माळीनगर : पालखी महामार्गाच्या काम जोरात चालू आहे. मात्र या कामामध्ये माळीनगरातीलखुले रंगमंच जमीनदोस्त होत आहे. या रंगमंचाने महाराष्ट्रातील अनेक कलावंतांना राजाश्रय दिलाय. पालखी सोहळ्यावेळी हे रंगमंच वारक-यांची सेवा करीत होते. आज तोच रंगमंच पाडला जातोय.
माळीनगर गावाला अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वतःचा स्वतंत्र इतिहास आहे. माळीनगर येथील दि सासवड माळी शुगर फॅक्टरी कारखान्याच्या स्थापनेपासून साधारण १९३२ पासून इथे लोकवस्त्या , प्राथमिक व माध्यमिक शाळा , इंग्रजी माध्यम शाळा यांची इथल्या सासवड माळी एज्युकेशन सोसायटीने स्थापना केली.
काळानुरूप गावाला मनोरंजनाचे मुक्त व्यासपीठ व्हावे , पालखी सोहळ्यावेळी निवारा असावा यासाठी भारदस्त खुले रंगमंच बांधण्यात आले. माळीनगर गावात या खुल्या रंगमंचावर अनेक दिग्गज कलावंत मंडळी नाटके , एकपात्री प्रयोग , नृत्य सादर करून गेले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या रंगमंचाने महाराष्ट्रातील अनेक कलावंतांना राजाश्रय दिला, अगदी चोख नियोजन , नेपथ्य , बैठक व्यवस्था, यामुळे कानाकोपऱ्यात लोकं इथे कार्यक्रम पाहण्यासाठी येत होती. माळीनगर फेस्टिव्हलची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी या खुल्या रंगमंचाचा फार मोठा वाटा आहे.
येथेच शाळेतील मुला-मुलींना आपल्या अंगातील कलागुणांना वाव देता आला यातून अनेक कलावंत , निवेदक निर्माण झाले आहेत. हा इतिहासाचा साक्षीदार जमिनदोस्त होत असताना माळीनगरवासियांनी हळहळ व्यक्त केली आहे.
या रंगमंचावर अनेक थोर कलाकारांनी कला दाखवली आहे. माळीनगर फेस्टिव्हलसारखा तालुक्यातील प्रसिद्ध असा कार्यक्रम पार पाडला आहे. आता संताच्या पालख्यांनी पावन झालेला हा खुला रंगमंच पाडण्याचे काम सुरू झाले आहे. माळीनगरमधील अबालवृद्ध मंडळी आठवणी डोळ्यात साठवून या वास्तूला शेवटचा निरोप देताना भावूक झाली आहेत.