□ नितीन गडकरी यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल रविवारी भेट घेतली. त्यामुळे भाजप मनसे युती होणार, अशा चर्चांना उधाण आले. त्यातच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी याबद्दल माहिती दिली. ‘भाजप मनसे युतीचा सध्या कुठलाही प्रस्ताव नाही. भविष्यात काय होईल माहीत नाही’, असं त्यांनी ट्विट केलं. तसेच यावरून त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादीला डिवचलं.
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ही भेट राजकीय आहे की वैयक्तिक हे अद्याप स्पष्ट नाही. पण या भेटीने राजकीय चर्चा आता रंगू लागल्या आहेत.
नवी मुंबईतील जेएनपीटीचा कार्यक्रम आटोपून मुंबईतील निवासस्थानी परतताना गडकरी यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. आगामी मुंबई महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पूर्व नियोजित कार्यक्रम नसताना अचानक झालेल्या या भेटीने राजकीय चर्चाना सुरूवात झाली. ही सदिच्छा भेट खासगी स्वरूपाची होती, असे सूत्रांनी सांगितले. याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही राज ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. पण आगामी सर्व निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असून मनसेशी युती करणार नाही, असे भाजपने जाहीर केल्याने गडकरी-ठाकरे भेटीतून काही वेगळा अर्थ काढण्याची गरज नसल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले.
Will there be BJP-MNS alliance? Discussions abound in political circles
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात भाजपला सॉफ्ट कॉर्नर ठेवत महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. भाजपच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देत राज यांच्या भाषणाचे कौतुक केले. अशातच भाजपचे नेते गडकरी राज यांच्या मुंबईतील निवासस्थानी रात्री १० वाजेच्या सुमारास पोहोचले. यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसह इतर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता जोरदार चर्चा सुरू आहे. भाजप आणि मनसे युतीची चर्चा सुरू आहे.
राज हे नवीन घरी शिफ्ट झाले आहेत. राज यांनी गडकरी यांना भोजनाचे निमंत्रण दिले होते. यानुसार गडकरी राज यांच्याकडे पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, गडकरी आणि ठाकरे यांच्या भेटीवरून वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. पण शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेल्याने हिंदुत्वाची निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत. मराठा आरक्षण आणि अन्य मुद्द्यांवरून आमिषे दाखवून समाजात फूट पाडण्यात आली, असा घणाघात राज यांनी केला होता.
राज ठाकरे यांनी या भेटीबाबत काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र नितीन गडकरी यांनी ही भेट राजकीय नाही. गेली ३० वर्षे राज ठाकरे यांच्या कुटुंबाबरोबर आमचे घरोब्याचे संबंध आहेत. त्यांनी नवे घर बघायला बोलावले होते त्यामुळे घर बघायला आणि राज ठाकरे यांच्या मातोश्रीच्या भेटीसाठी ठाकरे यांच्या घरी गेल्याचे सांगितले. ठाकरे यांच्या घरातील गडकरी यांच्यासोबतचे फोटो प्रसिद्ध केले गेले आहेत.
शिवतीर्थावरील सभेत बोलताना राज ठाकरे यांनी आपला कुठल्याही प्रार्थनेला, धर्माला विरोध नाही पण माझ्या धर्माचा अभिमान आहे असे सांगितले होते आणि राष्ट्रावार्दी कॉंग्रेस प्रमुख शरद पवार जाती धर्मावरून समाजात फुट पाडत आले आहेत अशी टीका केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अमित शहा आणि मोदी यांनी फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील हे सांगितल्याचे चांगलेच ठाऊक होते पण निवडणूक निकालानंतर भाजप स्वबळावर सरकार बनवू शकत नाही हे लक्षात आल्यावर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला पाहिजे असा पवित्रा घेतल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता.