सोलापूर / अजित उंब्रजकर –
लोकसभा निवडणूक एक वर्षावर आली आहे. गेल्या तीन टर्म पासून सातत्याने चर्चेत राहिलेल्या माढा मतदारसंघात यंदाही भाजपकडून उमेदवारासाठी मोठी चुरस लागणार आहे. Will Ranjitsinh Nimbalkar get a chance in Madha again or will the courageous Mohite-Patil come? Akluj Solapur MP या मतदारसंघात सलग तिन्ही टर्मला भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार बदललेले आहेत. यंदा 2024 मध्ये मध्येही भाजप आणि राष्ट्रवादी उमेदवार बदलणार की गतवेळीच्या उमेदवारांना पसंती मिळणार याकडे संपूर्ण माढा मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. मात्र एकेकाळी राष्ट्रवादीचा दबदबा असलेल्या या मतदारसंघात आता मात्र भाजपची ताकद वाढल्याची दिसून येत आहे. भाजपकडून या मतदारसंघात विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबरोबरच जिल्ह्याचे संघटन सचिव धैर्यशील मोहिते पाटील यांचे नावही पुढे येत आहे.
2009 मध्ये मतदार संघाची पुनर्रचना झाल्यानंतर माढा मतदारसंघाची निर्मिती झाली. 2009 मध्ये राष्ट्रवादीकडून येथून स्वतः शरद पवार मैदानात उतरले तर त्यांच्या विरोधात भाजपकडून सुभाष देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली. यात अपेक्षेप्रमाणे शरद पवार विजयी झाले. त्यानंतर 2014 मध्ये राष्ट्रवादीने उमेदवार बदलून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली तर दुसरीकडे भाजपने हा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडून सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली. यावेळीही ही जागा विजयदादा यांच्या रूपाने राष्ट्रवादीने स्वतःकडे ठेवली.
गेल्या निवडणुकीत म्हणजे 2019 मध्ये राष्ट्रवादीने संजयमामा शिंदे यांना उमेदवारी दिली तर भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली. यावेळी मात्र हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून खेचून भाजपने जिंकला. गेल्या पाच वर्षाचा इतिहास पाहता या मतदारसंघात आता भाजपची ताकद वाढल्याचे दिसून येत आहे. मोहिते पाटील हे भाजपमध्ये आहेत़. या मतदारसंघात येणारा सांगोला विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील आहेत. माळशिरसमध्ये राम सातपुते आमदार आहेत.
माणमध्ये जयकुमार गोरे भाजपचे आमदार आहेत. याशिवाय आता आमदार बबनदादा शिंदेही भाजपच्या वाटेवर आहेत तसेच नारायण पाटील आणि रश्मी बागल यांचेही शिवसेनेबरोबर सख्खे वाढले आहे. हे दिग्गज नेते भाजप सेनेबरोबर असल्यामुळे यंदा या मतदारसंघात भाजपचे पारडे जड मानले जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडे करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे आणि फलटणचे आ. दीपक चव्हाण, विधान परिषदेचे आ. रामराजे निंबाळकर, उत्तम जानकर हे नेते आहेत. या नेत्यांच्या जोरावर दोन्ही पक्षाला एकमेकांविरुद्ध लढावे लागणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
भाजपकडून उमेदवाराचा विचार करता खासदार रणजितसिंह निंबाळकर हे पुन्हा एकदा प्रमुख दावेदार मानले जात आहेत. मात्र भाजपचे जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटील यांचेही नाव या मतदारसंघातून पुढे येत आहे. वास्तविक पाहता निंबाळकर हे मोहिते पाटील यांच्या ताकदीवरच निवडून आले आहेत. मोहिते पाटील यांनी जाहीर करूनच निंबाळकर यांना माळशिरस तालुक्यातून लाखांचे मताधिक्य दिले होते. सुरुवातीला निंबाळकर आणि मोहिते पाटील यांचे सख्य होते मात्र अलीकडील काळात या दोघांमध्ये शीत युद्ध सुरू झालेले आहे.
नीरा देवघर योजनेच्या निधीवरून या दोघांमध्ये श्रीवादाची लढाई सुरू आहे. दुसरीकडे विजयदादांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या पंढरपूर फलटण रेल्वे मार्ग मंजूर झाला आहे. यासाठी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी एकेकाळी आंदोलनही केले होते. मात्र आता याचे श्रेय खासदार निंबाळकर घेत आहेत. त्यामुळे मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्या समर्थकांमध्ये वाद प्रतिवाद सुरू आहेत. गेल्या वर्षी झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्येही मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्यामधील बेबनाव सर्वांसमोर आला होता. सुरुवातीला या मतदारसंघात नवख्या असलेल्या निंबाळकरांनी आता हळूहळू आपली ताकद निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. मात्र हे करताना त्यांनी मोहिते पाटील यांना वगळल्याचे दिसून येते.
अलीकडच्या काळात खासदार निंबाळकर हे निरादेवधर योजना, पंढरपूर फलटण रेल्वे मार्ग मंजूर झाल्याचे सांगत पुन्हा एकदा या मतदारसंघावर दावा करत आहेत तर दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील यांनी अधिकृतपणे या मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केली नसली तरी त्यांच्या समर्थकांकडून मात्र मोहिते पाटील यांना संधी द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
या मतदारसंघातून मोदी लाट असतानाही विजयसिंह मोहिते पाटील निवडून आले होते. या मतदारसंघात मोहिते पाटलांची मोठी ताकद आहे. शिवाय त्यांना मानणारे नेते कार्यकर्तेही आहेत. दुसरीकडे रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही आपल्या आमदारकीचा निधी माण आणि फलटण भागातच मोठ्या प्रमाणात दिला आहे. ही मोहिते- पाटील यांची पुढील रणनीती तर नाही ना अशी चर्चाही सुरू झाली आहॆ.
● मोहिते- पाटील आणि निंबाळकर प्लस आणि मायनस
दोघेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या जवळचे आहेत़. निंबाळकर हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात तर धैर्यशील मोहिते पाटील हे शांत स्वभावाचे आहेत. निंबाळकर यांचे सर्वपक्षीय नेत्यांबरोबर चांगले संबंध आहेत. याउलट मोहिते पाटील यांचे माळशिरसह विविध मतदारसंघात विरोधक मोठ्या प्रमाणात आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांचे संघटन कौशल्य उत्तम आहे हे त्यांनी वारंवार सिद्ध केले आहे. या उलट खासदार निंबाळकर यांच्याकडे संघटन कौशल्याचा सध्यातरी अभाव जाणवत आहे. मान आणि खटाव मतदारसंघात निंबाळकर यांचे प्राबल्य आहे तर उर्वरित मतदार संघात मोहिते पाटील यांची ताकद मोठ्या प्रमाणात आहे.
□ मोहिते- पाटील यांना वगळून माढा जिंकणे सध्यातरी अशक्य
माढा मतदारसंघात चार विधानसभा मतदार संघ सोलापूर जिल्ह्यातील तर माण आणि फलटण हे दोन मतदारसंघ सातारा जिल्ह्यातील आहेत़. माण आणि फलटणमध्ये निंबाळकर यांचे प्राबल्य आहे तर उर्वरित चार मतदारसंघात मोहिते पाटील यांची ताकद जास्त आहे. त्यामुळे यंदा उमेदवारी देताना मोहिते पाटील यांना विश्वासात घ्यावेच लागणार आहे. मोहिते पाटील यांना वगळून माढा जिंकणे सध्यातरी अशक्य आहे त्यामुळे भाजप या मतदारसंघात कोणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
● रणजिततसिंह यांना मंत्रीपद मिळाल्यास होणार अडचण
सध्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधीही होऊ शकतो या मंत्रिमंडळात सोलापूर जिल्ह्यातून आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे असे झाल्यास माढा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळणे कठीण जाणार आहे. एकाच घरात दोन पदे हे भाजपच्या तत्वात बसणे अवघड आहॆ.