• आषाढीच्या शासकीय महापूजेचे बोम्मईंना निमंत्रण
• तीर्थक्षेत्र पंढरपूर बचाव समितीचा इशारा
सोलापूर : वारंवार एकाच परिसरात विकासाच्या नावाखाली रुंदीकरणाचा घाट घातला जात असेल तर तीर्थक्षेत्र पंढरपूरचा कर्नाटक राज्यात समावेश करावा अशी संतप्त मागणी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी केलीय. यामुळे वातावरण तापलंय. Abolish Pandharpur Corridor, otherwise include in Karnataka
पंढरपूर कॉरिडॉर रद्द न केल्यास पुढील वर्षी आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेस कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देणार असल्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. मात्र या मागणीला मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी कडाडून विरोध केला आहे. ज्यांना कर्नाटकात जायचे आहे त्यांनी जरूर जावे, आम्ही हा लढा लढण्यासाठी सक्षम आहोत असे त्यांनी जाहीर केले आहे.
पंढरपूर कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी तीर्थक्षेत्र पंढरपूर बचाव समितीच्या वतीने शुक्रवारी पश्चिमव्दार येथे महिला व पुरुषांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी कॉरिडॉर रद्द करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी स्थानिकांनी सकाळपासून भजन आंदोलन सुरू केले होते. विविध पक्ष, संघटनाचे पदाधिकारी यांनी आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा दर्शविला. यावेळी बोलताना बचाव समितींचे प्रवक्ते रामकृष्ण महाराज वीर यांनी, पंढरपूर कॉरिडॉरला आमचा विरोध नसून हा आराखडा मंदिर परिसरात करू नये अशी मागणी असल्याचे सांगितले.
यापूर्वी या परिसरात तीनवेळा विकासकामांसाठी व रुंदीकरणासाठी स्थानिकांची घरे ताब्यात घेतली आहेत. नव्या कॉरिडॉरमध्ये देखील अनेक प्राचीन मठ, मंदिरे बाधित होणार आहेत. यामुळे पंढरपूर कॉरिडॉर चंद्रभागेचे वाळवंट, ६५ एकर परिसर अथवा नदीवर मोठा पूल उभारून करावा अशी मागणी केली. यावेळी तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन निवेदन स्वीकारले.
या आंदोलनात बचाव समितीचे ऋषिकेश उत्पात, बडवे, भागवत बडवे, कौस्तुभ गुंडेवार, डॉ. प्राजक्ता डॉ. प्राजक्ता बेणारे, राजेंद्र वट्टमवार, गणेश लंके, श्रीकांत हरिदास, गणेश महाजन यांच्यासह युवक नेते प्रणव परिचारक, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, सतीश मुळे, माजी नगरसेवक इब्राहिम शैलेश बोहरी, अनिल अभंगराव, विक्रम शिरसट, राजू सर्वगोड, बेणारे, विवेक परदेशी, रा.पां.कटेकर, मनसेचे संतोष कवडे, गणेश पिंपळनेरकर, राहुल परचंडे, किशोर खंडागळे, हरी गोमासे आदी सहभागी झाले होते.
● भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा राजीनामे देण्याचा इशारा
महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेल्या कॉरिडॉर हा रद्द करण्यात यावा, यासाठी पंढरपुरात आंदोलन करण्यात येत आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या कॉरिडॉरसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. मात्र आमची जरी सत्ता असली तरी हा कॉरिडॉर रद्द झाला पाहिजे. झाला नाही तर शहर आणि तालुक्याचे भाजपचे पदाधिकारी राजीनामा देणार असल्याचे पंढरपूर भाजपचे अध्यक्ष विक्रम शिरसाट यांनी सांगितले.
● मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन जिल्हाधिकारी आले
दरम्यान कॉरिडॉर रद्द नाही झाल्यास पंढरपूरला कर्नाटकमध्ये सामील करा, अशी मागणी समोर आली असून या मागणीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ दखल घेऊन स्थानिकांना, व्यापाऱ्यांना, वारकरी संप्रदायाला विश्वासात घेऊनच कॉरिडॉरला मान्यता देण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तात्काळ पंढरपूरला येऊन मंदिर परिसर बचाव समितीच्या सदस्यांना भेटून मुख्यमंत्र्यांचा निरोप पोचवला आहे.
● पंढरपूर कर्नाटकला जोडण्याच्या मागणीला मनसेचा विरोध
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रस्तावित कॉरिडॉरला पहिल्यापासून विरोध दर्शविला आहे. मात्र आज झालेल्या आंदोलनादरम्यान कॉरिडॉर रद्द करा अन्यथा आम्हाला कर्नाटकाला जोडा अशी मागणी पुढे आली आहे. या मागणीला मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी कडाडून विरोध केला आहे. कॉरिडॉर रद्द करण्याची धमक आमच्यामध्ये आहे. आपण हा लढा आणखीन ताकतीने लढू या. मात्र ज्यांना कर्नाटकामध्ये जायचे आहे त्यांनी खुशाल जावे, असा इशारा मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी दिला आहे.
● विठुराया कर्नाटकाचा….
आदित्य फत्तेपूरकर यांनी, कॉरिडॉरबाबत चर्चा सुरू असताना प्रशासकीय पातळीवर मात्र याचे वेगाने काम सुरू असल्याने आमचा विश्वासघात केला जात असल्याचा आरोप केला. आमच्यावर वारंवार अन्याय होत असेल तर तीर्थक्षेत्र पंढरपूरचा समावेश कर्नाटकात राज्यात केला जावा, अशी आम्ही मागणी करू, असा इशारा दिला. विठुराया मूळचा कर्नाटकातील असून त्याचे हे गाव कर्नाटकात समाविष्ट करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. तसेच पुढील वर्षी आषाढीस कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करणार असल्याचा इशारा दिला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》सोलापूर । 26/11 दिवस : त्यागाचे प्रतीक म्हणून गावचे नाव बदलले
सोलापूर : 26/11 च्या हल्ल्यात बलिदान देणाऱ्या पोलिसाच्या नावावरून गावाला नाव देण्यात आले आहे. 2008 मध्ये मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी तातडीने एसआरपीएफ कॉन्स्टेबल राहुल शिंदे ताज हॉटेलमध्ये पोहोचले, तेव्हा दहशतवाद्यांच्या गोळीबारात ते शहीद झाले. त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून गावकऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यातील ‘सुलतानपूर’ गावाचे नाव ‘राहुल नगर’ ठेवण्याचा निर्णय घेतला असून अधिकृत घोषणा लवकरच होईल.
26/11 रोजी मुंबईत आठ ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला चढवला होता. यात विदेशी लोकांसह 166 लोक मारले गेले. तर, 300 हून अधिक जखमी झाले. मुंबई पोलिस दलातील 14 अधिकारी व कर्मचार्यांनी हौतात्म्य पत्करले. यात नऊ दशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. पोलिस अधिकारी तुकाराम ओंबाळे यांनी कसाबला जिवंत पकडून पाकिस्तानविरुद्ध सर्वात मोठा पुरावा म्हणून मिळवून दिला होता. त्यांच्यामुळेच कसाबला शिक्षा होऊ शकली.
हजार लोकसंख्या आणि 600 घरे असलेल्या सुलतानपूर गावातील लोकांनी 2008 मध्ये 26/11 च्या मुंबई हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या जवानाच्या नावावरून गावाचे नावं बदलेले आहे. गावकऱ्यांनी गावाचे नावं ‘राहुल नगर’ असे बदलले आहे. राज्य राखीव पोलीस दलातील हवालदार राहुल शिंदे यांनी 14 वर्षांपूर्वी या दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त केली होती. दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची बातमी मिळताच दक्षिण मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेलमध्ये प्रथम पोहोचलेल्या आणि प्रवेश करणाऱ्या पोलिसांमध्ये राहुल शिंदे यांचाही समावेश आहे.
दहशतवाद्यांनी राहुल शिंदे यांच्या पोटात गोळी झाडली आणि त्यांचा मृत्यू झाला. राहुल शिंदे हे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील सुलतानपूर गावचे रहिवासी होते. त्यांच्या सर्वोच्च बलिदानाबद्दल सरकारने त्यांना मरणोत्तर राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान केले. सुलतानपूरच्या रहिवाशांनी राहुल शिंदे यांच्या स्मरणार्थ गावाचे नावं बदलण्याचा निर्णय घेतला.
शिंदे कुटुंबाने 2010 मध्ये गावात राहुलच्या नावाने एक स्मारकही बांधले आहे. शहीद राहुल शिंदेचे वडील सुभाष विष्णू शिंदे यांनी 26/11 हल्ल्याच्या एक दिवस आधी सांगितले की, “गावाचे नाव बदलण्याची सर्व अधिकृत औपचारिकता पूर्ण झाली आहे. आता आम्ही अधिकृत नाव बदलण्याच्या कार्यक्रमाची वाट पाहत आहोत. आम्ही मान्यवरांकडून तारीख निश्चित होण्याची वाट पाहत आहोत आणि लवकरच ते निश्चित केले जाईल.
दहशतवादी हल्ल्याच्या वेळी मुंबईचे पोलिस उपायुक्त असलेले विश्वास नांगरे पाटील यांनी या प्रक्रियेत मला मदत केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. आपल्या मुलाच्या बलिदानाचा उल्लेख करताना ते म्हणाले की, दहशतवाद्यांशी लढताना त्याने धैर्य दाखवले आणि देशासाठी बलिदान दिले. ते म्हणाले, मला माझ्या मुलाचा अभिमान आहे.
वीर जवानाचे वडील म्हणाले, “राहुलची आई अजूनही दुःखामध्ये आहे. ती अजूनही परिस्थितीनुसार स्वत:ला सावरू शकली नाही, राहुल आता या जगात नाही हे अजूनही तिला मान्य नाही. राहुल शहीद झाल्यानंतर सरकारने आम्हाला नियमानुसार आर्थिक मदत केली. आम्हाला मुंबईत फ्लॅट आणि तालुक्यात गॅस एजन्सीही मिळाली, ज्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.
“मी गेली 10 वर्षे यावर काम करत आहे. अखेर ते घडले. मी आता समाधानी आहे आणि मला दुसरे काहीही नको आहे. हे गाव माझ्या मुलाच्या नावाने ओळखले जाईल याचा मला अभिमान वाटतो”
– सुभाष विष्णू शिंदे , शहिद पोलिसाचे वडील