मोहोळ : ५० हजार लोकसंख्या आसणाऱ्या मोहोळ शहरासह तालुक्यातील १५ ते २० गावच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना असणाऱ्या सीना नदी पात्रातील पाणी गेली दोन दिवसापासून काळे झाले आहे. या दूषित पाण्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. The water in the Sina river basin has turned black, farmers are scared
मोहोळ तालुक्यातील जवळपास २० ते २५ गावांना सीना नदीपात्रातून सार्वजनिक पाणी पुरवठा केला जातो. तर दुसरीकडे ४० ते ४५ हजार लोकसंख्या असलेल्या मोहोळ शहराला ही याच सीना नदीच्या माध्यमातून आष्टे येथील बंधाऱ्यातून पाणी पुरवठा केला जातो.
आज शनिवारी (ता. 16) सायंकाळी या वाहणाऱ्या पाण्याचा रंग बदललेला असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी या संदर्भात प्रसारमाध्यमांना व प्रदूषण नियंत्रण मंडळाला माहिती दिली. तसेच त्या पाण्याचे व्हिडिओ ही टाकले होते. पाणी नेमके कशामुळे केमिकल मिसळलेल्या पाण्याप्रमाणे दिसत आहे, या पाण्यामुळे माणसाच्या किंवा जनावरांच्या जीविताला काही धोका तर निर्माण होणार नाही ना? अशा अनेक प्रश्नांनी सीना नदीकाठावरील शेतकरी, नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत.
एवढ्या मोठ्या प्रमाणात सीना नदीपात्रातील पाणी वाहत असतानाही हे रंग बदललेले पाणी आहे त्याच स्थितीत कसे राहिले आहे? का या पाण्यात एखाद्या कारखान्याची मळी किंवा केमिकल मिसळले आहे की काय? अशा प्रकारच्या चर्चेला उधाण आले आहे. या पाण्यात नेमके काय मिसळले याबाबतची माहिती घेण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी ननवरे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन माहिती घेतली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
पाणी तपासणी अहवालानंतरच नेमके या पाण्यात काय मिसळलेय, याची माहिती समोर येणार आहे. तोपर्यंत आहे त्या स्थितीतील सीना नदीच्या काळ्या पाण्याचा वापर करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. अगोदरच पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रोगराईला निमंत्रण असताना या पाण्यामुळे आणखी काही धोका होऊ नये यासाठी प्रशासनाने योग्य ती माहिती पुरवून नेमके हे पाणी कोणत्या ठिकाणापासून प्रदूषित झाले याची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
पुणे येथील प्रयोगशाळेत ते पाणी तपासणीसाठी पाठवणार आहे. आष्टे बंधारा येथे येऊन पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. पाण्याला सकृद्दर्शनी थोडासा कलर दिसत आहे, सद्यस्थितीत तरी केमिकलचा दर्प जाणवत नाही, पाणी तपासणी अहवाल आल्यानंतर नेमके पाण्याचा कलर बदलण्याचे कारण समोर येईल, असे संजय ननवरे (क्षेत्र अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ सोलापूर ) यांनी सांगितले.
सिना नदीकाठी असलेल्या साखर कारखानदारांनी मळीचे केमिकल मात्रा मोठ्या प्रमाणात असलेले पाणी सोडल्यामुळे हे पाणी दूषित झाले आहे. त्यांनी वस्तूस्थिती प्रक्रिया करून सोडणे गरजेचे असताना त्यांनी साठवून ठेवून पाऊस पडले की सोडून देतात हे सोलापूर जिल्ह्याचे मोठे दुर्दैव आहे बहुतेक कारखानदार हे लोकप्रतिनिधी आहेत दूषित पाण्यामुळे माणसांना जनावरांना व पाण्यातील जलचर प्राण्यांना ही त्रास होऊन वेगवेगळे साथीचे आजार होतात. प्रदूषण मंडळ नावाची झोपलेली यंत्रणा काहीच करू शकत नाही, प्रदूषण नियंत्रण मंडळच या प्रकारास जबाबदार असल्याचा आरोप जलतज्ञ अनिल पाटील यांनी केलाय.