मुंबई : २०१९ मध्ये भाजप-राष्ट्रवादीने एकत्र येऊन महाराष्ट्रात सरकार स्थापन करावी, अशी इच्छा पंतप्रधानांची होती, याविषयी चर्चा झाली होती, मात्र आपण नकार दिला, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केला आहे. ‘आमची भूमिका वेगळी आहे, तुम्हाला अंधारात ठेवायचे नाही, असे मी मोदींना सांगितले होते, तरीही मोदी यांनी पुन्हा एकदा यावर विचार करावा असे म्हटले होते, असे पवारांनी एका मुलाखतीत सांगितले.
शरद पवार काल बुधवारी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. राज्यात भाजपनं आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी अशी पंतप्रधान मोदींची इच्छा होती, पण आपण त्याला नकार दिल्याची माहिती शरद पवारांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना शरद पवार म्हणाले की, मोदींनी एखादं काम करायचं ठरवल्यानंतर ते काम पूर्ण करूनच थांबतात. मोदी खूप मेहनत घेतात आणि काम पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ देतात. एकदा त्यांनी कोणतेही काम हाती घेतले की ते पूर्ण होईपर्यंत ते थांबणार नाही, याची ते काळजी घेतात. धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन आणि त्यांचे सहकारी कसे एकत्रितपणे काम करून शकतील? यावर पंतप्रधान भर देतात.
मित्रपक्षांना सोबत घेण्याची मोदींची पद्धत वेगळी आहे. ही शैली माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याकडं नव्हती. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्याविरोधात सुडाचे राजकारण कारायचं नाही, असं माझं आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचं मत होतं. तत्कालीन सरकारमध्ये मोदींशी संवाद साधणारा माझ्याशिवाय दुसरा कोणता मंत्री नव्हता, असं पवारांनी म्हटलंय.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यापूर्वी शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्रम मोदी यांच्यात भाजप-राष्ट्रवादी सत्ता स्थापनेवर चर्चा झाल्याची माहिती शरद पवारांनी दिली.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये अंतर वाढलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रात स्थिर सरकार आणण्यासाठी भाजपला राष्ट्रवादीची गरज वाटली असेल. यावेळी दिल्लीत झालेल्या भेटीत आपली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची राज्यातील परिस्थितीवर चर्चा झाली, असं शरद पवारांनी सांगितलं. तसंच, त्यावेळी भाजप आणि राष्ट्रवादीने राज्यात एकत्र यावं अशी मोदींनी इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी मी त्यांना हे शक्य होणार नाही असं सांगतिलं.
आम्हाला तुम्हाला अंधारात ठेवायचं नाही. आपली भूमिका वेगळी आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्याला अजून विचार करण्याचा सल्ला दिल्याचं शरद पवारांनी सांगितलं. विधानसभा निवडणूक युतीत लढलेल्या शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच सुरु होती. या दोन पक्षांच्या भांडणात दीड महिना कोणतंही सरकार स्थापन होऊ शकलं नव्हतं. शिवसेनेला अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री पद हवं होतं, मात्र भाजपला ते द्यायचं नव्हतं. मग अशा वेळी भाजपने राष्ट्रवादी पक्षाकडेही सत्तेसाठी चाचपणी केली. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची दिल्लीत भेट झाली होती.
२०१९ मध्ये भाजपचा राष्ट्रवादीसोबत सरकार बनवण्याचा आग्रह होता हे पवारसाहेबांनी सांगितले हे खरं आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. भाजपने सरकार बनवण्याबाबत आग्रह धरल्यानंतर पक्षातंर्गत बैठक होऊन भाजपसोबत सरकार न बनवण्याचा निर्णय झाला आणि हे पवारसाहेबांनी मोदींना संसदेच्या संयुक्त सभागृहात सांगितले त्यावेळी मी उपस्थित होतो हे सत्य आहे असेही नवाब मलिक म्हणाले. राज्यात राष्ट्रवादीसोबत सरकार बनवण्याचा भाजपचा आग्रह होता मात्र या आग्रहाला पवारसाहेबांनी स्पष्ट नकार दिला होता असेही नवाब मलिक यांनी सांगितले.