करीत आहेत.
* उजनी येथून तीन म्हशी पळवल्या
कुर्डूवाडी – उजनी (ता. माढा) येथील रुपेश लोकरे यांच्या शेतातून चोरट्याने दोन म्हशी आणि एक रेडा अशी ५५ हजाराची जनावरे चोरून नेली. ही चोरी गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. लोकरे यांनी या संदर्भात कुर्डूवाडी पोलिसात फिर्याद दाखल केली. हवालदार दाढे पुढील तपास करीत आहे.