पुणे : पुण्याच्या येरवडा- नगर रस्त्यावरील खराडी चौकात बीआरटी बसथांब्याला चार चाकी धडकून झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा अपघात काल बुधवारी रात्री साडे बाराच्या सुमारास झाला.
कारने मद्यधुंद चालकामुळे भरधाव वेगात येऊन बीआरटी बसथांब्याला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. जखमी युवकांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भरधाव वेगाने निघालेली ब्रिजा कार (एम एच १२ क्यूएफ ९३६३) खराडी बायपास येथील बीआरटी बस थांब्याला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले, तर दोन गंभीर जखमी झाले आहेत.
वाघोली च्या दिशेने भरधाव निघालेली ही कार बीआरटी थांब्याला एवढ्या जोरात धडकली की, कारच्या पुढच्या बाजूचा चुराडा झाला आहे. कारमध्ये चौघेजण होते. त्यापैकी कार चालक संकेत रामचंद्र भुजबळ (वय २२, रा. साइनगरी, चंदननगर) व ओम राहुल पवळे (वय १७, रा. किनारा हौसिंग सोसायटी, कसबा पेठ) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गौरव संजय साठे (वय २२, संभाजी नगर, वाघोली) व प्रफुल्ल अंकमंची (वय २१, रा. बिडी कामगार नगर चंदननगर, खराडी.) हे दोघे जखमी आहेत.
सहाय्यक पोलीस फौजदार नामदेव सुपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. चौघेही तरुण मद्यधुंद अवस्थेत होते. चार चाकीचा वेग सुमारे १४० किमी च्या आसपास होता.
काही प्रत्यक्षदर्शींनी हा अपघात पाहिला. चारचाकी चालक मयत संकेत भुजबळ यावर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती विमानतळाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत जाधव यांनी दिली आहे. यातील मयत संकेत भुजबळ हा तरुण भाजपा पदाधिकारी होता. इतर महाविद्यालयीन युवक होते.