□ अति. जिल्हा आरोग्य अधिकार्यांकडून चौकशीचा फार्स
बार्शी : भूलतज्ज्ञाच्या अनुपस्थितीत आरोग्य कर्मचार्याने बेकायदेशीर भूल दिल्याचा प्रकार सोलापुरात घडलाय. यामुळे वैराग येथील आरोग्य केंद्रात बिनटाका कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिरातील गैरप्रकार समोर आला आहे. हा जीवघेणा प्रकार फक्त एका महिलेसोबत झाला नसून तब्बल 32 महिलासोबत झाला आहे.
पूर्व नियोजनानुसार तालुक्यातील वैराग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मंगळवारी (ता. 12) आयोजित केलेल्या कुटुंब नियोजन बिनटाका स्त्री शस्त्रक्रिया शिबिरासाठी नियुक्त करण्यात आलेले भूल तज्ञ डॉ. अशोक राठोड हे गैरहजर राहिल्यामुळे तेथील आरोग्य कर्मचार्यानेच 32 महिलांचा जीव धोक्यात घालून त्यांना बेकायदेशीररित्या भूल दिली असल्याचे उघडकीस आले आहे.
त्यातच शल्यचिकित्सक डॉ. के. एम. खारे हे तब्बल चार तास उशिराने आल्यामुळे त्यातील काही महिलांना दोनदा भूल द्यावी लागली. सुदैवाने या महिलांना काही झाले नसले तरी आयोजकांच्या बेजबाबदारपणामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. भूल तज्ञांना उपस्थित ठेवण्याची जबाबदारी शिबिर प्रमुखांची असल्यामुळे याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक ढगे आणि वैराग प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली शेळके यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
Vairag: Illegal mistake made by health worker instead of anesthesiologist
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
दरम्यान अति. जिल्हा आरोग्य अधिकारी सोनिया बगाडे यांनी आज वैराग येथे भेट देवून या गैरप्रकाराची चौकशी केली. मात्र या चौकशीस भूलतज्ञ आणि शल्यचिकित्सक हे दोघेही उपस्थित नसल्याने चौकशीचा फक्त फार्सच झाला असल्याची चर्चा होत आहे. आरोग्य विभागाच्यावतीने कुटुंब कल्याण कार्यक्रमातर्गंत वैराग प्राथमिक आरेाग्य केंद्रात मंगळवारी (12 एप्रिल) कुटुंब नियोजन बिनटाका स्त्री शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरासाठी 32 महिला सकाळी सात वाजता पोहचल्या होत्या. प्रारंभिक सूचनेनुसार त्या उपाशी पोटीच हजर झाल्या होत्या. नियोजनानुसार दुपारी 1 च्या सुमारास शस्त्रक्रिया होणे अपेक्षित होते. त्यासाठी भंडारकवठे प्राथमिक आरोग्य केंद्राचे शल्यचिकित्सक डॉ. के. एम. खारे व भूल तज्ञ यांची नियुक्ती करण्यात आली होती. 1 वाजले तरी भूल तज्ञ न आल्यामुळे केंद्रातील महिला आरोग्य कर्मचारीने शल्य चिकित्सकाने मोबाईलवर दिलेल्या सूचनेनुसार सर्व महिलांना भूल दिली.
यावेळी अर्ध्या तासात शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती महिलांच्या नातेवाईकांना देण्यात आली. मात्र दोन तास झाले तरी ते आलेच नाहीत. त्यामुळे सकाळपासून उपाशी पोटी असलेल्या महिलांच्या प्रकृतीच्या काळजीमुळे नातेवाईक चिंतीत झाले. वैरागकडे निघालेले डॉ. खारे अचानक उस्मानाबादला गेले. त्यामुळे या शिबिरास येण्यास त्यांना चार तास विलंब झाला. तरी देखील भूल तज्ञ आलेच नाहीत. स्थानिक कर्मचारीच भूल देण्याची क्रिया पार पाडत होत्या. या दरम्यान महिलांच्या काळजीने त्यांच्या नातेवाईकांच्या काळजाचे अक्षरक्ष: पाणी-पाणी झाले.
याबाबत ओरड झाल्यानंतर आज बुधवारी डॉ. बगाडे यांनी वैराग येथे येवून शिबिरातील गैरव्यवस्थापनाची चौकशी केली. मात्र यावेळी ज्यांच्याबद्दल ओरड झाली ते डॉ. खारे आणि राठोडच उपस्थित नव्हते. त्यामुळे या चौकशीचा फक्त फार्स ठरल्याचे बोलले जात आहे.