रायपूर : महात्मा गांधी यांच्यावर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या कालीचरण बाबाला अटक करण्यात आली आहे. छत्तीसगडच्या रायपूर पोलिसांनी खजुराहो येथे ही कारवाई केली आहे. कालीचरण बाबाविरोधात रायपूरसह अनेक राज्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रायपूरमधून फरार झाल्यानंतर महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि रायपूर पोलीस कालीचरण बाबाचा शोध घेत होती, असे वृत्त समोर येत आहेत.
रायपूर धर्मसंसदेत तथाकथित धार्मिक नेता बाबा कालिचरणने महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरले होते. यावरुन राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कालिचरणच्या विरोधात नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर फॅसिझमविरुध्द मैदानात उतरून लढावं लागेल, असं आव्हाडांनी ट्विट केले आहे. तसेच कालिचरणने भाषणामध्ये व्देष पसरेल अशी भाषा वापरली, असं माध्यमांशी बोलताना आव्हाड म्हणाले.
छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारने मध्य प्रदेश पोलिसांना न कळवता कालीचरण महाराजला अटक करुन आंतरराज्य नियमांचं उल्लंघन केलं आहे. मध्य प्रदेशच्या पोलीस महासंचालकांना छत्तीसगडच्या पोलीस महासंचालकांशी संवाद साधत अटकेच्या प्रक्रियेसंबंधी निषेध नोंदवण्यास सांगण्यात आलं असून स्पष्टीकरण मागण्यास सांगण्यात आलं आहे असं मध्य प्रदेश सरकारने म्हटलं आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरल्याने धर्मसंसद वादात अडकली असून यासोबतच एक नाव चर्चेत आलं ते म्हणजे कालीचरण महाराज. कालीचरण महाराजने महात्मा गांधींबद्दल अत्यंत आक्षेपार्ह उल्लेख करत शिवीगाळ केली.
#WATCH Raipur Police arrests Kalicharan Maharaj from Madhya Pradesh's Khajuraho for alleged inflammatory speech derogating Mahatma Gandhi
(Video source: Police) pic.twitter.com/xP8oaQaR7G
— ANI (@ANI) December 30, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यामुळे मोठा गदारोळ झाला आणि महाराष्ट्रासह देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले. अखेर छत्तीसगड पोलिसांनी मध्य प्रदेशातून कालीचरण महाराजला अटक केली आहे. पण हा कालिचरण महाराज नेमका आहे तरी कोण? त्याचा आणि महाराष्ट्राचा काय संबंध? हे जाणून घेऊयात.
कालीचरण महाराज हा मूळचा अकोल्याचा आहे. कालीचरण महाराजचं मूळ नाव अभिजीत धनंजय सारंग असून अकोल्यातील जुने शहर भागातील शिवाजीनगर भागातील भावसार पंच बंगल्याजवळ राहतो. त्याच्या आईचं नाव सुमित्रा तर वडिलांचं नाव धनंजय सारंग आहे.
शिक्षणाचा कंटाळा आणि त्यात खोडकर स्वभाव असल्याने आठवीपर्यंत शिक्षण घेतलं. आई-वडिलांनी प्रयत्न केले पण काही फायदा झाला नाही. अध्यात्माकडे ओढ असल्याने शाळा सोडली आणि हरिद्वारला जाऊन दिक्षा घेतली. नंतर पुढे हाच अभिजीत सारंग कालीचरण महाराज झाला.
एका मुलाखतीत बोलताना कालीचरण महाराजने सांगितलं होतं की, “मला शाळेत जाणं पसंत नव्हतं. शिक्षणात मला कोणताही रस नव्हता. जर मला जबरदस्तीने शाळेत पाठवलं तर मी आजारी पडायचे. सर्वजण माझ्यावर प्रेम करायचे त्यामुळे माझं म्हणणं ऐकायचे. माझी धर्माकडे ओढ असल्याने अध्यात्माकडे वळलो”.
कालिभक्त म्हणून त्याने कालिचरण महाराज नाव धारण केलं. आपण कालीमातेला आई तर अगस्ती ऋषींना गुरु मानत असल्याचं तो सांगू लागला. दोन वर्षांपुर्वी अकोल्यातल्या पुरातन शिवमंदीरात शिवतांडव स्तोत्र म्हटलं आणि व्हिडीओ व्हायरल झाल्याने कालीचरण महाराज प्रसिद्धीझोतात आला. 2017 मध्ये अकोला महापालिकेच्या निवडणुकीत कालीचरण महाराजला पराभवाचा सामना करावा लागला.