□ महापालिका आयुक्तांचे आदेश !
सोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील त्या दहा वॉल्वो बसेस विका किंवा दुरुस्त करून चालवा असे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. Solapur Ordinance Commissioner sell or drive those Volvo buses from the Municipal Transport Undertaking
केंद्र शासनाच्या जे. एन. एन. यु. आर. एम. या योजनेअंतर्गत काही वर्षांपूर्वी सोलापूर महापालिकेला बसेस मिळाल्या होत्या मात्र काही बसेस चेसी क्रॅक व इतर कारणास्तव वादग्रस्त ठरल्या. त्यामुळेच या बसेस बंद अवस्थेत पडून आहेत. या बसेस धुळखात पडून आहेत. त्या बंद अवस्थेत ठेवल्याने मोठे नुकसान होत आहे.
यामध्ये 10 वॉल्वो बसेसचाही समावेश आहे. या दहा वॉल्वो बसेस विकून टाका किंवा महापालिका परिवहन उपक्रमासाठी दुरुस्त करून चालवा, असे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्तांनी महापालिका परिवहन उपक्रमाचे उपव्यवस्थापक तथा सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार यांना दिले आहेत.
या 10 वॉल्वो बसेसची नेमकी स्थिती कशी आहे ? त्याची तपासणी करावी. दुरुस्ती करून विकाव्यात किंवा शाळा, महाविद्यालय अथवा एखाद्या कंपनीला संपर्क करून चालविण्यास द्याव्यात. महापालिका परिवहन उपक्रमाकडे शक्य झाल्यास वापराव्यात, अशाही सूचना महापालिका आयुक्तांनी केल्या आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ परिवहनला दरमहा ९२ लाखांचा तोटा
महापालिकेच्या परिवहन विभागाचा दरमहा खर्च १ कोटी १७ लाख रुपये तर उत्पन्न केवळ २५ लाख रुपये आहे. यामुळे परिवहन विभागास एका महिन्याला ९२ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. हा तोटा कमी करण्यासाठी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक घेतली.
परिवहन विभागाचा खर्च कसा कमी करता येईल, याबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी खर्च १ कोटी १७ लाख तर उत्पन्न २५ लाख असल्याचे सांगण्यात आले. खर्चात वेतनासाठी ३४ लाख रुपये, डिझेलवर २० लाख, पेन्शनसाठी ५८ लाख तर किरकोळ खर्च ५ लाख रुपये आहे. उत्पन्न आणि खर्च यात अधिक तफावत असल्यामुळे परिवहन उपक्रम चालवणे महापालिकेला अवघड झाले आहे.
परिणामी या उपक्रमावर होणार खर्च कमी कसा करता येईल, याचा विचार सुरू असल्याचे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले. यावेळी परिवहन उपव्यवस्थापक श्रीराम पवार, मुख्य लेखापाल रूपाली कोळी आदी उपस्थित होते.