• सोलापूर / अजित उंब्रजकर
सध्या राष्ट्रवादी जाण्याची सुरू असलेली चर्चा, अधून मधून शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा, आता आ. जयकुमार गोरे यांनी भाजपमध्ये येण्याचे दिलेले आमंत्रण यामुळेच आणि स्वतःच शिवसेनेत गेलो ही चूक झाल्याची दिलेली कबुली, पुढील अद्याप काही ठरले नसल्याचे सांगणे यामुळे ‘इधर चला मैं उधर चला, जाने कहाँ मैं किधर चला’ या कोई मिल गया चित्रपटातील नायकाप्रमाणे सध्या माजी आमदार दिलीप माने यांची राजकीय अवस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे. ‘Idhar chala main udhar chala, jaane kahan main kadhar chala? Political status of Dilip Mane
Solapur
चारच दिवसांपूर्वी सिध्दनाथ साखर कारखान्याचा गळीत हंगाम पार पडला. या कार्यक्रमाला माने यांनी गोरे यांना आमंत्रित केले होते. मात्र, या कार्यक्रमात मात्र गोरे यांनीच माने यांना भाजपमध्ये येण्याचे आमंत्रण दिले, हे विशेष. तेव्हापासूनच पुन्हा एकदा माने यांच्या पुढील राजकीय वाटचालीबद्दल चर्चा सुरू झाली.
दिलीप माने यांनी या कार्यक्रमात आपण २०१९ मध्ये शिवसेनेमध्ये गेलो ही चूक झाल्याची कबुली दिली तसेच यापुढे आपली राजकीय वाटचाल अद्याप ठरली नसल्याचे सांगितले. माने यांच्या कारकिर्दीसाठी महत्त्वाची असलेली महापालिका निवडणूक जवळ आली आहे. तरीही त्यांचा अद्याप पक्ष ठरला नसल्यामुळे त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते मात्र माने यांच्या या वक्तव्यामुळे संभ्रमात पडले आहेत.
२००९ मध्ये माने यांनी दक्षिण तालुका मतदारसंघात काँग्रेसकडून विजय मिळवला. या पाच वर्षाच्या काळात त्यांनी तालुक्यात अनेक विकास कामे केली मात्र तरीही २०१४ मध्ये त्यांना सुभाष देशमुख यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. २०१४ पासून महाराष्ट्रसह देशात काँग्रेसची वाताहात झाली आणि मोदी लाट आली. त्यामुळे अनेक नेत्यांनी भाजप आणि त्याला पर्याय म्हणून शिवसेनेचा रस्ता धरला. त्यात माने यांनीही उडी घेतली. २०१९ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला मात्र त्यांना दक्षिण मतदार संघ सोडावा लागला. यावेळी त्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात शहरमध्यचा पर्याय निवडला.
मात्र यावेळी ते ३२ हजार मते मिळवत तिसऱ्या क्रमांकावर गेले. त्यावेळेस त्यांना मध्य मध्ये आपली डाळ शिजणार नाही, हे कळून चुकले. त्याच दरम्यान दक्षिण मतदार संघात नवख्या बाबा मिस्त्री यांनी आ. देशमुख यांच्यापुढे तगडे आव्हान निर्माण केले. त्यामुळे या मतदारसंघात जर माने असले असते तर त्यांनी विजय मिळवला असता, असे अनेकांनी बोलूनही दाखवले होते. त्यामुळेच माने यांना शिवसेनेत जाण्याचा निर्णय चुकीचा वाटल्याचे जाणवले. त्यानंतरच्या काळात ते शिवसेनेपासून अलिप्त राहिले. याच काळात त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क वाढवला. त्यामुळे माने राष्ट्रवादीमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झाली…
अनेकांनी त्यांचा पक्षप्रवेशाचा मुहूर्तही काढला होता. तशा तारखा सोशल मीडियावर जाहीरही करण्यात आल्या. राष्ट्रवादीमध्ये जाऊन दक्षिण मतदार संघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवायची अशी तयारीही त्यांनी सुरू केली होती.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मात्र जून महिन्यामध्ये अनपेक्षित प्रमाणे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळून शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार आल्यामुळे सर्वांप्रमाणेच माने यांचे राजकीय गणित उलटे फिरले. त्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे गटाच्या संपर्कात माने आहेत. त्यांना राज्यपाल नियुक्त आमदारकी मिळेल, अशा वावड्या उठू लागल्या. एकीकडे राष्ट्रवादीचा प्रवेशही रखडला असल्यामुळे पुन्हा माने काहीतरी वेगळी भूमिका का? अशी चर्चा त्यांच्या समर्थक आणि घेणार कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली.
अशातच आता सिध्दनाथ साखर कारखान्याच्या गाळपाप्रसंगी खटावचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपमध्ये येण्याचे आमंत्रण दिले. माने यांनी हे खोडून न काढता उलट २०१९ मध्ये आपण शिवसेनेत जाऊन चूक केली हे तर त्यांनी मान्य केले मात्र आपले पुढील काही ठरले नाही, असे सांगून पुढील काळातील आपल्या राजकारणाबाबत त्यांनी गूढ निर्माण करून टाकले आहे.
¤ रिस्क नाही घेणार
दिलीप माने हे जरी वेगवेगळ्या पक्षात जाणार अशी चर्चा उठत असली तरी काँग्रेसमध्ये मात्र ते पुन्हा जाणे शक्य नाही. आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली असल्यामुळे शिंदे आणि माने यांच्यात वितुष्ट आले आहे. अशा सध्या राज्यामध्ये काँग्रेसला म्हणावे तसे चांगले दिवस नाहीत. दक्षिण मधील काँग्रेसही विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ते पुन्हा काँग्रेसमध्ये जाऊन रिस्क घेण्याची शक्यता कार्यकर्त्यांना कमी वाटत आहे.
¤ तर दक्षिणमधून लढणार
दिलीप माने यांनी महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यास त्यांना आगामी विधानसभा निवडणूक दक्षिण मतदार संघातूनच लढवावी लागणार आहे. या मतदारसंघातून त्यांनी एकदा विजय मिळवलेला आहे. २०१४ मध्ये ते याच मतदारसंघातून पराभूत झाले असले तरी आता सध्या त्यांनी या मतदारसंघातील महत्त्वाच्या असलेल्या शहरी भागावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. याच भागात त्यांना मते कमी मिळतात. त्याच भागात त्यांनी आता विविध कार्यक्रम घेत आपला जनसंपर्क वाढवला आहे.
¤ मग ‘मध्य’ शिवाय पर्याय नाही
माने यांनी ऐन वेळेस शिंदे गट अथवा भाजपचा रस्ता धरल्यास त्यांना शहर मध्य मधून निवडणूक लढल्याशिवाय कुठलाही पर्याय होणार नाही. सद्यस्थिती मधून दक्षिण मतदार संघातून सुभाष देशमुख हे प्रतिनिधित्व करत आहेत. २०२४ मध्ये हा मतदारसंघ त्यांच्याकडेच जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे माने यांना शहर मध्य मध्यचाच रस्ता धरावा लागणार आहे. या मतदारसंघातून गत वेळी त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.