सोलापूर : जामश्री पुरस्कृत महिलांच्या जागतीक मानांकन लॉन टेनीस स्पर्धेत पुण्याच्या ऋतुजा भोसलेने अजिंक्यपद पटकाविले. जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या अंतिम सामन्यात ऋतुजाने गुजरातच्या वैदही चौधरी हिचा अत्यंत अटीतटीच्या व अडीच तास चाललेल्या सामन्यात ४-६, ७-५,६-१ असा तीन सेटमध्ये पराभव केला.
ऋतुजाला जामश्री रियाल्टीच्या वतीने तर उपविजेत्या वैदहीला बालाजी अमाइन्सच्या वतीने चषक व भेटवस्तू सोलापूरचे पोलीस आयुक्त हरिश बैजल यांच्या हस्ते देवून गौरवण्यात आले. या प्रसंगी वनखात्यात कार्यरत असलेल्या संध्याराणी बंडगर यांनी अक्टोबर २०२१ मध्ये दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय नागरी सेवा लॉन टेनिस स्पर्धेत दुहेरी व मिश्र दुहेरी कास्य पदक मिळवल्याबद्दल जिल्हा लॉन टेनीस संघटनेच्या गौरवण्यात आले.
स्पर्धेत उत्कृष्ठ बॉल किपरची सेवा बजावल्या बद्दल अवनी यनदंडूल आणि श्लोकआळंद यांचाही सत्कार झाला. विजेत्या व उप विजेत्याना व्ही.आर.पवार सारीज व दिप एंटरप्रायजेस तर्फे भेट वस्तू राजेश पवार व संदीप देसाई यांच्या हस्ते देण्यात आल्या.
या प्रसंगी बिमला दमाणी ,यातीन शहा , राम रेड्डी ,सिध्दार्थ गांधी, स्वाती देसाई, पंकज शहा, माया खंडी, डॉ.किरण किरणीकर, नेव्हील पीठावाला आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन संघटनेचे मानद सचिव राजीव देसाई यांनी केले.
उस्मानाबादसह, पुणे, रत्नागिरी, ठाणे, सांगली व मुंबई उपनगर उपांत्य फेरीत
– वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धा
सोलापूर : उस्मानाबादसह, पुणे, रत्नागिरी, ठाणे, सांगली व मुंबई उपनगर या संघानी वरिष्ठ गट ५७ व्या राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
वेळापूरच्या पालखी मैदानावर शनिवारी सकाळच्या सत्रात महिला गटात उस्मानाबादने सातारावर १३-८असा डावाने दणदणीत विजय मिळविला. त्यांच्या वैभवी गायकवाडने आपल्या धारदार आक्रमणात ५ गडी टिपले. आश्विनी शिंदे ( ४.००,१.३०), नम्रता गाडे (२.३०) व किरण शिंदे (२.००) यांनी संरक्षणाची खेळी केली. साताराच्या मयुरी जाधवने एक मिनिटे पळती तर संचिता बोडरे हीने दोन बळी टिपले.
दुसऱ्या सामन्यात पुण्याने सोलापूरला १०-७ असे डावाने हरविले. पुण्याच्या प्रियंका इंगळेने (३.२० मिनिटे व ४ गुण) अष्टपैलू खेळी केली. प्रिया भोर हीने नाबाद तीन तर कोमल दारवाटकर हीने ३.१०मिनिटे पळती केली. सोलापूरच्या प्रीती काळे (१.४०) व संध्या सुरवसे (१.२०,१.४० मिनिटे) यांचे प्रयत्न अपुरे पडले.
अन्य सामन्यात रेश्मा राठोडच्या (३.१० मिनिटे व २गुण) अष्टपैलू खेळामुळे ठाणे जिल्ह्याने मुंबई उपनगरला १०-८ असे डावाने नमविले. रत्नागिरीने सांगलीस १५-१२असे पराभूत केले. मध्यंतरची १०-६ ही आघाडीच त्यांना विजय मिळवून दिली. अष्टपैलू कामगिरी करणारे अपेक्षा सुतार (२.५०,१.५० व ४ गुण) व आरती कांबळे ( १.३०, १.३० व ४गुण) हे त्यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
पुरुष गटात अरुण गुनकीच्या (१.३० व २.०० मिनिटे व ४गुण) अष्टपैलू कामगिरीमुळे सांगलीने सोलापूरचा १८-१६ असा डावाने पराभव केला. सोलापूरकडून रामजी कश्यप, राहुल सावंत, अक्षय इंगळे, विनीत दिनकर यांनी प्रत्येकी ३गडी टिपले. दुसऱ्या सामन्यात पुण्याने उस्मानाबादवर १७-११ अशी डावाने एकतर्फी मात केली. त्यांच्या मिलिंद करपे याने पाच गडी बाद केले. राहूल मंडलने २.२० व अभिषेक खेंडेकर २.०० मिनिटे पळती केली.
अन्य सामन्यात ठाण्याने मुंबईवर १८-१७ असा ३.४० मिनिटे राखून विजय मिळविला. त्यांच्या लक्ष्मण गवस व शुभम उत्तेकर त्यांनी प्रत्येकी दोन मिनिटे पळती करीत तीन गडी टिपले. हर्षद हातणकरच्या (१.००,१.२० मिनिटे व ३गुण) अष्टपैलू खेळामुळे मुंबई उपनगरने अहमदनगरला १५-१३ असे ७.३०मिनिटे राखून हरविले. अहमदनगरच्या आकाश ढोले(१.४० मिनिटे व ३गुण) याची अष्टपैलू खेळी अपुरी पडली.
* पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते उद्घाटन
वेळापूर येथील अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळाने ही स्पर्धा राज्य खो खो संघटनेचे माजी अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
यावेळी स्पर्धा अध्यक्ष उत्तमराव जानकर, अर्जुन पुरस्कार विजेते सुयश जाधव, खो खो संघटनेचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव, महाराष्ट्र खो खो संघटनेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अरुण देशमुख,माजी सचिव जे. पी. शेळके, क्रीडा व युवक खात्याचे उपसंचालक अनिल चोरमोले, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे, नारायण जाधव, जिल्हा खो खो असोसिएशनचे सचिव सुनील चव्हाण आदी उपस्थित होते.
राहुल सावंत याने खेळाडूना शपथ दिली. स्पर्धा सचिव जावेद मुलाणी यांनी प्रास्ताविक केले. सुरुवातीस भारतीय खो खो महासंघाचे माजी सरचिटणीस मुकुंदराव अंबरडेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
असे होणार उपांत्य सामने :
पुरुष : मुंबई उपनगर वि. ठाणे, सांगली वि.पुणे.
महिला : पुणे वि. उस्मानाबाद, रत्नागिरी वि. ठाणे.