बार्शी : घर जागा वाटून का देत नाही म्हणून मुलाने वृध्द आईवर कोयत्याने वार केल्याची संतापजनक घटना बार्शी तालुक्यातील मिर्झनपूर येथे घडली आहे. याबाबत जखमी वैजयंता मच्छिंद्र गायकवाड( वय 65) यांनी मुलासह सूनेविरूद्ध फिर्याद दिली.
या फिर्यादीवरुन मुलगा सचिन व सून रेश्मा यांच्यावर वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
वैजयंता गायकवाड यांना तीन मुले आहेत. मोठा मुलगा श्रीधर हा पुण्यास राहतो. दुसरा मुलगा रमेश व सुन दैवशाला यांच्यसोबत त्या गावीच राहतात. तर तिसरा मुलगा सचिन हा सुमारे 10 वर्षापासून पिराची वाडी या गावी त्यांचे कुटुंबासह राहणेस आहे.
सायकांळी 05/00 वाजता घरात बसल्या असताना सचिन व त्याची बायको रेश्मा हे दोघे घरात आले आणि त्यांनी तु घर जागा का वाटून देत नाही, असे म्हणून शिवीगाळी सुरु केली. यावेळी सुन रेश्मा हिने त्यांना धरले आणि सचिन याने हातातील कोयत्याने वार केले. यावेळी त्यांनी केलेल्या आरडाओरड्यामुळे थेारला मुलगा, थोरली सून, शेजारी धावून आले. त्यांनी त्यांची सुटका केली.
यावेळी त्यांच्या उजव्या हातावर मार लागल्याने त्या जखमी झाल्या. यावेळी आरडाओरडा करत सचिनने घरातील टफ, पत्रा फोडून नुकसान केले व त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
* गुन्हे शाखेने चोरट्यास ठोकल्या बेड्या
सोलापूर : करमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या आणि चोऱ्या करणाऱ्या अक्षय यादव पवार (वय १९ रा. बारडगाव ता. कर्जत जि.अहमदनगर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.
त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेले दोन मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मारुती मोटार असा ४ लाख २५ हजाराचा माल जप्त केला. करमाळा परिसरात चोरी आणि घरफोडीच्या प्रमाणात वाढ झाली होती. या ठिकाणी चोर्या करणारा संशयित आरोपी हा कर्जत परिसरात राहणारा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्याप्रमाणे निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार खेडकर, सहाय्यक फौजदार पारेकर, पोलीस शिपाई रवी माने आणि सलीम बागवान यानी राशीन (ता. कर्जत) येथील बसस्टॉप येथे जाऊन आरोपीला अटक केली.
अटकेतील अक्षय पवार याच्यावर कर्जत पोलिस ठाण्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
* ऊसतोड कामगार महिलेचा मृत्यू
सोलापूर : शेतात ऊस तोडीचे काम करताना उलटी होऊन बेशुद्ध पडल्याने मध्यप्रदेशची ऊसतोड कामगार महिला उपचारापूर्वी मरण पावली. ही घटना आज सोमवारी सकाळी मुस्ती (ता. दक्षिण सोलापूर) येथील देवराज बिराजदार यांच्या शेतात घडली.
भारती आकाश गौतम (वय २० रा. मिरिखेडा जि.खंडवा, मध्य प्रदेश) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. ती बिराजदार यांच्या शेतात इतर कामगारांसोबत ऊस तोडीचे काम करीत होती. सकाळी १० वाजेच्या सुमारास अचानक तिला उलट्या होऊन बेशुद्ध पडली. तिच्या पतीने तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ती उपचारापूर्वीच मरण पावली. या घटनेची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली. सहाय्यक फौजदार पवार पुढील तपास करीत आहेत.