पंढरपूर – मागील दोन दिवसापासून तालुक्यातील गुरसाळे बंधाऱ्याची दार वाळू चोराने काढल्याबाबत गोंधळ निर्माण झाल्यानंतर अखेर पाटबंधारे विभागाच्या वतीने ग्रामीण पोलीस ठाण्यात बंधाऱ्याच्या 40 लोखंडी प्लेटा चोरीस गेल्याचा गुन्हा दाखल केला आहे. Pandharpur. The gates of Gursale dams were stolen; Filed a case
याप्रकरणी पाटबंधारे विभागाचे कालवा निरीक्षक श्रीकांत तोडकरी यांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये तालुक्यातील कौठाळी हद्दीतील गुरसाळे बंधाऱ्याची शनिवार 25 रोजी नेहमीप्रमाणे पाहणी करीत असताना पाणी पातळी कमी झाली असल्याचे निदर्शनास आले.
यामुळे तोडकरी यांनी पाणी अडविण्यासाठी बंधाऱ्यांमध्ये लावलेल्या लोखंडी प्लेटा तपासल्या असता 846 पैकी 40 प्लेटा नसल्याचे आढळून आले. या परिसरात त्याची पाहणी केली असता सदर प्लेटा आढळून आल्या नाहीत त्यामुळे ग्रामीण पोलीस ठाण्यात 40 लोखंडी प्लेटा चोरीस गेल्या असून 80 हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान मागील दोन ते तीन दिवसापासून गुरसाळे बंधाऱ्यातील पाणी कमी झाल्यामुळे शेतकरी व नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. दोन आठवड्यापूर्वीच सदर बंधाऱ्यात पूर्ण क्षमतेने पाणी भरले असताना देखील वाळू चोरांनी पाणी पातळी कमी व्हावी म्हणून बंधाऱ्याचे दरवाजेच काढल्याचा आरोप होत आहे.
यावरून आरोप प्रत्यारोप होत असल्यामुळे अखेर पाटबंधारे विभागाने चोरीचा गुन्हा दाखल केला. यापूर्वी देखील गुरसाळे तसेच पंढरपूर व तालुक्यातील इतर बंधाऱ्याचे दरवाजे वाळू चोरांनी काढले आहेत. मात्र याबाबत ठोस कारवाई होत नसल्यामुळे वाळू चोरांचे धाडस वाढले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● पंढरपुरात भीषण अपघात; आजीसह नातवाचा मृत्यू , तीनजण गंभीर जखमी
पंढरपूर : पंढरपुरातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात येणाऱ्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कुटुंबाला जोरदार धडक दिली. या धडकेत आजीसह नातवाचा दुर्देवी मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले.
या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातानंतर पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतलं आहे. द्रौपदा शिवाजी आटपाडकर आणि सिद्धेश्वर काळेल, अशी मृत्युमुखी पडलेल्या आजी-नातवाचं नाव आहे. या धडकेत मुलाचे वडील नामदेव काळेल आणि त्याची आई रुक्मिणी काळेल देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सांगोला येथील उपचार सुरू करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काळेल कुटुंब रोजगारासाठी मुंबई येथे जाणार होते. ते पंढरपूर – आटपाडी रोडवरील शेरेवाडीजवळ रस्त्याच्या कडेला ट्रॅव्हलसची वाट पाहत उभे होते. यावेळी समोरून एक भरधाव कार आली. काही कळण्याच्या आतच या कारने काळेल कुटुंबीयांना जोरदार धडक दिली.
हा अपघात भीषण होता, भरधाव कार थेट दुकानात घुसली. त्यामुळे दुकानाची भिंत कोसळली. या भीषण अपघातात यावेळी द्रौपदा शिवाजी आटपाडकर यांचा गाडीखाली येऊन जागीच मृत्यू झाला. तर नातू सिद्धेश्वर काळेल याच्या अंगावर दुकानाची भिंत पडल्याने तोही मृत्युमुखी पडला.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच, स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारचालकावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.