मुंबई : महाराष्ट्र हादरवणारी बातमी आहे. आयकर विभागाच्या रडारवर महाराष्ट्रातले ४० भ्रष्ट IAS आणि IPS अधिकारी आहेत. हे बडे अधिकारी कोट्यवधी रुपये घेऊन दलाली करत असल्याचे उघड झाल्यानंतर आयटीने धाडी घातल्या होत्या. यातून सुमारे ४० अधिकाऱ्यांनी कोट्यवधींची बेहिशोबी व बेनामी मालमत्ता जमवल्याचे उघड झाले.
यात मुंबई पोलिस, नगरविकास, बांधकाम, उद्योग, एमएसआरडीसी, गृहनिर्माण खात्यातल्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मुंबई पोलिसातल्या बड्या अधिकाऱ्यांचीही नावं या भ्रष्ट बाबूंच्या यादीत असल्याचं या रिपोर्टमध्ये समोर आलंय.
या प्रकरणातला आयटीचा फायनल रिपोर्ट झी २४ तासच्या ( वृत्तवाहिनी) हाती आलाय.
नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, उद्योग, एमएसआरडीसी, गृहनिर्माण या खात्यांमधल्या बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांनी कोट्यवधींची बेहिशोबी आणि बेनामी मालमत्ता जमवल्याचं आयटीच्या चौकशीत उघड झालंय. गेल्या काही दिवसांपासून आयकर विभागाने मुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूरमध्ये टाकलेल्या सुमारे ७० धाडीत १८४ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली आहे. तसेच २.१३ कोटी रुपयांची रोख रक्कम आणि ४.३२ कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
आयकर विभागाने ७ ऑक्टोबरपासून हे धाडसत्र अवलंबिले होते. मुंबई, पुणे, बारामतीत विशेषत: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांशीसंबंधित कार्यालये, घरावर धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आयकर विभागाने शुक्रवारी (ता. १७) एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे या धाडींबाबत माहिती दिली. मुंबईतील दोन बांधकाम व्यावसायातील समूह आणि त्यांच्याशी संबंधित काही व्यक्ती आणि संस्थांच्या कार्यालयांवर छापे टाकून जप्ती कारवाई करण्यात आल्याचे आयकर विभागाने म्हटले आहे. या कारवाई मिळालेल्या पुराव्यांमधून प्रथमदर्शनी अनेक बेहिशोबी आणि बेनामी व्यवहार उघड झाले आहेत. आक्षेपार्ह कागदपत्रे, दोन समुहांचे सुमारे १८४ कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्नाचे पुरावेही सापडले आहेत, असेही आयकर विभागने म्हटले आहे.
या कारवाईत व्यावसायिक गटांनी विविध कंपन्यांचे जाळे निर्माण करून व्यवहार केल्याचे आढळून आले आहे. जे प्रथमदर्शनी संशयास्पद आहेत. निधीच्या प्रवाहाचे प्राथमिक विश्लेषण सूचित करते की बोगस शेअर प्रीमिअम, संशयास्पद मार्गाने बेहिशोबी निधी जमवण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील एका प्रभावाशाली कुटुंबाच्या सहभागातून हा निधीचा ओघ आल्याचे आढळून आले आहे. संशयास्पद पद्धतीने जमवण्यात आलेल्या या निधीचा उपयोग विविध मालमत्तांच्या अधिग्रहणासाठी केला गेला आहे. यात मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी कार्यालय इमारत, आलिशान फ्लॅट, गोव्यातील रिसॉर्ट, महाराष्ट्रातील शेत जमिनी आणि साखर कारखान्यांमध्ये गुंतवणूक यांचा समावेश आहे. या मालमत्तांचे मूल्य सुमारे १७० कोटी रुपये आहे, असे आयकर विभागाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.