सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून शहरात थंडीचे प्रमाण वाढले असून शनिवारी पारा १२.५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून किमान सोलापूरचे तापमान १४.५ अंशांच्या जवळपास असून तापमान कमी झाल्याने आता सोलापूरकरांना हुडहुडी भरत आहे. चार दिवसांपूर्वी किमान तापमान १६.८ अंश नोंदले गेले होते. त्यानंतर शनिवारी मात्र थेट १२.५ अंशांपर्यंत घसरले आहे.
किमान तापमानात ४ ते ५ अंशांची घसरण झाली आहे. किमान आणि कमाल तापमानात होत असलेल्या घसरणीमुळे सोलापूर आता गारेगार होत असून, दिवसागणिक यात भरच पडत आहे.
यंदा सर्वत्र पाऊस चांगला झाल्याने थंडीचे प्रमाण देखील वाढणार हे निश्चित होते. त्यानुसार आता थंडीमध्ये वाढ होत असल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटविण्यात येत आहेत. थंडीपासून बचावासाठी नागरिक आता गरम कपड्यांचा आधार घेत आहेत. स्वेटर, मफलर, कानटोप्या खरेदी वाढला आहे. करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.
* संगमेश्वरमध्ये कला शाखेतील विद्यार्थ्यांची सुसंवाद
सोलापूर : महाविद्यालयीन जीवनात योग्य दिशा सापडली की आपण पोलीस दलातील करिअर नक्की निवडा. देशसेवेसाठी पोलिसातील करिअर महत्त्वाचे आहे, या क्षेत्रातील सेवा ही उत्तम देशसेवेची संधी आहे. तरुणांनी त्याचा लाभ घ्यावा ” असे प्रतिपादन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांनी केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ते संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभाग कलाशाखा आयोजित ‘ पोलिसातील करिअर ‘ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानात बोलत होते. याप्रसंगी उपप्राचार्य प्रसाद कुंटे, पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे, कला शाखा समन्वयक शिवशरण दुलंगे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
संस्थेच्या संगमेश्वर गीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला. त्यानंतर सरस्वती पूजन झाले. शिवशरण दुलंगे यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख मार्गदर्शक यांचा कॉलेजच्या वतीने सत्कार झाला. ” विद्यार्थ्यांनी बलोपासना केली पाहिजे. आहार-विहार यावरील संयमातून करिअरशी निगडित आपले व्यक्तिमत्व घडते. तरुण वयातील चालू घडामोडींवर तसेच गुन्हेगारीकडे आपले लक्ष असले पाहिजे कारण त्यापासून आपल्याला लांब राहायचा आहे. मजा म्हणून कायदा तोडण्याचा प्रयत्न करू नका, त्यातून मिळणारी ही सजा खूप मोठी असते. तुमचं करिअर खराब होऊ शकते.” असा मौलिक सल्ला कमलाकर पाटील यांनी दिला.
अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य प्रसाद कुंटे यांनी विद्यार्थ्यांना पोलीस क्षेत्रातील करिअर विषयी पाटील यांनी सांगितलेल्या गोष्टींचा नक्की फायदा होईल असं सांगत कला शाखा व्याख्यानमाला का आयोजित करत आहोत याबद्दल हेतू स्पष्ट केला.
या प्रसंगी हर्षवर्धन पाटील, रंगसिद्ध पाटील, संतोष पवार, शिवराज देसाई, शंकर कोमुलवार, डॉ. प्रकाश कतनळ्ळी, डॉ. विठ्ठल अरबाळे, शहाजी माने , कोमल कोंडा आदी कला शाखेतील प्राध्यापकवर्ग उपस्थित होता. रश्मी कन्नूरकर यांनी या सूत्रसंचालन केले तर शेवटी विश्वनाथ कक्कळमेली यांनी सर्वांचे आभार मानले.