सोलापूर : मध्य रेल्वे, रेल्वे रिक्रूटमेंट सेलने (Railway Recruitment Cell) स्तर 1 आणि 2 पदांकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. रेल्वेत नोकरी मिळवण्यासाठी धडपड करणा-या युवकांसाठी ही चांगली संधी आहे.
इच्छुक उमेदवार RRC च्या अधिकृत वेबसाइट rrccr.com वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. पण त्यासाठीची पात्रता जाणून घ्या.
स्तर 1 साठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी उत्तीर्ण असावा. किंवा ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावी.
स्तर 2 साठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 50 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असावा. दुसरीकडे, SC / ST / सैनिकांच्या विद्यार्थ्यांना 50 टक्के गुणांची सूट आहे. याशिवाय, तांत्रिक पदासाठी, एनसीव्हीटी / एससीव्हीटी मान्यताप्राप्त अप्रेंटिसशिप ऍक्ट किंवा ITI प्रमाणपत्र असावे. तर उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावी, ही अट आहे.
अर्ज प्रक्रिया 6 डिसेंबरपासून सुरू होईल आणि 20 डिसेंबर 2021 रोजी बंद होईल. या भरती प्रक्रियेतून 12 पदे भरली जाणार आहेत. 2021-22 या वर्षासाठी स्काऊट- गाईड कोट्याअंतर्गत मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूर विभागासाठी स्तर 1 आणि 2 ची पदे भरली जातील.
सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर SC / ST / PWD व महिला उमेदवारांसाठी अर्ज फी 250 रुपये आहे.
* सोलापूर विभागात रेल्वेत साखळी खेचण्याच्या 149 घटना
रेल्वेत अलार्म चैन (साखळी) खेचण्याचा पर्याय केवळ आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यात येतो. परंतु, प्रवासी या सुविधेचा गैरवापर करीत असल्याने रेल्वेची डोकेदुखी वाढली आहे. मागील 23 महिन्यांत क्षुल्लक कारणांसाठी जानेवारी 2020 ते नोव्हेंबर 2021 मध्ये साखळी खेचण्याच्या जवळपास 149 घटना सोलापूर विभागात घडल्या आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात जानेवारी 2020 ते नोव्हेंबर 2021 पर्यंत जवळपास 23 महिन्यांच्या कालावधीत हा प्रकार घडला आहे. या सर्व घटनांची नोंद रेल्वे सुरक्षा बल अर्थात आरपीएफ पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. सर्व प्रकरणे ही मेल-एक्सप्रेसमधील असल्याचे यावेळी रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. विनाकारण साखळी खेचणाऱ्या प्रवाशांकडून दंडदेखील वसूल करण्यात आला आहे. तर काहीजणांना शिक्षादेखील करण्यात आली आहे.
मेल- एक्सप्रेसमध्ये क्षुल्लक कारणासाठी चैन खेचण्याच्या घटना घडल्या आहेत. आगामी काळात अशा प्रकारच्या घटना कमी करण्यासाठी आरपीएफ पथकाची नियुक्त करण्यात आली असल्याचे प्रदीप हिरडे (वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर) यांनी सांगितलंय.
त्यामुळे विनाकारण साखळी खेचाल तर यापुढे एक वर्षाची शिक्षा आणि दंड होऊ शकतो अशी माहिती रेल्वे सुरक्षा दलाने दिली. रेल्वे कायदा 1989 च्या कलम 141 नुसार, चैन पुलिंग करताना पकडले गेल्यास, जास्तीत जास्त एक हजार रुपये दंड किंवा एक वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे. साधारणपणे दंडाधिकारी केवळ 500 रुपये दंड भरून आरोपीला सोडतात. दंड न भरल्यास केवळ नाममात्र प्रकरणांमध्ये एक महिना कारावास भोगावा लागतो.
विनाकारण चैन खेचणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाचे विशेष पथक तैनात असते. वैद्यकीय, वीज, पाणी, स्वच्छतागृह सेवा नसणे यासाठी साखळी ओढली तर शिक्षा नाही, मात्र हे सुनावणी दरम्यान सिध्द झाले पाहिजे.