सोलापूर :– शहर वाहतूक नियंत्रण विभागातील 50 पोलिसांच्या गणवेषावर आता छोटे कॅमेरे लावण्यात आले असून त्याचा फायदा पोलीस आणि वाहन चालकांना होणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त हरिष बैजल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली धाटे उपस्थित होत्या. पोलीस दलाचे आधुनिकीकरण करीत असताना अनेक नव नवीन तंत्रज्ञान वापरले जात आहेत. वाहन चालकांनी वाहन चालवताना वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजे, यासाठी स्वयंशिस्त आणि रोड रिस्पे्नट ठेवणे आवश्यक आहे. नियम मोडणाऱ्याला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते त्यातून मानसिक आणि आर्थिक त्रास होतो. जग बदलत आहे त्यानुसार पोलीस दलातही बदल होत आहेत.
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जात होती. परंतु आधुनिक पध्दतीने आता ती थेट तुमच्या बँकेच्या खात्यातूनच दंडाची रक्कम वसूल होत आहे. त्यातच वाहतूक पोलीसाने नियम मोडणाऱ्यांना अडवले तर त्या पोलीसांशी हुज्जत घालणे त्याच्या अंगावर जाणे असे प्रकार सर्रास होत असतात, त्याला आळा घालण्यासाठी आणि पोलीसांना कारवाई करताना अडथळा निर्माण होवू नये म्हणून पोलीसांच्या गणवेषावरच आता छोटे कॅमेरे लावण्यात येत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्याची सुरूवात सोलापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेत झाली आहे. 50 कॅमेरे पोलीसांच्या गणवेषावर दिसणार आहेत. हे कॅमेरे रस्त्यावरील सर्व घटना तसेच पोलीस आणि वाहन चालक यांच्यातील संवाद टिपणार आहे. पोलीस चुकीचे वागत असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे आणि वाहन चालक चुकत असेल तर त्या वाहन चालकाविरूध्द कारवाई होणार आहे.
कॅमेऱ्यामुळे कारवाई करताना पुरावा आणि पारदर्शकता राहणार आहे. त्यामुळे आता पोलीसांशी हुज्जत घालणे वाहन चालकांना महागात पडणार आहे. वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यावर कारवाई होणारच आहे. परंतु कारवाई होणार नाही याची काळजी प्रत्येक नागरीकाने घेतली पाहिजे, असेही यावेळी पोलीस आयुक्त बैजल यांनी सांगितले.
यावेळी शहर वाहतूक शाखेच्या 50 पोलीस शिपायांच्या गणवेषावर कॅमेरे बसवण्यात आले. हे सर्व 50 बॉडी ओन कॅमेरे असलेले पोलीस शहरातील विविध रस्त्यावर चौकात कारवाईसाठी सज्ज राहणार आहेत. यापुढील काळात आणखी काही पोलीसांच्या गणवेषावर कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचेही यावेळी पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली धाटे यांनी सांगितले.