सोलापूर : बेभरवशाचा निसर्ग आणि शेतमालाला नसलेले हमीभाव यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होत असल्याचे चित्र समोर असताना आफ्रिकेत पिकणाऱ्या काजूवर पंढरपूर तालुक्यातील ओझेवाडीच्या माळावर एका तरुण शेतकरी पुत्राने प्रक्रिया उद्योग उभारला आणि परिसरातील बेरोजगारांच्या हाताला काम देत तो लाखो रुपये मिळवत आहे. Cashew nuts from Africa are processed in Pandharpur; Cashew processing industry Solapur is giving work to the unemployed
अभय नागणे हा शेतकरी तरुण सध्या MBA चे शिक्षण घेत असून याचवेळी त्याने धाडस करत काजू प्रक्रिया उद्योग सुरु केला. आता तो रोज एक टन काजूवर प्रक्रिया करुन उच्च प्रतीचे काजू तयार करत आहे. विशेष म्हणजे त्याच्या मालाला स्थानिक बाजारातच एवढी मागणी आहे की त्याचा तयार झालेला माल बाजारात चढ्या दराने विकला जात आहे. अतिशय मध्यमवर्गीय घरातील शेतकरी तरुण घरी केवळ तीन एकर शेती अशी परिस्थिती असतानाही त्याने शिक्षण सुरु असताना शेतमालावरील प्रक्रिया उद्योगाचा अभ्यास सुरु केला.
आपल्याच शेतात छोटेखानी काजू प्रक्रिया उद्योग सुरु केला. सुरुवातीला एका खोलीत हाताने सुरु केलेला हा उद्योग आता दोन वर्षात पूर्ण अत्याधुनिक केला असून रोज एक टन एवढ्या काजूवर तो प्रक्रिया करतो. कोकणात तयार होणारा कच्चा काजू केवळ दोन महिने पुरतो आणि तो देखील चढ्या दराने त्याच भागात विकला जातो. त्यामुळे आफ्रिकन देशातील कच्चा काजू आणण्यावर लक्ष केंद्रित केले आणि कोकणापेक्षा कमी भावात चांगल्या दर्जाचा कच्चा माल अभयला आफ्रिकन देशातून मिळू लागला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
महिन्याला 30 टन एवढा कच्चा माल अभय मेंगलोर येथील बंदरातून उचलून ओझेवाडी या आपल्या गावातील शेतात आणतो. साधारण 100 ते 120 रुपयांच्या दरम्यान त्याला हा कच्चा माल मिळतो. यानंतर अभयने शेतातच उभारलेल्या शेडमध्ये त्याच्यावर प्रक्रिया केल्या जातात. सध्या राज्यात केवळ कोकण , कोल्हापूर याच भागात काजू प्रक्रिया उद्योग आहेत. आपली बाजारपेठ एवढी मोठी आहे की लाखो टन काजू आपणास आयात करावे लागतात. हेच जर आपण हा काजू आपल्याच राज्यात आणि देशात बनवल्यास कोट्यवधींची उलाढाल शेतकरी तरुण करेल असे अभयला वाटते. आपल्या भागात देखील काजू लागवड मोठ्या प्रमाणात झाल्यास आफ्रिकेतून कच्चा माल आयात करण्याची गरज पडणार नसून किमान एकरी एक लक्ष रुपयाचे शाश्वत उत्पन्न देखील शेतकऱ्यांना कच्च्या मालातून मिळेल असा विश्वास त्याने व्यक्त केला.
○ अशी होते काजूवर प्रक्रिया
आफ्रिकेतील 16 देशांमधून हा आयात केलेला कच्चा काजू सुरुवातीला ग्रेडिंग मशीनमध्ये फिरवून त्यातील माती, कचरा बाजूला केला जातो. नंतर 12.5 बार एवढ्या वाफेवर बॉयलर मध्ये हा काजू गरम केला जातो. नंतर तो 16 तासापर्यंत जमिनीवर थंड करण्यासाठी ठेवला जातो. यानंतर त्यावर सुरुवातीला कटिंग मशीनमध्ये घालून त्याच्यावरील कठीण आवरण तोडले जाते. नंतर त्याचा स्कूपिंग मशीनमध्ये घालून यातून काजू वेगळे काढले जातात. हे काजू आठ तास भाजले जातात आणि नंतर पुन्हा थंड करायला तीन तास ठेवले जातात. यानंतर पीलिंग मशिनमधून यातील उरलेला पाला आणि इतर टाकाऊ भाग काढून टाकले जातात. यानंतर तयार झालेला काजू पुन्हा दीड तास भाजल्यावर पॅकिंगसाठी तयार होतो.
● काजूचे अर्थशास्त्र
चांगल्या प्रतीचा कच्चा काजू साधारण 120 ते 125 रुपये किलो भावाने कारखान्यापर्यंत येतो. यावर संपूर्ण प्रक्रिया झाल्यावर चांगल्या प्रतीचा काजू तयार करण्यास कच्च्या मालासह एकूण 550 रुपये किलो इतका एकूण खर्च होतो. साधारण एक टन कच्च्या काजूतून 250 किलो उच्च प्रतीचा काजू विक्रीसाठी तयार होतो.
याची 650 ते 1100 रुपयापर्यंत ठोक बाजारात खरेदी होते. तर रिटेल बाजारात हा काजू 800 रुपयापासून 1300 रुपये प्रतिकिलो दराने विकला जातो. म्हणजे किलोमागे कमीतकमी 100 आणि जास्तीतजास्त 650 रुपये इतके उत्पन्न जागेवर मिळते. काजू प्रक्रिया केल्यावर साधारण 750 किलो वेस्ट साहित्याचा वापर तेल काढण्यासाठी, शेतीच्या खतासाठी केला जाते. बॉयलर इंधन म्हणून प्रति किलो 13 ते 15 रुपये दराने विकले जाते.