मुंबई : राजू शेट्टी यांचा पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडला आहे. शेट्टी यांनी कोल्हापुरात याची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राजू शेट्टी हे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार, अशी चर्चा होती. त्यावर आज शिक्कामोर्तब झाले. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसल्याने स्वाभिमानीमध्ये खदखद आहे. तसेच सहयोगी पक्षाकडूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुरेशी साथ मिळत नसल्याने शेट्टी यांनी अनेकदा नाराजी बोलून दाखवली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राजू शेट्टी महाविकास आघाडीतू बाहेर पडण्याचे संकेत दिसत होते. त्याची घोषणा अखेर मंगळवारी कोल्हापुरात झाली आहे. महाविकास आघाडी आणि आमचे सर्व संबंध संपले असे राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात जाहीर केले आहे. मी आज तुमच्या सगळ्यांच्या वतीनं जाहीर करतो आणि मविआचे आणि आमचे संबंध सगळे संपलेले आहेत. पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या बांधावर जाऊ. त्याला ही सगळी परिस्थिती सांगू. दिल्लीवाल्यांनी फसवलं, मुंबईवाल्यांनी फसवलं. आम्हाला आता आमच्या मनगटावर न्याय मिळवून द्यायचाय. आता या सरकारच्या धोरणाच्या विरोधामध्ये निराश होऊन तडफडून मरण्यापेक्षा लढता लढता मरण्याचा निर्णय घेऊया, असे आवाहन यावेळी राजू शेट्टी यांनी केले आहे. आता राजू शेट्टी यांनी एकला चलो रे ही भूमिका घेतली आहे.
हा राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय झाला आहे, काही दिवसांपूर्वीच राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीसोबत राहायचं की नाही, याचा फैसला ५ एप्रिलच्या कार्यकारिणीच्या बैठकीत करू, असे म्हणत बाहेर पडण्याचे संकेत दिले होते. राजू शेट्टी यांना विधान परिषदेवर पाठवण्यात येणार होते, मात्र राज्यपालांनी आक्षेप घेतल्याने त्या यादीतूनही त्यांचे नाव वगळण्यात आले होते. तेव्हापासून शेट्टी आणि महाविकास आघाडी यांच्यातला संघर्ष वाढला होता. महाविकास आघाडीने दिलेले वचन पाळले नाही, असा थेट आरोप राजू शेट्टी यांच्याकडून करण्यात आला होता. त्यानंतर आज यापुढे स्वाभिमानीची ‘एकला चलो रे’ची भूमिका जाहीर झाली आहे.
Swabhimani Shetkari Sanghatana out of Mahavikas Aghadi, Raju Shetty’s announcement
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
आता रोज ईडीच्या चौकशी बद्दल ऐकतोय, माझं ईडीच्या प्रमुखांना सांगणं आहे. विमा कंपन्या शेतकऱ्यांना हजारो कोटींचा चुना लावत आहेत. त्याचे पुरावे आणि तक्रारी मी केली आहे. मग याचा तपास का होत नाही? असा सवालही त्यांनी केला आहे. त्यांना २२ हजार कोटींची नफा कसा झाला? याचा आघाडीच्याही मागे मागे लागलो, याचा तपास सीबीआय का करत नाही. त्यामुळे देशभरात शेतकऱ्यांचा नवा एल्गार पाहायला मिळेल. आम्ही कधी एनडीएच्या मागे लागलो नाही. एनडीएसोबत यावं यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी विनंती केली आणि महाविकास आघाडी सोबत यावं म्हणून शरद पवारांनी विनंती केली, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
□ तुपकरांचीही घरवापसी
राजू शेट्टी यांचे खंदे समर्थक रविकांत तुपकर यांनीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रामराम ठोकला होता. मात्र, अवघ्या २० दिवसांतच त्यांनी घरवापसी केली होती. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तुपकर यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. मात्र, एकेकाळचे सहकारी आणि रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांच्याशी त्यांनी संधान बांधलं होतं. , अवघ्या २० दिवसातच तुपकर यांनी पुन्हा एकदा स्वाभिमानीचा झेंडा हाती घेतला.
□ देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानीतून हकालपट्टी
दोन आठवड्यापूर्वी म्हणजे २४ मार्च रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. तशी घोषणा राजू शेट्टी यांनी अमरावतीमधून केली होती. देवेंद्र भुयारबद्दल अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. तुम्ही शेतकऱ्यांचा घात केला असेल तर अशी घाण आमच्या संघटनेत राहू शकत नाही, असा घणाघात शेट्टी यांनी केला. आजपासून देवेंद्र भुयारचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी संबंध नाही. त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी घोषणा शेट्टी यांनी केली.