● मोदी सरकारच्या खोट्या आश्वासनांची करून दिली आठवण
पंढरपूर : राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केक कापून आज एप्रिल फुल साजरा केला. पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदीची प्रतिमा लावून ‘मोदींजीच्या विकासाचा जन्मदिवस म्हणजेच एप्रिल फूल दिवस’ असे लिहून मोदी सरकारच्या खोट्या आश्वासनांची आठवण करून दिली.
1 एप्रिलचा दिवस म्हणजे केवळ मनोरंजनाचा आणि कधीही न पूर्ण होणाऱ्या आश्वासनांचा दिवस म्हणून अनेकांना परिचित आहे व अनेकांनी तो अनुभवलेला ही आहे. याचीच प्रचिती म्हणून केंद्रातील मोदी सरकारने ज्या पध्दतीने सर्वसामान्यांना कधीही पूर्ण न होणाऱ्या स्वप्नांचे गाजर दाखवले व सत्तेवर येवून बसले आणि आता वरचेवर महागाईचा भस्मासूर वाढत असताना ही मुग गिळून बसलेल्या भाजप नेत्यांना त्यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी आजच्या दिवशी हा केक कापला.
यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सचिव श्रीकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, शहराध्यक्ष स्वप्नील जगताप यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर शहरात 1 एप्रिल निमित्त केक कापून अनोख्या पध्दतीने केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करून मोदीजींच्या विकासाचा जन्मदिवस म्हणजेच एप्रिल फुल दिवस साजरा करण्यात आला व सर्वसामान्यांना भाजपने दिलेल्या निवडणुकीतील आश्वासनांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला.
Nationalist Youth Congress celebrates April Fool’s Day by cutting a cake
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
यावेळी कार्यालयीन सचिव अरुण आसबे, जिल्हा उपाध्यक्ष बापू शिंदे तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण, जिल्हा सचिव अतुल खरात, तालुका कार्याध्यक्ष बालाजी कवडे, सूरज गंगेकर,विशाल सावंत, सारंग महामुनी,यश महिंगडे, शुभम पवार, शाम पवार, विश्वजित व्यवहारे,मंगेश जाधव,अनुराग व्यवहारे,सुनील चव्हाण,विद्यार्थी संघटनेचे सागर पडगळ,प्रणव गायकवाड, राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सचिव श्रीकांत शिंदे म्हणाले की, 350 रूपये गॅस सिलेंडर असताना विद्यमान केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीआधी तत्कालीन कॉंग्रेस सरकारवर आगपाखड केली होती व देशभरातील महिलांना जणू भाजप केंद्रात सत्तेवर आल्यानंतर गॅस सिलेंडर देखील स्वस्तात उपलब्ध करून देवू अशा भूलथापा मारल्या होत्या व भाजपच्या निवडणूक रणनितीप्रमाणे खोट्या आश्वासनांना बळी पाडले होते.
मात्र आज गॅस सिलेंडर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला असून नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार 1 हजार रूपयांच्या पुढे 1 टाकीसाठी पैसे मोजावे लागणार आहेत व विशेष म्हणजे कॉंग्रेसच्या काळात येणारी गॅस सबसिडी सुमारे 200 रूपयांवरून ही थेट आता 8 रूपयांवर आलेली आहे व गॅस सिलेंडरची किंमत वाढतच चाललेली आहे. पेट्रोल 115, डिझेल 100, खाद्य तेलाच्या 1 किलो 180 व विविध वस्तूंच्या किंमती गगनाला भिडलेल्या आहेत याची जाण आता भाजप नेत्यांना राहिलेली नाही व सत्तेची धुंदी उरलेली नाही, अशा नेत्यांचा राष्ट्रवादीच्या वतीने निषेध करण्यात आला.