मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी रस्ते अपघातातील जीवितहानी कमी करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. कारमध्ये मागील सीटवर मध्ये बसणाऱ्या व्यक्तीसाठी थ्री पॉईंट सीट बेल्टची Three point seat belt व्यवस्था नसते. मात्र यापुढे कार निर्मिती कंपन्यांना मध्यभागी बसणाऱ्या प्रवाशासाठी थ्री पॉईंट सीट बेल्ट उपलब्ध करून द्यावा लागेल, असं गडकरी म्हणाले. तसेच यासंदर्भातील फाईलवर मी सही केली असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मोटार सुरक्षा वातावरण यावरील पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की वर्ष 2025 पर्यंत रस्ते अपघातांचे प्रमाण निम्म्यावर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. सुरक्षेची तरतूद वाढवण्याच्या दृष्टीने चार अतिरिक्त एअर बॅग आणि थ्री पॉईंट सीट बेल्ट आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
Nitin Gadkari’s big announcement to reduce casualties in road accidents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
वाहनांची सुरक्षा अधिक सुधारण्यासाठी वाहनांची मानके आणि व्यवस्था यांच्यावर आधारित तारांकित गुणानुक्रम म्हणजेच स्टार रेटिंग देण्याची पद्धत प्रस्तावित आहे,असे त्यांनी सांगितले. त्यामुळे खरेदीदाराला त्या माहितीवर आधारित निर्णय घेता येईल, असे त्यांनी नमूद केले.
कारमध्ये बसणाऱ्या सर्व प्रवाशांना थ्री पॉईंट सीट बेल्ट अनिवार्य करण्यात आले आहे. कारमध्ये मागील सीटवर मध्ये बसणाऱ्या व्यक्तींसाठी थ्री पॉईंट सीट बेल्टची व्यवस्था नसते. यापुढे कार निर्मिती कंपन्यांना मध्यभागी बसणाऱ्या प्रवाशासाठीही थ्री पॉईंट सीट बेल्ट उपलब्ध करून द्यावा लागणार असल्याचं, गडकरींनी स्पष्ट केलं आहे. दरवर्षी देशात जवळपास 5 लाख रस्ते दुर्घटना होतात. त्यात दीड लाख लोक मृत्यूमुखी पडतात. संख्या कमी करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
गडकरी यांनी इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, सुधारित इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टिम, धोकादायक मालाची वाहतूक, दिव्यांगांसाठी सुलभता, चालकाला झोप येत असल्यास लक्ष वेधणारी इशारा व्यवस्था, ब्लाइंड स्पॉट माहिती व्यवस्था, सुधारित चालक मदतनीस, लेन डिपार्चर इशारा व्यवस्था, आदींचा उल्लेख केला. आवाजाचे प्रदूषण कमी करणे आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर याच्या महत्वावर मंत्रीमहोदयांनी यावेळी भर दिला. रस्ते सुरक्षा उपाय योजनांबद्दल सामूहिक जनजागृती ही काळाची गरज असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. यासाठी माध्यमे आणि लोकसहभागातून माहितीचा प्रसार होणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.