सोलापूर : विजापूर रस्त्यावरील सोरेगाव येथील हॉटेल नागेश आर्केस्ट्रा तसेच डान्स बारचा परवाना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने रद्द करण्याचा आदेश पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे यांनी दिला आहे.
नागेश आर्केस्ट्रा बार काही नियम व अटीवर चालविण्यास शहर पोलिसांनी परवानगी दिली होती. त्या नियमांचे उल्लघंन करुन डान्स बार आणि आर्केस्ट्रा बार चालविला जात असल्याचे कारवाईतून उघड झाले.
२०१८ पासून आजपर्यंत नागेश डान्स बारवर कारवाया झाल्या. परंतु कारवाईनंतर पुन्हा चालकाकडून नियमांना डावलून हॉटेलात छमछम सुरू ठेवण्यात आली होती, असेही कारवाईतून समोर आले आहे. २९ ऑक्टोबरच्या कारवाईनंतर हॉटेल चालकाने पोलीस आयुक्तालयाला अटींवर हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी मागितली होती. त्याप्रमाणे त्यांना ती देण्यातही आली होती.
परंतु ८ डिसेंबर रोजी विशेष पथकाने केलेल्या कारवाईत नियमांचे उल्लंघन होत असल्याची बाब निदर्शनास आली. विविध गुन्हे दाखल झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने तसेच सांस्कृतिक कार्य विभागाने ५० टक्के क्षमतेने हॉटेल चालविण्यास परवानगी देण्यात आली होती. परंतु क्षमतेपेक्षा जास्त लोकांना तेथे प्रवेश देण्यात आला. त्यामुळे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या अंतिम आदेशान्वये आर्केस्ट्रा तसेच डान्स बार चालविण्याचा परवाना रद्द केल्याचे आदेश पोलीस उपायुक्त डॉ. धाटे यांनी दिले आहेत.
* अपहार प्रकरणी जिल्हा दूध संघाच्या कर्मचाऱ्याचे निलंबन
सोलापूर : ८६ हजार रुपयांच्या अपहार प्रकरणी जिल्हा दूध संघाच्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून अपहाराची रक्कम भरणा न केल्यास पोलीसात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीतून आलेल्या ८५ हजार ८८५ रुपये भरणा न करता अपहार केल्या प्रकरणी जिल्हा दूध संघाचे कर्मचारी शंकर भीमराव सावंत यांना निलंबित करण्यात आले आहे. अपहाराची रक्कम त्यांनी संघात भरणा न केल्यास पोलीसात गुन्हा दाख करण्यात येणार आहे.
अपहाराची रक्कम भरणा करण्याबाबत संघाकडून नोटीस बजावूनही दखल न घेतल्याने सावंत यांच्यावर निलंबनाची कारवाई संघाकडून करण्यात आली आहे. आता अपहाराची रक्कम भरणा करण्यास सावंत यांना मुदत देण्यात आली आहे. वितरण विभागाच्या निदर्शनास आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
* शाळे समोरुन दुचाकी पळविली
सोलापूर : कुणीतरी अज्ञात चोरट्याने केगाव येथील जिल्हा परिषद शाळे जवळून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची घटना २६ ते २७ नोव्हेंबर दरम्यान घडली.
याप्रकरणी शरद बंडू लोंढे ( वय – ३०, रा. मु. पो.केगाव,जिल्हा सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांची एम.एच.१३. सी.सी. ९१६५ हे दुचाकी कोणीतरी अज्ञात चोरट्याने मुद्दामून लबाडीने चोरून नेली आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात झाली असून, या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक शिर्के हे करीत आहेत.