○ ‘रात गई; बात गई’ बोलगे ‘तो बात बनेगी’
सोलापूर : देवेंद्र फडणवीस यांचे मन मोठे आहे. ते सगळे विसरतील. जर उध्दव ठाकरे ‘रात गई बात गई’ असे बोलले तर ‘ तो बात बनेगी’. पुन्हा एकदा सर्वकाही जुळून येईल आणि अखंड हिंदुत्वासाठी पुन्हा सेना ( उध्दव ठाकरे गट ) – भाजप एकत्र येणे महाराष्ट्र हिताचे ठरेल, अशा शब्दात भाजपने नेते व उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे उध्दव ठाकरे यांना पुन्हा एकदा युतीचे आमंत्रण दिले आहे.
‘आम्ही दरवाजा बंद करत नाही, आमचा दरवाजा नेहमीच उघडा असतो’ असे सांगत भाजप ठाकरेंसोबतच्या युतीसाठी इच्छुक असल्याचे बोलून दाखवले. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा वेगळी चर्चा सुरू झाली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत संकेत दिल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी असे घडले तर त्याचे स्वागतच केले जाईल’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
स्पष्ट बोलणे टाळले असले तरी अस्पष्टपणे का होईना; चंद्रकांत पाटील यांनी भाजपमध्ये चाललेल्या हालचाली अप्रत्यक्षपणे बोलून दाखवल्या.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● शरद पवारांच्या मागे गेल्याने माती
भाजपसोबतच्या युतीसंदर्भात उद्धव ठाकरेंकडून काही संकेत मिळाले. आहेत का ? या प्रश्नाच्या उत्तरादाखल बोलताना ठाकरेंकडून काहीही संकेत आलेले नाहीत. मी जसा भाजपचा नेता आहे, तसाच एक माणूस अन् महाराष्ट्राचा नागरिक आहे.
घडणाऱ्या घटनांमुळे मी व्यथित होतो, म्हणून मी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वासाठी भाजपबरोबर यावे असे म्हणतो. माझ्या पक्षात इतके स्वातंत्र्य आहे. शरद पवारांच्या मागे गेल्याने पवारांनी अनेक नेत्यांची माती केली. तसेच ते पक्ष म्हणून उद्धव ठाकरेंची माती करतील, अशी भविष्यवाणीही यावेळी चंद्रकांत पाटलांनी केली.
○ टोकेंगे नही; लेकीन छोडेंगे भी नही
देवेंद्र फडणवीसांचे मन मोठे आहे. कोणी काहीही बोलले तर सहन करणार नाही. हम किसी को टोकेंगे नहीं, किसीने टोका तो छोडेंगे भी नहीं. आम्ही कुणालाही त्रास देत नाही. उद्धव ठाकरे रात गई, बात गई’ असे म्हणाले तर एकत्र येता येईल. मात्र, नही मेरा दरवाजा बंद है असे उद्धव ठाकरेंनी ३३ महिने केले. त्यांनी एकदाही असे म्हटलं नाही की, तू घरी ये, आपण एकत्र बसू. देवेंद्र फडणवीस असे दरवाजे बंद करणारे नाहीत, अशा शब्दात भाजपकडील बाजूही चंद्रकांत पाटील यांनी समोर आणली.
○ आम्ही स्वागत करू
चंद्रकांत पाटील यांनी यांच्या मुलाखतीनंतर मुंबईत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र आणण्यासाठी चंद्रकांत पाटील प्रयत्न करणार असतील, तर आम्ही त्याचे स्वागतच करू. ते चंद्रकांत पाटलांच्या हातून घडणारे चांगले काम असले. चांगल्या गोष्टीला आमचे समर्थन असते.