मुंबई : रुपाली पाटील ठोंबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत रुपाली ठोंबरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाल्या. मी ज्या पद्धतीने आधी लोकांसाठी काम करत होते, त्याच पद्धतीने मी राष्ट्रवादीत आल्यानंतरही लोकांसाठी काम करेन, असं त्या यावेळी म्हणाल्या.
मनसेच्या अंतर्गत राजकारणाला वैतागून महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी नुकतेच पक्षाला रामराम केला. यानंतर ठोंबरेंनी आज गुरूवारी (१६ डिसेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्या उपस्थिती रुपाली पाटील ठोंबरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ठोंबरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश सोहळा हा राष्ट्रवादीच्या मुंबई कार्यालयात झाला.
“रुपाली ताईंना माननारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे लोक त्यांना मानतात. त्यांच्यामुळे पुणे शहर पुढे जाईल, महिलांचा विकास होईल,” असं अजित पवार यावेळी म्हणाले. रुपाली ठोंबरे आणि इतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचं अजित पवारांनी राष्ट्रवादीत स्वागत केलं. राष्ट्रवादीतले नेते सर्व महिला पदाधिकाऱ्यांना स्वतःच्या बहिणीप्रमाणे मदत करतील, असं त्यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी रुपाली ठोंबरेंनी ट्वीट करत पक्षा प्रवेशाचे संकेत दिले होते. ठोंबरेंनी ट्वीटमध्ये म्हणाले, ‘आज शरद पवार साहेबांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‘हात’ नाहीत व पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे ‘पाय’ दिसत नाहीत; हो म्हणूनच ठरलंय! या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार…’
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अजित पवारांनी दिलेल्या हिमतीमुळे मला राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची प्रेरणा मिळाली, असं त्यांनी सांगितलं. “मनसेत असताना सतत पालकमंत्री अजित पवारांची भेट का घेते, अशी विचारणा व्हायची. पालकमंत्री म्हणून अजित पवार खूप चांगलं काम करत आहेत. मी ज्या कामांसाठी आतापर्यंत अजित पवारांची भेट घेतली, ती सर्व कामे त्यांनी कायदेशीररित्या पूर्ण केली,” असं रुपाली ठोंबरे म्हणाल्या. माझ्याच पूर्वीच्या पक्षातील काही लोकांना मला राष्ट्रवादीत पाठवायचे होते, असं रुपाली ठोंबरे यांनी यावेळी सांगितलंय .
रूपाली पाटील ठोबरेंनी मनसेच्या महिला विभागाच्या पुणे शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. परंतु पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी त्यांना उमेदवारी देखील दिली होती. मात्र, रुपाली ठोबरेंनी मंगळवारी (१४ डिसेंबर) मनसेला सोडचिठ्ठी दिली.
* थोडक्यात परिचय
रुपाली पाटील ठोंबरे… पेशानं वकील… कुटुंबातूनच त्यांना या क्षेत्राचा वारसा मिळाला. मुळ मराठवाड्यातले असलेले त्यांचे वडील आणि काका सुद्धा वकील होते. आज राजकारणाचं मैदान गाजवणाऱ्या रुपाली पाटील महाविद्यालयीन काळात खेळाचं मैदान गाजवत होत्या. त्यांना व्हॉलीबॉल आणि रायफल शुटिंगची आवड होती. २०१२ ला त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या. त्यानंतर त्यांनी पुणे महानगर पालिकेत चांगली कामगिरी केली.
रुपाली यांच्या लग्नाचा किस्साही भारी आहे. वकीलीचं शिक्षण घेणाऱ्या रुपाली आणि कोर्टात काम करणाऱ्या एका तरुणाचं सुत जुळलं. काम करता करता दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि पुढे याच तरुणासोबत म्हणजे पुण्यातील प्रसिद्ध वकील विजयसिंह ठोंबरे यांच्याशी त्यांचं लव्ह कम अरेंज मॅरेज झालं.