● मोहोळमध्ये नऊ कामगाराचे १२ मोबाईलची चोरी
बार्शी : अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांनी जप्त केलेला मोबाईल परत मागण्याबाबत दाखल झालेला अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला.
येथील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेवून अत्याचार केल्याप्रकरणी आदेश दत्तात्रय लुंगशे याच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात वापरण्यात आलेला मोबाईल फोन आपला असून तो परत मिळावा, अशी मागणी करणारा अर्ज प्रविण दशरथ शिंगण याने सत्र न्यायालयात केला होता.
या मोबाईलव्दारे पीडिताचे आक्षेपार्ह फोटो काढण्यात आले असल्याचे तपासात आढळून आले होते. याच फोन मध्ये पिडित आणि अरोपीमधील चॅटींग आणि संदेश देवाणघेवाणीचा डाटा आहे. त्यामुळे जप्त केलेला हा मोबाईल फोन महत्वाचा पुरावा आहे. त्यामुळे तो जसा आहे तसा ठेवणे गरजेचे आहे. तो जर परत केला तर त्यातील डाटा नष्ट केला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे मोबाईल फोन परत करता येणार नाही, असे नमूद करुन अतिरिक्त सत्र न्यायाधीश जयेंद्र जगदाळे यांनी मोबाईल मागणीचा अर्ज फेटाळला.
The court rejected the application for mobile phone confiscation by the police
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ नऊ कामगाराचे १२ मोबाईलची चोरी, यावली जवळची घटना
मोहोळ : यावली येथील हॉटेल साईराजच्या पाठीमागे असणाऱ्या कामगार कॉलनीमध्ये काम करणाऱ्या ९ कामगारांचे १२ मोबाईल चोरून नेल्याची खळबळजनक घटना दिनांक १२ एप्रिल रोजी पहाटे घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यावली परिसरामध्ये कोठारी एग्रीटेक कंपनीच्या कन्स्ट्रक्शनचे काम सुरू आहे, तेथे काँक्रिटच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करणारे निलेश समयलाल साकेत वय २४ राहणार बीडा तालुका सेमरिया मध्यप्रदेश यांचे कन्स्ट्रक्शनचे काम चालू असून त्यांच्या कन्स्ट्रक्शन कंपनी मध्ये काम करणारे कामगार दिनांक ११ रोजी काम करून कन्स्ट्रक्शन साईड वरती झोपले असता रात्री अज्ञात चोरट्यांनी प्रकाशकुमार चंदेले, इसमोहम्मद अली, देवीलाल कौल, मोहम्मद दानिश, बाबूलाल सिंग, रणजीत सिंग, वासुदेव कौल, सत्येंद्र सिंग, बाबूलाल सिंग, आशा नऊ कामगारांचे १२ मोबाईल व रोख रक्कम एकूण चोपन्न हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद निलेश साकेत यांनी दिली आहे याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करत आहेत.
■ रेड्यांच्या लावल्या टक्करी, उपरी येथील यात्रा कमिटीवर गुन्हा दाखल
पंढरपूर : यात्रेनिमित्त रेड्यांच्या टक्करीचे आयोजन करीत प्राण्यांचा छळ केल्याप्रकरणी उपरी (ता. पंढरपूर) येथील यात्रा कमिटीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पो नि धनंजय जाधव यांनी दिली.
याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे यात्रेनिमित्त रेड्यांच्या टक्करी आयोजित करीत युट्युबवर व्हिडीओ अपलोड करण्यात आले होते. हे व्हिडीओ बघून सांगली जिल्ह्यातील प्राणीमित्र जितेंद्र कोळेकर यांनी इमेलद्वारे सोलापूरचे जिल्हा पोलीस प्रमुख, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त व निवासी उपजिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार केली होती.
या इमेल तक्रार अर्जाच्या अनुषंगाने गादेगाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांना गुन्हा दाखल करण्याचे अधिकार जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी दिले होते. यानुसार गुरुवारी उपरी येथील यात्रा कमिटीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.