मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यानंतर आता त्यांचे पुत्र नील सोमय्या यांचाही अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला. नील सोमय्या यांच्या जामीन अर्जावर आज (मंगळवारी) सुनावणी झाली. आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या निधीत घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या पिता पुत्रांवर आहे. दरम्यान, जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यामुळे त्यांच्या अटकेची शक्यता आहे.
मुंबईतील कोर्टाने काल भाजप नेते किरीट सोमय्यांना दणका दिला होता. कोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. ‘आयएनएस विक्रांत बचाव’च्या नावाखाली गैरव्यवहार केल्याचा आरोप सोमय्या यांच्यावर आहे. दरम्यान किरीट सोमय्या सध्या नॉट रिचेबल आहेत. निरव मोदी, विजय मल्ल्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होताच ते पळून गेले होते, तसेच सोमय्याही पळालेत का ? असा सवाल काँग्रेसने केला आहे.
आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या निधीत घोटाळा केल्याचा आऱोप सोमय्या पिता- पुत्रावर आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जात आहे. किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यामुळे त्यांच्या अटकेची शक्यता आहे.
महाविकास आघाडी सरकारला स्थापन झाल्यापासून हैराण करून सोडलेल्या भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर अटकेची तलवार आहे. देशाचा अभिमान असलेल्या आयएनएस विक्रांत प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर आरोप करून एकच खळबळ उडवून दिली होती.
Second blow to Kirit Somaiya, son’s bail application rejected
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील यांनी भूमिगत होत वकिलांच्या मार्फत मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.
काल सोमवारी न्यायालयाने किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. नील सोमय्या यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. दुसरीकडे किरीट सोमय्यांच्या वकिलांनी सत्र न्यायालयाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे म्हटले आहे.
संजय राऊत यांनी विक्रांत प्रकरणात ५८ कोटी हडप करून निवडणुकीसाठी वापरल्याचा आरोप केल्यानंतर किरीट सोमय्यांनी दोन दिवसांनी दोन मिनिटांनी पत्रकार परिषद गुंडाळत केवळ ३५ मिनिटे निधी गोळा केल्याचा दावा केला होता. याव्यतिरिक्त त्यांनी कोणती माहिती दिली नव्हती. सध्या ते नॉट रिचेबल आहेत. आज त्यांच्या मुंलूड येथील घरावर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोटीस चिकटवली होती.
मानखुर्दचे माजी सैनिक बबन भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रॉम्बे पोलिसांनी 7 एप्रिल रोजी सोमय्या पिता-पुत्रासह अन्य आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणात तपास करत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी माहिती हक्कानुसार राजभवनातून मिळालेल्या उत्तराचा आधार घेत सोमय्यांवर विक्रांत युद्धनौकेसाठीचा निधी हडप केल्याचा आरोप केला आणि त्यानंतर ही तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली.
दरम्यान, आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे. दिलीप वळसे पाटील यांनी आज मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळई त्यांनी सोमय्यांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आम्ही केंद्राला विचारु की तुमची सुरक्षा असलेले लोक कुठे आहेत? आरोप करणं सोपं असतं, आरोप करायेच मग स्वत:वर आरोप झाले की मग चौकशीला सामोरे जायचं नाही. हे काही फार शुरपणाचं लक्षण नाही, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.