सोलापूर : काँग्रेसचा स्वाभिमानाचा दिवस आहे. काँग्रेसचा झेंडा हातात घेउन निघालेली आमची मंडळी देशात पुन्हा परिवर्तन करतील यात शंका नाही. आपण आगामी काळात पक्षात कार्यरत राहणार आहोत मात्र सोलापूर लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे प्रतिपादन माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले आहे. Will work but will not contest Lok Sabha; Sushilkumar Shinde Explains Former Union Minister Politics
सुशीलकुमार शिंदे यांच्या या विधानानंतर काँग्रेस पक्षामध्ये मात्र खळबळ उडाली आहे. सलग दोन वेळा पराभव झाल्यानंतर आता सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा पुढील उमेदवार कोण याची चर्चा आता काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे.
काँग्रेस पक्षाच्या १३७ व्या स्थापना दिनानिमित्त सोलापूर शहरातील काँग्रेस भवनामध्ये ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शिंदे पुढे म्हणाले की, काँग्रेसने अनेक पराभव पाहिले आहेत, मात्र त्यातून काँग्रेस सावरली आहे.
सोनिया गांधी परदेशी असूनही त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने दोनवेळा सत्ता मिळवली. त्यामुळे पराभवाने खचून न जाता संघर्ष करत पुढे जाण्याची ही वेळ आहे. एकेकाळी सोलापूर महापालिकेत ८० नगरसेवक काँग्रेसचे होते. मात्र आज १५ नगरसेवक आहेत. आता थोडी विश्रांती घेऊ, नंतर करू असे करत दिवस ढकलले.
मात्र आता मी आजपासून कामात सक्रीय झालो आहे. कार्यकर्त्यांनीही एक – दोन पराभवाने खचून जाऊ नये. काँग्रेससाठी काळ कठिण आहे पण भविष्य उज्वल आहे म्हणून कार्यकर्त्यांनी संघर्षासाठी तयार रहावे. मी पक्षात सक्रीय असलो तरी यंदाची लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
यावेळी आ. प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी आ. प्रकाश यलगुलवार, दत्ता सुरवसे, सुरेश हसापुरे, बाबा मिस्त्री यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
¤ मी मुख्यमंत्री असताना सीमावाद सुप्रीम कोर्टात पाठवला
महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर बोलताना शिंदे म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोलतच राहणार आहेत. भाजपचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकमेकांबाबत बोलत आहेत, म्हणजे केंद्र आणि राज्य सरकार यांच्या समन्वय नाही हे सिद्ध होते. मी मुख्यमंत्री असताना सीमावाद सुप्रीम कोर्टात पाठवला, महाराष्ट्राने स्पष्ट भूमिका घ्यावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही बोलत नाहीत याचा अर्थ त्यांना आणखीन कार्यकाळ पूर्ण करायचा आहे.
¤ कार्यकर्त्यांनी संघर्षासाठी तयार रहावे
कार्यकर्त्यांनी सर्वसामान्याचे आणि काँग्रेसच्या विचारावर काम करत प्रत्येक वॉर्डमध्ये पदाधिकारी नेमावेत. काँग्रेस पक्ष घराघरात पोहोचवून बळकट करून सोलापुर महानगरपालिकेवर तिरंगा फडकवा. काँग्रेससाठी येणारा काळ कठीण असून कार्यकर्त्यांनी संघर्षासाठी तयार रहावे असे आवाहनही शिंदे यांनी केले.
¤ म्हातारा नाही मी तर जवान
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा सुरु आहे. या यात्रेत कित्येक किलोमीटर मी ही चाललो आहे. मी जरी ८२ वर्षांचा असलो तरी मी म्हातारा झालो नाही मी अजून जवान आहे. उरलेला काळ सर्वसामान्य जनतेसाठी आणि काँग्रेस पक्षासाठी काम करत काँग्रेसचा झेंडा पुढे घेऊन जाणार आहे, असेही सुशीलकुमार शिंदे म्हणाले..
¤ शिंदे नाही तर कोण ?
सुशीलकुमार शिंदे यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर आता सोलापूर लोकसभा निवडणूक कोण लढवणार याची चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे. शिंदे नसतील तर त्यांची कन्या आ. प्रणिती शिंदे यांचे नाव पुढे येत आहे तर दुसऱ्या एका राज्यातील एका मोठ्या नेत्याच्या कन्येचे नावही चर्चेले जात आहे.