□ दोन किलो कोळसा केला कुरियर
मोहोळ : गेल्या काही दिवसापासून राज्यभर होत असलेल्या भारनियमनामुळे विद्यार्थी व नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे कोळसा टंचाईमुळे भारनियमनची ही समस्या दूर करण्यासाठी युवा जागृती मंच यांच्या वतीने महाविकास आघाडीचे ऊर्जामंत्री यांना दोन किलो कोळसा भेट स्वरूपात मोहोळच्या तहसीलदारांकडे सुपूर्द करण्यात आला.
मोहोळ तालुका युवा जागृती मंचच्या वतीने मोहोळचे तहसीलदार प्रशांत बेडसे – पाटील यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. यामध्ये म्हटले आहे की, वीज ही मानवाची मूलभूत गरज आहे, मात्र मागील काही दिवसांपासून राज्यभर भारनियमन केले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे व नागरिकांची गैरसोय होत आहे. काही राज्यात मोफत वीज पुरवठा केला जातो. परंतु आपल्या राज्यामध्ये विजेचा मोबदला घेऊन देखील लोडशेडिंग केली जाते.
संबंधित कार्यालयात चौकशी केली असता राज्यात कोळसा टंचाईमुळे वीज निर्माण करणे अशक्य झाले असल्याचे सांगितले जाते, तरी सदर ढिसाळ नियोजनाचा नागरिक म्हणून निषेध व्यक्त करीत लोडशेडिंगची समस्या दूर करण्यासाठी दोन किलो कोळसा महाविकास आघाडीचे ऊर्जामंत्र्यांना भेट म्हणून तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
दरम्यान तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांनी निवेदनाचा स्वीकार करीत भेट दिलेला कोळसा तुम्ही स्वतः कुरियर करावा, असे म्हणत कार्यकर्त्यांना परत केला असून कुरियरद्वारे तो ऊर्जामंत्र्यांना पाठविला असल्याची माहिती युवा जागृती मंचचे संस्थापक अध्यक्ष ऍड. आकाश कापुरे यांनी दिली.
यावेळी संस्थापक अध्यक्ष आकाश कापुरे, उपाध्यक्ष संजय लोंढे, सचिव हरी सरवदे, सागर रोकडे, आकाश सरवदे, महादेव गवळी आदी उपस्थित होते.
Coal sent to energy minister from Mohol to stop load shedding
https://www.facebook.com/109399567404448/posts/527936252217442/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ भारतातील पहिल्या रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बसमधून गडकरींनी केला प्रवास
सोलापूर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी प्रिसिजन ग्रुपने विकसित केलेल्या भारतातील पहिल्या रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बसमधून आज प्रवास केला.
नितीन गडकरी यांच्या उच्च सुरक्षा ताफ्यामध्ये प्रिसिजनच्या इलेक्ट्रिक बसचा समावेश करण्यात आला. या प्रवासादरम्यान मंत्र्यांनी प्रिसिजन टीमचे अभिनंदन केले आणि प्रोत्साहनही दिले. कंपनीच्या भविष्यातील योजना ऐकल्यानंतर, ते म्हणाले की, “तुम्ही जे करत आहात त्याला “स्काय इज द लिमिट” आहे आणि सरकार भारतीय बाजारपेठेत प्रवेश करणाऱ्या नवीन इलेक्ट्रिक वाहनांना पाठबळ देईल याची खात्री दिली.
मंत्री महोदयांनी या क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाचा उल्लेख करत प्रिसिजन ग्रुपला पाठपुरावा करण्यायोग्य काही नवीन मार्गही सुचवले. प्रिसिजनने इलेक्ट्रिक बस तयार करताना ६० टक्क्याहून अधिक स्थानीय पार्ट्स वापरत केवळ १० महिन्याच्या विक्रमी अल्प कालावधीत ही बस बनविल्याबद्दल मंत्री गडकरींनी प्रिसिजन टीमचे अभिनंदन केले.
प्रिसिजन कंपनीने भविष्यात इलेक्ट्रिक एल सी व्ही च्या २० लाखाहून अधिक मोठ्या असलेल्या बाजार पेठेत प्रवेश करण्याची योजना आखली असल्याची माहिती यतिन शहा यांनी दिली. मध्यम ते कमी अंतरावरील डिलिव्हरीकरिता, कचरा वाहतुकीकरिता प्रामुख्याने या वाहनांचा वापर होतो.
इलेक्ट्रिक बसच्या या प्रवासात नितीन गडकरी , आमदार सुभाष देशमुख, प्रिसिजनचे चेअरमन यतिन शहा, कार्यकारी संचालक करण शहा तसेच प्रिसिजनची तांत्रिक टीम सोबत होती.