सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे अन्नातून झालेल्या अज्ञात विषबाधेमुळे दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मुलींचा मृत्यू झाल्याने मरवडे गावावर शोककळा पसरली आहे. यात मंगळवेढ्यातील डेअरीचालकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
मभक्ती आबासाहेब चव्हाण (वय ६) व नम्रता आबासाहेब चव्हाण (वय ४) असे या मृत दोन चिमुकल्याची नावे आहेत. आबासाहेब चव्हाण यांनी आपल्या भक्ती व नम्रता या लाडक्या लेकींसाठी मंगळवारी (ता. २१) मंगळवेढा येथील दुकानातून खाऊ आणला होता. हा खाऊ खाल्ल्यानंतर चव्हाण कुटुंबातील सर्वांनाच अस्वस्थ वाटू लागले. उपचारासाठी मंगळवेढा व पंढरपूर येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.
उपचारादरम्यान गुरुवारी (ता. २३) पहाटे आबासाहेब चव्हाण यांची मोठी मुलगी भक्ती हिचा मृत्यू मंगळवेढा येथील खासगी दवाखान्यात झाला तर दुसरी मुलगी नम्रता हिचा मृत्यू गुरुवारी (ता. २३) मध्यरात्री पंढरपूर येथील खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान झाला.
भक्ती ही मरवडे येथील प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीत शिकत होती तर नम्रता ही बालवाडीत शिकत होती. भक्ती व नम्रता यांच्या गोड स्वभाव व हुशारीमुळे त्या सर्वांच्यात लाडक्या होत्या. भक्ती व नम्रता यांच्यावर मरवडे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यानुसार काल शनिवारी दुग्धजन्य पदार्थांतून प्रथमदर्शनी विषबाधा झाली असल्याची फिर्याद अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार दोन्ही मुलींच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संशयित आरोपी श्री समर्थ डेअरीचे चालक संतोष लहू कोंडूभैरी आणि आकाश धोंडिराम फुगारे (रा. मंगळवेढा) यांच्या विरोधात मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा .दाखल करण्यात आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
२० डिसेंबर रोजी संध्याकाळी आठच्या सुमारास श्रीखंड, बासुंदी, रबडी व पनीर हे अन्नपदार्थ घटनेतील साक्षीदार तथा मृत मुलींचे वडील आबा चव्हाण यांनी मंगळवेढ्यातील श्री समर्थ डेअरी येथून खरेदी केले होते. त्याच रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास घरातील सर्व सदस्य आबा दगडू चव्हाण (वय ३७) त्यांच्या पत्नी सुषमा आबा चव्हाण ( वय ३६) आणि वरील दोन्ही मृत मुली, वडील दगडू यालाप्पा चव्हाण (वय ७०) सर्वांनी श्रीखंड, बासुदी, रबडी खाल्ली.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी २१ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ ते – सकाळी सहाच्या दरम्यान सर्वांना उलटी, जुलाब, मळमळ, पोटदुखी हा त्रास होऊ लागला. तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात सर्वांना दाखल करण्यात आले. प्रकृती ठीक वाटल्याने संध्याकाळी चारही जणांना घरी सोडण्यात आले. पुन्हा २२ डिसेंबर रोजी उलटी, जुलाबाचा त्रास वाढल्याने दुपारी ४ वाजता त्याच डॉक्टरांकडे उपचारासाठी औषधे घेऊन घरी आले. २३ डिसेंबर रोजी पहाटे दीडच्या सुमारास मृत मुलीना जास्त त्रास वाढल्याने डॉ. पवार यांच्याकडे नेण्यात आले. त्यांनी भक्ती चव्हाण हिस अतिदक्षता विभाग असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये पाठवले. आबा चव्हाण यांनाही उपचारासाठी याच हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
एकाच कुटुंबातील दोघी बहिणींचा अन्नातील विषबाधेने मृत्यू झाल्याने मरवडेत खळबळ उडाली. या घटनेबद्दल शोक व्यक्त केला जात आहे. मृत मुलींचे वडील आबासाहेब व आई सुषमा यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत. या घटनेचा मंगळवेढा पोलिस ठाण्याकडून तपास केला जात आहे.