मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्याच्या सभेत शिवसेनेला आव्हान करीत, हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि तिन्ही पक्षांनी एकत्र लढून भाजपशी दोन हात करावे, असं बोलले होते. या आव्हानाला खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये उत्तर देत, शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय तुमचे आमदार निवडून येणं शक्य नव्हतं. आधी भाजपाच्या 105 आमदारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
शाह यांच्या या आव्हानाला उत्तर देताना संजय राऊत यांनी केंद्र सरकार तीन चिलखतं घालून लढत असल्याचा टोला लगावला. “सीबीआय, ईडी, एनसीबी ही तीन चिलखतं घालून तुम्ही महाराष्ट्रात आमच्याशी लढतायत. ती तीन चिलखतं काढून समोरुन लढा,” असं राऊत यांनी शाह यांच्या ‘हिंमत दाखवा, आमच्याशी लढा’ या आव्हानाला उत्तर देताना म्हटलंय. आम्ही अंगावर वार झेलणारे आहोत. शिवसेना ही छत्रपती शिवाजी महाराजांची अवलाद आहे. आम्ही समोरुनच लढतो आणि लढणार, असंही राऊत शाह यांच्या आव्हानाला उत्तर देताना म्हणालेत.
मुख्यमंत्रिपदावरून मी वचन मोडले, असा आरोप केला जातो. विधानसभा निवडणुकीवेळी मी राज्यात आलो होतो. त्या वेळी शिवसेनेबरोबर चर्चा झाली होती. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील, असे त्या वेळी ठरले होते. मात्र सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्वाशी तडजोड केली. सत्तेसाठी शिवसेना विरोधकांच्या मांडीवर जाऊन बसली, असा आरोप अमित शहा यांनी केला होता.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शाब्दिक तोफ डागली. 2014 पासून महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचा पावलोपावली विश्वासघात करण्यात आला. हिंदुत्वाविषयी प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला गेल्या दोन-अडीच वर्षांपासून भ्रमित करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा जोरदार हल्लाबोल आज सोमवारी शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर केला. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेलाही यावेळी जोरदार प्रत्यूत्तर दिले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हिंदुत्त्वाचा मुद्दा शिवसेनेनं सोडला नाही आणि सोडणारही नाही. 2014 साली शिवसेनेला दूर करा हे खासगीत सांगणारे कोण होते हे शाह यांनी स्पष्ट करावं असा इशारा राऊतांनी दिला. 2014 पासून हिंदुत्त्वाचा पावलोपावली विश्वासघात करणारे कोण, याचं उत्तर शाह यांनी पुण्यात जमत नसेल तर दिल्लीत द्यावं… अशा शब्दांत त्यांनी तोफ डागली. राज्यातील सरकार उत्तम सुरु आहे आणि तुमच्या सर्व यंत्रणा अपयशी ठरल्या आहेत अशा शब्दांत त्यांनी अमित शाह यांना टोला लगावला. सीबीआय, एनसीबी सारख्या चिलखतांचा वापर करत तुम्ही जे वार करताय त्यापेक्षा समोरुन लढा, या शब्दांत मागच्या काही महिन्यांतील परिस्थितीवर त्यांनी कटाक्ष टाकला.
* पुण्यात येऊन खोटे बोलू नका
“मुख्यमंत्री पदाबद्दल ठरले नव्हते हे आपल्याला दोन वर्षानंतर आठवले का? याच्यावर आधी खुलासे झाले आहेत. सत्तेच्या वाटपाचा अर्थ काय होतो हे आम्ही तुमच्यासारख्या लोकांना सांगायला नको. सत्तेच्या वाटपामध्ये मुख्यमंत्री पदसुद्धा होते. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असलेल्या पुण्यात खोटे बोलू नका. गृहमंत्र्यांना देशात काम नसेल तर आम्हाला सांगावे. कर्नाटकात छत्रपती शिवरायांचा अपमान होत आहे. तुमच्या राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे ते पहा. पुण्यात येऊन आम्हाला ज्ञान देऊ नका. आम्ही तुमचा आदर करतो तुम्ही तुमच्या मर्यादेत रहा आम्ही आमच्या मर्यादेत राहू,” असे संजय राऊत म्हणाले.