सोलापूर/ बार्शी : ज्या ठिकाणी काल अग्नितांडव झाले. मोठी जीवितहानी झाली तोच फटाका कारखाना बेकायदेशीर असल्याचे समोर येतंय. फटाका कारखाना मालक युसुफ मणियार आणि साथीदार नाना पाटेकर दोघेही अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. The factory that caused the loss of life in Barshit is illegal, a case has been filed, hundreds of acres of crops have been damaged in Solapur.
शिवाय परवानगी दिलेली जागा सोडून दुसरीकडे कारखाना सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. कारखाना मालकांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मालक युसुफ मणियार आणि नाना पाटेकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. बार्शीतल्या पांगरी पोलीस ठाण्यात भादवि कलम 304, 337, 338, 285, 286, 34, भारतीय विस्फोटक अधिनियम 1884 चे कलम पाच आणि नऊ ब प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
२००७ साली युसूफ मणियार यांना कारखाना सुरु करण्यासाठी परवानगी होती. मात्र तो परवाना ज्या ठिकाणी दिला होता तिथं सोडून त्यांनी दुसरीकडेच विनापरवाना दुसरा कारखाना सुरु केला होता, अशी माहिती समोर येत आहे. ज्या ठिकाणी स्फोट झाला तिथे कारखाना चालवण्यासाठी कोणताही परवाना नव्हता, ही बाब देखील फिर्यादमध्ये नमूद केल्या आहेत.
सहाय्यक पोलीस फौजदार सतीश कोठावळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करताना फॅक्ट्रीमध्ये स्फोट झाला तिथल्या मजुरांच्या सुरक्षेची कुठलीही साधनं तिथं नसल्याचं म्हटलं आहे. शिवाय तिथले कामगार जे काम करत होते त्यांना त्या कामाबद्दल कुठलंही प्रशिक्षण देखील दिलं नव्हतं.
या स्फोटामुळे आगीचे लोण सर्वत्र पसरले असून शेकडो एकरावरील ऊस, सोयाबीन, कांदा, गहू आदी पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. या स्फोटातील फटाक्यामुळे कारखाना परिसरातील दोन किलोमीटरपर्यंतचे गवत जळून खाक होत आहे.
काल नववर्षाच्या पहिल्याच दिवसाला महाराष्ट्रात दोन भयंकर स्फोट झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरीमध्ये फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट झाला आहे. यात 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पण यात आतापर्यंत फक्त चारजणांचा शोध लागलाय नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव एमआयडीसीतील जिंदाल कंपनीतही भीषण स्फोट झाला. यात 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
बार्शीतील अग्नितांडवातील मृतांची नावे समोर आली आहेत. सुमन ऊर्फ सुमित्रा ज्ञानोबा जाधवर (वय ५६, रा. वालवड, ता. बार्शी), गंगूबाई मारुती सांगळे (वय ५०, रा. उक्कडगाव), मीनाबाई बाबासाहेब मगर (वय ५०, रा. पांगरी). मोनिका संतोष भालेराव (वय ३०, रा. वालवड) यांचा सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. कौशल्या सुखदेव बागडे (वय ३०, पांगरी) आणि शकुंतला सुहास कांबळे (वय ३०, रा. पांगरी). कौशल्या बागडे यांच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात तर शकुंतला कांबळे यांच्यावर पांगरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी चार महिला या कामालाच आल्या नव्हत्या. यासोबतच पांगरीचा बाजार असल्यानेही अनेक महिला कामाला आल्या नव्हत्या. उक्कडगावच्या अनेक महिला आलेल्या नसल्याने त्यांचे जीव वाचले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यात पाच महिला सुदैवी ठरल्या आहेत. माया अंकुश शिंदे, ज्योती महादेव भालेराव, बायडाबाई श्रीधर घोटुळे, मनिषा अनिल भालेराव, राधा ज्ञानोबा जाधवर – दराडे (सर्व रा. वालवड, ता. बार्शी) या पाच महिला सुदैवी ठरल्या. त्याही फटाक्यांच्या कारखान्यात काम ‘करत होत्या. आगी लागल्यानंतर त्यांनी स्वत:ची सुटका करून घेतली.
पांगरी-शिराळे दरम्यान असलेल्या फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटानंतर ही घटना कशी घडली, असा प्रश्न अनेकांना पडला. याबाबत प्रत्यक्षदर्शी कामगारांनी सांगितले की, फटाक्यांच्या गोडाऊनजवळ आणखी एक शेड बांधण्यासाठी जेसीबी मशीनच्या साहाय्याने खोदाई सुरू होती. त्या खोदाई दरम्यान दगडावर मशीनची बकेट आदळल्याने ठिणगी उडून हा स्फोट झाला असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. या स्फोटात जेसीबी जळून खाक झाला आहे. चालक मात्र पळून गेला आहे.
बार्शी तालुक्यातील पांगरी-शिराळे मार्गावर पांगरी गावाच्या हद्दीत असलेल्या युसुफ मणियार यांच्या शोभेच्या दारूच्या कारखान्यात मोठा स्फोट झाल्याची घटना रविवारी (ता.1) दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. स्फोट एवढा मोठा होता की, आतील एका खोलीत किती कर्मचारी अडकून मृत झाले आहेत याचा अंदाज आलेला नाही. रात्री आठ वाजले तरी कारखाना परिसरात फटक्यांचा आवाज सुरूच आहे. उस्मानाबाद सोलापूर आणि गाड्या आग विझविण्यासाठी जिल्ह्यातील सात अग्निशमन दलाच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होत्या.
बार्शी नगपालिका, उस्मानाबाद नगरपालिका, सोलापूर, इंद्रेश्वर साखर कारखाना, बबनराव शिंदे साखर कारखाना, आदी वेगवेगळ्या सात अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत होत्या, तर शहर व तालुक्यातील सुमारे १२ सरकारी आणि खासगी रुग्णवाहिका दाखल झालेल्या होत्या.
या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली. देवेंद्र फडणवीस यांनी मयत आणि जखमींना योग्य ती शासकीय मदत मिळवून देऊ, असे आश्वासन दिल्याचे आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले.
खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राजेंद्र राऊत, जिल्हा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल. पांगरीचे सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ खुणे यांच्यासह जिल्हा व तालुका प्रशासन घटनास्थळी तळ ठोकून होते. या आगीचा जिल्हा प्रशासनाकडून तपास चालू आहे. कारखान्याला परावाना होता का? त्याचे नुतनीकरण केले होते का, यांचा तपास चालू असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी माध्यामांना सांगितले.
● पालकमंत्र्यांकडून दुर्लक्ष
या घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गंभीर जखमी रूग्णांवर बार्शी व सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी इतक्या मोठ्या दुर्घटनेकडे दुर्लक्ष केले आहे. कारखाना गळित हंगामासाठी वेळ देणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांची या जीवितहानीकडे तत्परता दाखवली नाही. घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृतांना आर्थिक मदत करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले असल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.
फक्त ट्वीट करून माहिती दिली, पण पालकमंत्री विखे पाटील यांनी तत्परता दाखवून त्याच दिवशी जमले नाही तरी दुस-या दिवशी तरी बार्शीत दाखल होणे गरजेचे होते. इगतपुरी (नाशिक) दुर्घटनेत मदत जाहीर केली तरी आणखी सोलापूरच्या या अग्नितांडवाकडे आणखी लक्ष दिले नाही.