जळगाव : महाराष्ट्रात सूर्य तळपला आहे. त्यातच एका शेतकऱ्याचा उष्माघाताने बळी गेला आहे. संजय माळी असं त्याचं नाव आहे. अमळनेर तालुक्यातील मांडळ इथं ही घटना घडली. शेतातून काम करून येत असताना उन्हाचा फटका बसला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, 1 एप्रिलपर्यंत राज्यात उष्णतेची लाट येईल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, दुपारी घराबाहेर पडणे टाळा, असं आवाहन करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मांडळ इथं ही घटना समोर आली आहे. 33 वर्षीय जितेंद्र संजय माळी असं उष्माघाताने मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. जितेंद्र माळी हा खमण विक्री करून आपला उदरनिर्वाह भागवत होता. यानुसार परिसरातील गावांमध्ये खमण विक्री करून तो दुपारी बाराच्या सुमारास घरी आला. यानंतर शेतात जाऊन त्याने काम केले.
सायंकाळी त्याला शेतात भोवळ आली. त्याचा चुलत भाऊ महेंद्र काशीनाथ माळी यांच्यासह शेतातील अन्य मजुरांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी त्याच्यावर प्रथमोपचार करून जितेंद्रला अमळनेरला घेऊन जाण्याचे सुचविले. यानुसार अमळनेरला नेत असताना तो रस्त्यात बेशुद्ध पडला. ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
Sun shines in Maharashtra, first death in Jalgaon
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा पारा 40 ते 42 अंशांवर गेला आहे. हे तापमान असंच शनिवारपर्यंत राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात उष्णतेची लाट आहे. चंद्रपुरात पारा 43 अंशांच्या पुढे गेला आहे. जळगाव जिल्हा हा उष्ण तापमानासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. सध्या सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे प्रशासनाने नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला असतांनाच अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील तरूणाचा मृत्यू झाला.
या प्रकरणी अमळनेर तालुक्यातील मारवड पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघात सदृश्य लक्षणे असल्याने जितेंद्र माळी यांचा मृत्यू झाला असं स्थानिक डॉक्टरांचे म्हणणं आहे. तर मेंदूतून रक्तस्त्राव झाल्याची अमळनेर ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर आशिष पाटील यांनी माहिती दिली. शवविच्छेदनातून जितेंद्र संजय माळी यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. पोस्टमार्टेम करणारे डॉ. आशिष पाटील यांनी त्याला उष्माघात सदृश लक्षणे होती, मेंदूत रक्तस्राव झालेला होता असे सांगितले. दरम्यान, नागरिकांनी दुपारी बाहेर पडतांना काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा पारा चांगलाच तापला असून आज सकाळपासूनच सुर्य आग ओकू लागला आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज बुधवारी देखील तापमानाचा पार 44 अंशाच्यावर येऊन पोहोचला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उष्माघात वा अन्य विकारांवर तात्काळ उपाययोजनाची अंमलबजावणी करीत आरोग्य यंत्रणेस सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आले.