सोलापूर : पाणीपुरवठा व वीज पुरवठा या महत्त्वपूर्ण सेवा आहेत. महापालिका आणि महावितरण या दोन्हीही शासकीय संस्था असून त्या अनुषंगाने जबाबदारी सांभाळतात. त्यामुळे वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही. महापालिकेवर खापर फोडण्यापेक्षा महावितरणने वस्तूस्थिती पाहिली पाहिजे, असे स्पष्टीकरण महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी दिले. Mahavitaran should look at the facts instead of criticizing the Municipal Corporation: Municipal Commissioner Solapur water shortage
सोलापूर मनपा प्रशासन वीजपुरवठ्यातील व्यत्ययाचे कारण पुढे करुन महावितरणवर खापर फोडत आहे. मात्र महावितरणने या महापालिकेच्या अंतर्गत विस्कळीतपणासाठी महावितरण वर केलेल्या आरोपाचे खंडन करत बिघाडासाठी महावितरणला जबाबदार धरू नये, असे प्रसिद्धी पत्रक महावितरणने काढले आहे. या संदर्भात महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांना विचारले असता त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.
त्या पुढे म्हणाल्या, महावितरण कंपनीने या प्रकरणी वस्तुस्थिती पाहिली पाहिजे. किती वेळा वीज पुरवठा खंडित झाला. या संदर्भातली आकडेवारी यापूर्वी महापालिकेत झालेल्या बैठकीत सादर करण्यात आली आहे. महावितरणच्या कार्यकारी अभियंतांनीही वस्तुस्थिती मान्य केली आहे. दोन्हीही शासकीय विभाग आहेत. पाणीपुरवठा व वीजपुरवठा सुरळीत ठेवणे महत्वाची जबाबदारी आहे. विशेष म्हणजे पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीजपुरवठा महत्त्वाचा ठरतो आणि त्याच व्यत्यय झाला तर पाणीपुरवठा विस्कळीत होतो. यामुळे अखंडित वीजपुरवठा महत्त्वाचा आहे, असेही महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
दरम्यान, आढेगाव येथील पर्यायी सब स्टेशनसाठी इस्टिमेट तयार करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्याचीही कार्यवाही लवकरच होईल, असेही त्यांनी सांगितले.
○ कर्नाटकाकडून पाणी चोरीचा अहवाल जलसंपदा विभागाकडे पाठविला !
कर्नाटकाकडून औज बंधाऱ्यातील अनधिकृत पाणी चोरीचा अहवालावर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त शितल तेली – उगले, जलसंपदा विभागाचे अभियंता यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. तो अहवाल पुढे जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव यांना पाठविण्यात आला आहे. आंतरराज्य विषय असल्याने प्रधान सचिव स्तरावरच यावर पुढील कार्यवाही होणार असल्याचे महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी सांगितले.
○ स्काडा: एएमटी कंपनीच्या मुदतवाढी संदर्भात चर्चा
पाणीपुरवठा संदर्भात महत्त्वपूर्ण असलेल्या स्काडा प्रणालीचे काम संबंधित मुदत संपल्याने एएमटी कंपनीचे थांबवले आहे. या कंपनीला मुदतवाढ देण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. किती पैसे द्यायचे यासंदर्भात नियम अटी तपासून पाहण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असे महापालिका आयुक्त शितल तेली- उगले यांनी सांगितले.
○ खोदलेले रस्ते सपाटीकरणासाठी टेंडर काढले
सोलापूर शहरात विविध ठिकाणी रिलायन्स कंपनी व गॅस कंपनीकडून खोदाईचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. लोकांना याचा त्रास होत आहे. रिलायन्स कंपनीने यापूर्वीच खोदाईचे व सपाटीकरणाचे पैसे भरलेले आहेत तेव्हा आता हे खोदलेले रस्ते सपाटीकरण करण्यासाठी झोनवाईज टेंडर काढण्यात आलेले आहे. लवकरच हे खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे, असेही महापालिका आयुक्त शितल तेली -उगले यांनी सांगितले.