मुंबई : म्युझिक कंपनी सारेगामा आपल्या नव्याने रिलीज झालेले अभिनेत्री सनी लियोनीचे ‘मधुबन’ गाणे बदलणार आहे. 3 दिवसांत नवे गाणे येणार आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी इशारा दिल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
या गाण्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत, गाण्यातील कलाकारांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच सोशल मीडियावरून सनी लियोनीला अटक करा, असा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या ‘मधुबन मी राधिका नाचे’ या गाण्यावरून मध्य प्रदेशात विरोध सुरू झाला आहे. हिंदू देवतांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, असं विधान गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी केलं. तसेच सनी लिओनीला इशारा देत माफी मागण्यास सांगितले होते. त्यानंतर आता ट्विटरवर #ArrestSunnyLeone असा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. सोशल मीडियावर सनीच्या अटकेची जोरदार मागणी सुरु आहे.
या वर्षी ऑक्टोबरमध्ये नरोत्तम मिश्रा यांनी फॅशन आणि ज्वेलरी डिझायनर सब्यसाची यांच्या मंगळसूत्रावरील जाहिरातीत महिलांचे चित्रण करण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेतला होता. याच्या काही दिवसांपूर्वी त्याने एका ब्लीच कंपनीला ती जाहिरात मागे घेण्यासही सांगितले ज्यामध्ये समलिंगी जोडपे दाखवले होते. त्यांनी कंपनीला ताकीद दिल्यानंतर ती जाहिरात मागे घेण्यात आल्याचे वृत्त आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी काल रविवारी सनी लिओनला, गायकांना आणि अभिनेत्रींना इशारा दिला होता आणि त्यांना माफी मागण्यासही सांगितले. ‘सारेगामा’ने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ‘देशवासीयांच्या प्रतिक्रिया आणि भावनांचा आदर करत आम्ही ‘मधुबन’ गाण्याचे बोल आणि नाव तीन दिवसांत बदलण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील 3 दिवसात ते नवीन गाण्याने बदलले जाईल. सारेगामाने 22 डिसेंबरला मधुबन गाणे आपल्या यूट्यूब चॅनलवर रिलीज केले. या गाण्याने लोकांच्या भावना दुखावल्या आहेत, त्यामुळे या गाण्यावर बंदी घालण्यात आली होती.
नरोत्तम मिश्रा यांनी या गाण्याबाबत पत्रकाराला सांगितले होते की, ‘काही पाखंडी लोक सातत्याने हिंदूंच्या भावना दुखावत आहेत. ‘मधुबन में राधिका नाचे’ या नव्या गाण्याच्या माध्यमातून असेच पाऊल उचलण्यात आले आहे. मधुबन हे गाणे रिलीज होताच त्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. सनी लिओनीचे मधुबन हे गाणे नुकतेच रिलीज झाले होते, जे कनिका कपूर आणि अरिंदम चक्रवर्ती यांनी गायले आहे. हे गाणे रिलीज झाल्यानंतर त्यावरून बराच वाद सुरू झाला आहे. या गाण्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप सांधूसंत आणि पुरोहितांनी केला होता.
* मिळाली आपसूक प्रसिद्धी
नवीन बदललेले गाणे तीन दिवसात सोशल साईट्सवर शेअर केले जाईल,तसंच जुने गाणे हटवले जाईल असंही निर्मात्यांकडून सांगण्यात आले आहे. या गाण्याचे आधीचे शब्द आहेत ‘मधुबन मे राधिका नाचे,जैसे जंगल मे नाचे मोर’ असे होते. ते बदलण्यात येणार आहेत. खरंतर हे मूळ गाणं मोहम्मद रफी यांनी कोहिनूर सिनेमासाठी गायलंय. तर सनी लिओनवर चित्रित झालेलं गाणं कनिका कपूर आणि अरिंदम चक्रवर्ती यांनी गायलंय. आता सर्वांच लक्ष लागून राहिलंय की ‘मधुबन’ या नावाजागी आता कोणता शब्द निर्माते आणणार आणि गाणं कोणत्या नवीन स्वरुपात दिसणार आहे. मात्र या सर्व प्रकारामुळे आपसूकच प्रसिद्धी मिळाल्याचे बोलले जात आहे.