मुंबई : शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, अनिल परब यांनी रत्नागिरी जिल्हा वाऱ्यावर सोडला, त्यांना शिवसेनेच्या तालुका प्रमुखाचे नावही माहिती नाही, असा थेट आरोप रामदास कदम यांनी केला. दरम्यान, शिवसेनेने रत्नागिरीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. यात रामदास कदम समर्थकांना डावलण्यात आलं. हा कदम यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम गेल्या काही दिवासंपासून नाराज होते. त्यांच्याविरोधात पक्षविरोधात कारवाई केली असल्याचा आरोप करण्यात आला होता. या सर्व आरोपांवर रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन घणाघाती टीका केली आहे.
शिवसेनेतील अंतर्गत कलहाला अखेर आज वाचा फुटली आहे. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आज पत्रकार परिषदेत बोलताना कदम यांनी म्हटलं की, अनिल परब यांनी मनसे आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी यांना हाताशी धरुन आम्हाला संपवण्याचे प्रयत्न केले आहेत. माझ्या मुलाला तिकीट मिळू नये म्हणून अनिल परब यांनी खूप प्रयत्न केले.
रामदास कदम म्हणाले की, मिलिंद नार्वेकर यांचा बंगला अनाधिकृत होता म्हणून तो पाडला गेला. काही कार्यकर्त्यांनी माझ्या विरोधात घोषणा केली. त्यांच्या मागे कोण होतं हे मला माहित होतं. मी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगतो मी कधीच किरीट सोमय्या यांच्याशी बोललो नाही. मी कधीही पक्षाच्या विरोधात काम केलं नाही.
रामदास कदम म्हणाले की, तीन चार महिन्यापासून माझ्या संदर्भात मीडियामध्ये उलट-सुलट चर्चा सुरु आहे. माझी भूमिका सर्वांना माहीत व्हावी म्हणून माझी बाजू मांडत आहे. अनिल परब शिवसेनेला गहाण ठेवत आहेत. मग गद्दार कोण आहे, असा सवाल त्यांनी केला. एसटी कर्मचारी संप सुरु आहे आणि आत्महत्या होत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पण अनिल परब यांना वेळ नाही. शिवसेना म्हणजे काय हे आता आम्हाला उदय सामंत सांगत आहेत. ५२ वर्ष आम्ही या पक्षासाठी खर्च केले आहेत, असं ते म्हणाले. मी शिवसेना सोडणार नाही, मुलं मात्र निर्णय घेण्यास मोकळी आहेत. आपण शिवसेनेतून काढून टाकलं तून तरी शिवसैनिक म्हणून जगू.
रामदास कदम मी शिवसेनेतून कदापी बाहेर पडणार नाही. मरेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही, असं शिवसेना नेते रामदास कदम यांनी म्हटलं. तसेच पक्षातून काढलं तरी शिवसैनिक म्हणून जगेन, असंही ते म्हणाले. आता पुढील निर्णय काय होईल, याबाबत एक महिन्याच्या आत येऊन तुमच्याशी संवाद साधेल, असंही त्यांनी सांगितलं.
* कदमांचे परबांना आव्हान
रामदास कदम यांनी थेट अनिल परब यांना आव्हान दिलं आहे. अनिल परब यांनी बांद्रामधून नगर पालिकेच्या निवडणुकीत उभे राहून दाखवाव असे रामदास कदम म्हणाले आहेत. योगेश कदम यांना आमदार पद मिळू नये, विधानसभेचे तिकिट मिळू नये यासाठी अनिल परब यांनी जोरकस प्रयत्न केला आहे.
अनिल परब यांनी योगेशला विधानसभेला तिकिट मिळू नये यासाठी संजय कदम यांना घेऊन मातोश्रीवर आले होते. त्यांना तिकीट मिळण्यासाठी अनिल परब प्रयत्न करत होते. अनिल परब पालकमंत्री झाल्यावर सूडाच्या भावनेतून योगेश कदमच्या विरोधात कारवाई करत आहेत. दोन वर्षामध्ये योगेश कदमचा एकही फोन अनिल परब यांनी घेतला नाही आहे. त्यांनी फोन उचलल्यावर राष्ट्रवादीसाठी बोलत असल्यासारखे भाष्य केलं असल्याचा घणाघाती आरोप रामदास कदम यांनी केला आहे.