सोलापूर : बक्षीसाच्या नावावर पैसे उकळणा-या लाचखोर सहाय्यक विद्युत निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोलापुरात रंगेहाथ पकडले. त्याच्याकडे सोलापूर आणि कोल्हापूर अशा दोन ठिकाणी पदभार होता. मात्र तो खास लाचेची रक्कम घेण्याकरिता सोलापूर कार्यालयात आल्याची माहिती आहे.
सहाय्यक विद्युत निरीक्षक (वर्ग-२) या पदावर कार्यरत फैजूलअली मेहबूब मुल्ला (वय ५३) असे त्याचे नाव असून त्याला १५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधकाने पकडले. मुल्लाने ती लाचेची रक्कम त्याच्या स्वत:च्याच कार्यालयात स्वीकारली. त्याचवेळी त्याला पकडण्यात आले. त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. तत्पूर्वी, त्यांच्याविरुध्द विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सहाय्यक विद्युत निरीक्षक या पदावर अनेक वर्षे काम केलेल्या मुल्लाची मालमत्ताही पडताळली जाणार आहे. तत्पूर्वी, त्याच्याकडे कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्यांचा पदभार असल्याने तो काही दिवस कोल्हापूरला तर काही दिवस सोलापूर येथे ड्यूटी करायचा. तीन दिवसांच्या सुट्टीमुळे तो कोल्हापूर कार्यालयातच होता. पण, तक्रारदाराकडून लाचेची रक्कम घेण्यासाठी तो खास कोल्हापूर येथून दुपारी सोलापुरात आला होता, अशी माहिती लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
महावितरणच्या माध्यमातून विजेच्या दुरुस्तीसह अन्य कामांसाठी खासगी तत्त्वावर कंत्राटदार नेमले जातात. पण, त्यासाठी महावितरणकडून दोन परवाने घेणे आवश्यक आहे. प्रारंभी विद्युत पर्यवेक्षक म्हणून परवाना मिळाल्यानंतर काही दिवसांनी संबंधित व्यक्तीला महावितरणचा अधिकृत ठेकेदार म्हणून परवाना दिला जातो. ते दोन्ही परवाने देण्यासाठी कोल्हापूर व सोलापूर येथील दोन्ही कार्यालयांचा पदभार मुल्ला याच्याकडे आहे.
The bribe-taker came to Solapur from Kolhapur specially for bribery
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
तक्रारदाराला त्याने यापूर्वीच पहिला परवाना दिला होता. पण, त्यावेळी तक्रारदाराने त्याला काहीच रक्कम दिलेली नव्हती. त्यामुळे मुल्लाने तक्रारदाराला पूर्वीच्या कामाचे बक्षीस म्हणून दहा हजार रुपये तर नवीन परवान्याचे २२ हजार अशी एकूण ३२ हजार रुपयांची लाच मागितली. त्या लाचेतील पहिलाच हप्ता घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगेहाथ पकडले.
ही कारवाई लाचलुचपतचे पोलिस उपअधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अंमलदार शिरीषकुमार सोनवणे, श्रीराम घुगे, स्वप्निल सण्णके, प्रफुल्ल जानराव यांनी केली.
□ चोरुन वाळू उत्खनन करणारा जेसीबी जप्त
बार्शी : तालुक्यातील उपळे दुमाला गावाच्या शिवारात भोगावती नदीच्या पात्रात चोरुन उत्खनन करणारा जेसीबी जप्त करत वैराग पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. यापैकी एक आरोपी घटनास्थळावरुन पळून गेला.
याबाबत पोलिस अंमलदार धनाजी धर्मा रामगुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वैरागचे स.पो.नि. महारुद्र परजणे आपल्या सहकार्यांसमवेत रात्री हद्दीत गस्त घालत असताना त्यांना उपळे हद्दीत चोरुन वाळूचे उत्खनन होत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ते तिथे गेले असता एक जेसीबी मशीन भोगावती नदीच्या पात्रातील वाऴु उपसा करुन ट्रँक्टर ट्रॉली मध्ये भरत असल्याचे दिसले.
त्यांना पाहून दादासाहेब शाहु मते (रा-झाडी ता-बार्शी) हा पळून गेला. महादेव शिवाजी बाकले (रा. उपळे दुमाला ता. बार्शी), राम फुलसिंग पवार (रा. वेणीधरण ता. माहगाव जि. यवतमाळ) हे दोघे ताब्यात आले. त्यांच्याकडे वाळू उत्खननाचा तसेच वाहतुकीचा परवाना नव्हता. त्यामुळे त्यांच्याविरोधात भा. द. वि. कलम 379, पर्यावरण संरक्षण अधिनियम 9 व 15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी जेसीबी, ट्रॅक्टर व वाळू असा सुमारे 33 लाख 57 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.