बार्शी : अत्यंत चुरशीने झालेल्या बार्शी वकिल संघाच्या निवडणुकीत ॲड. अविनाश हौसेराव जाधव हे अध्यक्षपदी तर ॲड. भगवंत शिवाजीराव पाटील उपाध्यक्षपदी व ॲड. नरेंद्र मधुकर घोडके सचिवपदी निवडून आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ऍड. विकास जाधव यांनी दिली.
कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्ष ही निवडणूक होऊ शकली नव्हती. त्यामुळे या निवडणूकीत मोठी चुरस निर्माण झाली होती. अध्यक्षपदासाठी प्रथमच सहा तर उपाध्यक्षपदासाठी चार उमेदवार निवडणूक रिंगणात होते. बार्शी वकिल संघाची सभासद संख्या पाचशेहून अधिक असली तरी फक्त 281 सभासद मतदानासाठी पात्र ठरले होते. त्यापैकी 263 सभासदांनी मतदान केले.
खजिनदार, लायब्ररी चेअरमन व व्यवस्थापन समिती सदस्य यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून ही निवडणूक पार पडली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ऍड. विकास जाधव यांनी दिली.
यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी ऍड. सुनील कुलकर्णी, ऍड. शंकर ननवरे, लायब्ररियन ऍड. अक्षय रानमाळ हे उपस्थित होते.
दिवसभर मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर लगेचच मतमोजणी झाली. निकाल जाहीर होईपर्यंत आवारात पिन ड्रॉप सायलेन्स होता. निकाल जाहीर होताच एकच जल्लोष झाला.
नूतन अध्यक्ष ॲड. अविनाश जाधव यांनी वकिल संघाच्या सर्व सभासदांना सोबत घेवून येत्या वर्षभरात वकिलांच्या हिताचे अनेक उपक्रम राबवू, अशी ग्वाही दिली.
* जातीवाचक शिवीगाळ करुन लूटमार केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल
बार्शी : जातीवाचक शिवीगाळ, तलवारीने वार करुन लूटमार केल्याप्रकरणी तालुक्यातील शेलगाव (मा.) येथील विकास लहु वाघमोडे, सागर लहु वाघमोडे, विनोद नाना सलगर , जयपाल पाटील यांच्याविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अजय ऊर्फ विजय जगन्नाथ पारसे (रा. सुभाष नगर, बार्शी) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हे मौजे शेलगाव हद्दीत नितीन ऐजिनाथ आगलावे यांच्या विट भट्टीवर कामाला आहेत. ते इतर कामगार सुधीर दशरथ आगलावे, करविन अरूण काष्टेकर यांच्यासह मजुरी घेण्यासाठी बावी येथील फ्रेंड हॉटेल मध्ये सायंकाळी 7 वा. गेले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तिथे आरोपी बाहेरून दारू पिवुन जेवन करण्यासाठी आले होते. त्याचे 610 /-रू बिल झाले. त्या बिलाची पावती वेटर कल्याण दत्तात्रय जाधव त्यांच्याकडे घेऊन गेले. त्यावेळी विकास वाघमोडे याने त्याला शिवीगाळ करून काऊंटरवर बसलेले हॉटेलचे मालक नितीन आगलावे यांच्याकडे आला. त्यावेळी त्याने येवढे बिल कशाचे झाले. तुम्ही लय माजलात, मी बिल देत नसतो असे म्हणून त्याच्यासोबत आलेले इतर तिघांना बोलावुन घेतले.
त्यावेळी विनोद नाना सलगर व जयपाल पाटील या दोघांनी नितीन आगलावेला पकडले. त्याचवेळी विकास व सागर बाहेर पळत गेले व विकासने त्याच्या मोटार सायकलला बांधलेली तलवार आणली व सागर गज घेऊन आला. विकास व सागर यांनी हॉटेलच्या गल्ल्यात ठेवलेले 25 हजार व विट भट्टीचे एक लाख असे सव्वा लाख रूपये व त्यांच्या हातातील 15 ग्रँम वजनाचे सोन्याचे ब्रासलेट तोडुन घेतले.
त्यावेळी महादेव फकिरा आगलावे त्यांच्याकडे येत असताना विकास याने डाव्या कानाजवळ तलवारीने वार केला. त्यावेळी वेटर कल्याण जाधव, टेंपो चालक समाधान झाडे व फिर्यादी सोडवण्यासाठी मध्ये पडले असता सागर यांने त्यांना गजाने मारले. स्वॅप मशिन व काउंटर फोडुन नुकसान केले. तसेच जातीवाचक शिवीगाळ करत पळुन जाताना बाहेर लावलेल्या इंडिका गाडीच्या काचा फोडुन नुकसान केले.
विनोद नाना सलगर याने दिलेल्या फिर्यादीनुसार, तो मित्र विकास लहु वाघमोडे याच्यासह हॉटेल फ्रेंड्सस येथे जेवण्यासाठी गेला हेाता. बील जास्त झाल्यामुळे मालक नितीन आगलावे आणि विकास यांच्यात शिवीगाळ केली. त्याचा राग आल्याने महादेव फकिरा आगलावे याने तलवारीने विकास यांचे डोक्यात, उजव्या हातावर गंभीर वार केले. त्यावेळी नितीन आगलावे यांनेही तलवारीने वार केले. त्यामुळे तो बेशुद्ध पडला. यावेळी माजी सरपंच उमेश मारकड आदींनी त्यास उपचारासाठी नेले.