मुंबई : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस भरतीबाबत मोठी घोषणा केली. राज्याचे पोलीस दल अधिक बळकट करण्यासाठी ५० हजार पदांची भरती करण्यात येईल, असं ते म्हणाले. तसेच १० हजार पोलिसांची भरती करण्यात आली. आता उर्वरित ५० हजार पोलिसांची भरती करायची आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल, असं ते म्हणाले.
राज्यात पोलीस दलामध्ये मनुष्यबळ कमी आहे. कोरोना काळात पोलीस भरती करण्यात आली नाही. पोलीस दलात भरती कधी करण्यात येणार अशी विचारणा विरोधी पक्षाकडून हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत करण्यात आली होती.
महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशन मंगळवारी २८ डिसेंबर रोजी संपले आहे. राज्यातील अनेक प्रश्नांवर विरोधकांकडून राज्य सरकारला घेरण्यात आले. राज्य सरकारने पोलीस भरती करण्याचे आश्वासन दिले होते पंरतु अद्याप पूर्ण झाले नाही. अशी आठवण करुन देत पोलीस भरती कधी पूर्ण होणार असा प्रश्न विरोधी पक्षाकडून करण्यात आला होता. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तरात आगामी वर्षात लवकरच पोलीस भरती करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच पहिल्या टप्प्यात ५२०० पदावर भरती करण्यात येईल तर दुसऱ्या टप्प्यात ७ हजार पदावर पोलीस भरती करण्यात येणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यात आगामी वर्षामध्ये ५० हजार पदांवर भरती करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. या बाबतचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर यावर निर्णय घेण्यात येईल अशी माहिती सभागृहात दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या काळात ६० हजार पदावर पोलीस भरती करणार असल्याची घोषणा केली होती. त्यावेळी पहिल्या टप्प्यात १० हजार पदांवर भरती करण्यात आली आणि उर्वरित टप्प्या टप्प्यानं भरती केली होती अशीही माहिती यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
राज्य राखीव दलाच्या जवानांची १२ वर्षांची सेवा झाल्यावर त्यांना पोलीस दलात सेवा करता येणार असल्याचे गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले. १२ वर्षांचा कालावधी १० वर्षांवर आणण्याचा राज्य सरकारचा मानस होता परंतु काही तांत्रिक कारणांमुळे ते शक्य झाले नाही. तसेच जे होमगार्डमध्ये सेवा देत आहेत त्यांना वर्षात १८० दिवस काम देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
* गृहमंत्र्यांची खंत
अमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत पोलीस विभागाने मोठी कारवाई केली. मात्र एनसीबीसारखी राज्य पोलीस दलाला प्रसिद्धी मिळत नसल्याची खंत गृहमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. ऑक्टोबर २०२१ पर्यंत राज्यात ७,१८७ गुन्हे दाखल झाले असून, १५४ कोटी ४२ लाख किमतीचे ३५ हजार ७०० किलोचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. तसेच ८३३ लोकांना अटक करण्यात आली आहे. एनसीबीच्या तुलनेत अमली पदार्थाच्या विरोधातील राज्याच्या तपासात दर्जा असून काही ग्राम कारवाईवर न थांबता मोठी जप्तीची कारवाई महाराष्ट्र पोलीस दलाने केली. मात्र प्रसिद्ध एनसीबीला मिळते.