सोलापूर : जिल्हा परिषदेत आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एक आगळावेगळा कार्यक्रम सीईओ दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला होता.
जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या समोर जिल्हा परिषदेतील 101 महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हस्ते 101 रोपांचे रोपण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, स्मिता पाटील, ईशाधीन शेळकंदे, विरोधी पक्षनेते बळीराम काका साठे, जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, ॲड. सचिन देशमुख यांच्यासह जिल्हा परिषदेतील महिला कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी ज्यांच्या हस्ते रोप लावले आहे, त्यांनी दररोज कार्यालयात आल्यानंतर त्या रोपाची काळजी घ्यावी व पाणी घालून रोपांची निगा राखावी, असे आवाहन अनिरुद्ध कांबळे यांनी केले.’एक पद एक वृक्ष’ या मोहिमेत मुख्यालयात एक कार्यक्रम घेण्याचा विचार होता.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीच्या लेकींच्या शुभहस्ते 101 रोपांचे रोपण करून या उपक्रमाचा संकल्प पूर्ण केल्याचे मत सीईओ स्वामी यांनी व्यक्त केले.
तत्पूर्वी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, स्मिता पाटील व महिला कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ किरण लोहार, कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, पंडित भोसले, डी.एस. कोळी,पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे. आदी उपस्थित होते.
यावेळी एक व दोन मुली असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेच्या मुदतठेवीचे प्रातिनिधिक स्वरूपात नऊ लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका रशीदा शेख यांनी केले तर प्रास्ताविक जावेद शेख यांनी केले. याप्रसंगी रशीदा शेख यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा वेश परिधान केला होता. आभार गिरीश जाधव यांनी मानले.
● सावित्रीबाई फुले यांची आज जयंती
भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि महिला शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. आयुष्यभर समाजाच्या भल्यासाठी धडपडणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी जन्म झाला. महात्मा फुलेंच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाईंनी समाज सुधारणेचं काम केलं. त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या.