वेळापूर : ” महाळुंग श्रीपुर नगरपंचायत निवडणुकीमध्ये खासदार रणजीतसिंह निंबाळकर व जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी मोहिते-पाटील यांना विश्वासात न घेता एकाच गटाला एबी फॉर्म दिल्याने राजकीय वातावरण तापलेले दिसत असून भाजपामध्ये यामुळे गोंधळाचे वातावरण पसरलेले दिसत आहे तर मोहिते-पाटील समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली दिसत आहे.”
राष्ट्रवादीच्या अभेद्य बाले किल्ल्याला हादरा देत फलटणच्या रणजित निंबाळकरांना खासदार पदी विराजमान करण्यात आले पण तेच खासदार आज सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात गटबाजीची पेरणी करताहेत, का असा सवाल पडला आहे.
सध्या नगरपंचायत निवडणुकांची धामधूम सुरू आहे. अगदी सगळीकडेच भाजपा मजबूत ताकतीने उतरलेला दिसतो आहे. जिल्ह्याच्या राजकारणात कधी नव्हे इतके बळ प्राप्त झालेले दिसत आहे. पण अशा सकारात्मक वातावरणात दिलेल्या जबाबदारीला डावलून खासदार रणजितसिंह निंबाळकर भाजपामध्ये गटबाजीची पेरणी करत आहेत का असा प्रश्न भाजपा प्रेमींना पडला आहे.
महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये एबी फॉर्मचे वाटप स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन न केल्यामुळे भाजपामध्ये अस्वस्थता पसरली आहे. यामुळे नसलेले गट भाजपमध्ये सध्या गटबाजीचे दर्शन दाखवताना दिसत आहेत. माळशिरस तालुक्याच्या राजकारणात मोहिते-पाटील यांचे नेहमी प्राबल्य राहिले आहे. हे सर्वज्ञात असतानासुद्धा विनाकारण खासदार निंबाळकर यांच्याकडून अविश्वासाचे वातावरण निर्माण केले जात आहे.
विजयाची जबाबदारी ज्यांनी स्वीकारली त्यांनाच डावलून खासदार निंबाळकर आणि जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख वेगळेच राजकारण करताना दिसत आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात भाजपामध्ये गटबाजी नव्हती ती निर्माण केली जात आहे का, असा सवाल यानिमित्ताने समस्त भाजपा प्रेमींना पडला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपासाठी अच्छे दिन सुरू आहेत. लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणूक अशा निवडणुकांमध्ये भाजपाने ताकदीने यश मिळवले असले तरी खासदार निंबाळकर आणि जिल्हाध्यक्ष देशमुख यांच्या ढवळा ढवळी मुळे भाजपासाठी पुरते वातावरण बिघडताना दिसत आहे.
राष्ट्रवादीची गटबाजीमुळे वाट लागली, होत्याचे नव्हते झाले आता तीच अवस्था भाजपाची करायची आहे का?असा सवाल यानिमित्ताने विचारला जात आहे. खासदार निंबाळकर यांची लुडबुड , चुकीची धोरणे , गटबाजीला असणारी जिल्हाध्यक्ष देशमुख यांची साथ यामुळे भाजपा गट बाजीच्या विळख्यात आडकणार का हा खरा सवाल आहे.
महाळुंग – श्रीपुर नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने जे घडले ते नक्कीच भाजपा प्रेमीसाठी धक्का देणारे आहे. भविष्यात हे असेच चालू राहिले तर जिल्ह्यातील भक्कम समजला जाणारा भाजपा विकलांग होण्यास वेळ लागणार नाही.
* एक लाख मताचा विसर
– लोकसभा निवडणुकीमध्ये रणजीत निंबाळकर यांना माळशिरस तालुक्यातून एक लाख मताचे लीड देणार अशी घोषणा मोहिते-पाटील यांनी केली होती आणि अचूक नियोजनातून त्यांनी ते सिध्द करून दाखवले होते पण त्याचाच विसर खासदार निंबाळकर यांना पडलेला दिसत आहे. अशी चर्चा सध्या भाजपाप्रेमी मधून रंगताना दिसत आहे.
* जबाबदारी दिली मग एबी फॉर्म का नाही
– महाळुंग श्रीपुर नगरपंचायत निवडणुकीची जबाबदारी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर देण्यात आली होती मात्र त्यांना डावलून एकाच गटाला कुणालाही विश्वासात न घेता एबी फॉर्म देण्यात आले.
* ताळमेळ साधला असता…
मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाळुंग श्रीपुर अंतर्गत तीन गट कार्यरत होते. या तिन्ही गटाने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वांचा ताळमेळ साधून प्रत्येकाच्या प्राबल्यनुसार एबी फार्मचे वाटप करण्यात आले असते. मात्र एकाच गटाला एबी फॉर्म दिल्याने भाजपामध्ये आता अंतर्गत बंडाळी दिसणार आहे.