भंडारकवठे : सोलापूर शहरातील काँग्रेसमध्ये समन्वय नसून पक्षवाढीकडे सर्वांचेच दूर्लक्ष होत असल्याने आत्मपरीक्षण करण्यासाठी अन्नत्याग आणि आत्मक्लेष आंदोलनाचा मार्ग निवडला. यापुढे पक्षातील बेबंदशाहीला आणि निष्क्रीयतेला रोखून वेळीच उपाययोजना न केल्यास काँग्रेसचे ‘ जनता दल ‘ व्हायला वेळ लागणार नाही,असा इशारा काँग्रेसचे नेते डाॅ. बसवराज बगले यांनी दिला.
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिवशी आज बसवराज बगले यांनी सोलापूर शहरातील काँग्रेसभवनाजवळ तोंडाला आणि दंडाला काळी पट्टी बांधून एकदिवसीय आंदोलन करून पक्षनेतृत्वाचे लक्ष वेधले. आगामी काळात नेत्यांच्या वर्तनात सुधारणा न झाल्यास प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मुंबईतील गांधी भवनासमोर असेच आंदोलन करण्याचा इशाराही बगले यांनी दिला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
प्रारंभी डाॅ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांनी अभिवादन केले. हे आंदोलन कोणत्याही नेत्याविरूध्द नसून पक्षातील बेबंदशाही आणि निष्क्रीय प्रवृत्तीला जाणीव करून देण्यासाठी आहे. वेळीच उपाययोजना न केल्यास काँग्रेसचे ‘ जनता दल ‘ व्हायला वेळ लागणार नाही, असेही ते म्हणाले.
सायंकाळी प्रदेश काँग्रेसचे सचिव किसन मिळाले गुरूजी, शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांनी सरबत देऊन डाॅ.बगले यांच्या आंदोलनाची सांगता केली. या वेळी त्यांच्यासमवेत शिवाजी व्यवहारे, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष हरीष पाटील, माजी सभापती भिमाशंकर जमादार, बंजारा नेते, अशोक चव्हाण, शिवयोगी बिराजदार, अशोक कोनापुरे, भीमराव बाळगे, सुधीर लांडे, अशोक कस्तुरे , सागर सोलापूरे, रशीद शेख, राधाकृष्ण पाटील, रमेश हसापूरे, मोतीराम चव्हाण, लक्ष्मण किणीकर, बाळासाहेब पवार आदी सहभागी झाले होते.