○ दूध पावडरच्या किंमतीचा परिणाम की दुधसंघाची मनमानी ?
सोलापूर : कोणतेही सबळ कारण नसताना जिल्ह्यातील खाजगी दुध संघानी दुधदरात १ रूपयाची कपात केली आहे. तर दुसरीकडे परराज्यातील दुधसंघानी मात्र कोणतीही दर कपात न करता शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणेच दर ठेवले आहेत. त्यामुळे खाजगी संघाच्या मनमानीला चाप लावून शेतकऱ्यांना योग्य दर द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे. A ‘stone of salt’ in increased milk prices; Dairy Solapur farmers ‘cut milk prices’ despite increase in demand
गेल्या दोन महिन्यांमध्ये सलग तीन वेळा गाई आणि म्हशीच्या दूध दरात वाढ झाली होती. प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांसाठी हे ‘अच्छे दिन’ मानले जात होते. शिवाय स्थानिक पातळीवर वाढत्या दराची अंमलबजावणी झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला होता. मात्र, अवघ्या महिन्याभरात पुन्हा दुधाचे दर घसरण्यास सुरवात झाली आहे. दुधाच्या दरात १ रुपयांनी घसरण झाली असून त्याचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर होणार आहे.
पशुखाद्याचे दर महिन्याकाठी वाढत असताना दूधाचे वाढलेले दर महिनाभर देखील टिकून राहिलेले नाहीत. दर घटण्यामागे दूध पावडरच्या दरात झालेली घट किंवा दूध पदार्थाच्या निर्यातीबाबत केंद्राची धरसोड वृत्ती हीच कारणीभूत असल्याचे दुध संघाचे मत आहे. याचा फटका मात्र, शेतकऱ्यांना बसलेला आहे. आता दुधाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी यंत्रणेकडून आवश्यक ते प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे.
● महिन्यातच १ रुपयांनी घट
दुधाच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी हा जोड व्यवसाय वाढवण्याच्या तयारीत होता. मुख्य हंगामाला दूग्ध व्यवसयाची जोड दिल्यास उत्पादन वाढणार यामध्ये शंकाच नाही. त्यामुळे दुग्ध व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न केला जात असतनााच दरात घट झाली आहे. दुधाचे दर आता ३७ रुपये लिटरहून थेट ३६ रुपयांवर आणले आहेत. तब्बल वर्षभरानंतर दुधाच्या दरात वाढ झाली होती. मात्र, वाढलेले दर महिनाभरही टिकून राहिले गेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून ऐन उन्हाळ्यात दरवाढ करणे गरजेचे असताना कपातीचे कारण काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
○ आता संबंधित यंत्रणेची भूमिका महत्वाची
दुधाचे दर अस्थिर झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शिवाय दुसरीकडे उत्पादनात घट आणि नैसर्गिक संकटाची मालिका ही सुरुच आहे. वाढलेल्या दरामुळे पुन्हा दुग्ध व्यवसाय वाढवण्याचा निर्धार शेतकरी व्यक्त करीत असताना पुन्हा दरात घसरण झाली आहे. त्यामुळे दुधाचे दर स्थिर राहण्याच्या अनुषंगाने यंत्रणेकडून आवश्यक ते प्रयत्न होणे गरजेचे आहे. एकीकडे दुधाला 50 रुपये लिटर अशी मागणी होत असताना दूध दरात झालेली घसरण चिंतेचा विषय आहे.
● दुधाचे दर कमी केल्यामुळे शेतकरीवर्गाने जगायचे तरी कसे ?
ऐन उन्हाळ्यात दुधाचे दर वाढविण्याऐवजी कमी केल्यामुळे शेतकरीवर्गाने जगायचे तरी कसे ? असा प्रश्न दुध उत्पादकातून विचारला जात आहे. कोणतेही सबळ कारण नसताना खासगी दूध संघांनी गायीच्या दूधदरात १ रुपयांनी कपात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाचा दर ३७ रुपयांवरून ३६ रुपये प्रतिलिटर झाला आहे. शेतकऱ्यांसाठी दूधदरात ही कपात झाली असली तरी दूध ग्राहकांना मात्र गाईचे दूध जुन्या वाढीव दराने विकत घ्यावे लागते. प्रचंड नफेखोरी करून मधले दलाल मालामाल तर शेतकरी कंगाल होत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
○ दूध मागणी वाढ तरीही दूधदर कपात
कोरोना ,लॉकडाउन नंतर दुधाची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यातच लंम्पी सारख्या त्वचा रोगाने हजारो पशुधन मरण पावले असताना व आरोग्याच्या दृष्टीने रोगप्रतिकारक स्वास्थ्यवर्धक म्हणून जनतेचे दुधाचा आहारात व पिण्यासाठी वापर वाढला आहे. सध्या हॉटेल व्यवसायही सुरू झाला आहे. दुधाच्या पावडरचे दर किलोमागे कमी केले असल्याचे सांगितले जाते. परंतु ते ‘जैसे थे’आहेत. खरेदीदारांच्या संघटनेने जाणूनबुजून अपप्रचार केला असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. तरीही खासगी दूध संघाच्या मालकांनी एकत्र येऊन दुधाच्या दरात १ रुपये कपात केली आहे. शेतकऱ्यांच्या दूध प्रश्नांवर सत्ताधारी तसेच विरोधी पक्ष गंभीर नाही. सरकार लक्ष देत नाही आणि विरोधी पक्ष फक्त फोटोपुरते आंदोलन करतो त्यामुळे आपली घुसमट कोणाकडे मांडावी, हाच प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
● दूध संघ राजकीय नेत्यांच्या वर्चस्वाखाली
राज्यातील सहकारी व खासगी दुधसंघ हे राजकीय नेत्यांच्या वर्चस्वाखाली आहेत. त्यामुळे
दूधउत्पादक शेतकरी व दूध ग्राहकांची लूट हा एकमेव अजेंडा ह्या लोकांचा आहे.
● पशुखाद्यदरात वाढ
पशुखाद्यदरात जवळपास ३० ते ४० टक्केपेक्षा जास्त वाढ झाली आहे. सातत्याने होत असलेली
दूधदर कपात व पशुखाद्यदरात होत असलेल्या वाढीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना बांधवावरच आत्महत्या करण्याची वेळ लुटारू व्यवस्थेने आणली आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून, शेतकरीवर्ग दूध उत्पादक बनला होता. मात्र, बाटली बंद पाण्याच्या किमतीपेक्षा कमी किमतीत गाईच्या दुधास बाजारभाव मिळत असल्याने, शेतकरीवर्ग मेटाकुटीस आला असून, गाईच्या दुधाला किमान ४० रुपये प्रतिलिटर दर मिळाला तरच हे शेतकरी दूध व्यवसायात तग धरू शकतो”.
○ नाईलाजाने दरात कपात
मागील काही दिवसापूर्वी केंद्र सरकार दुग्धजन्य पदार्थ आयात करणार असल्याची चर्चा सर्वत्र झाली होती. त्यामुळे दुध पावडर, बटर व इतर पदार्थाचे दर खरेदीदारानी कमी केले. पावडर व बटर पडून ठेवणे संघास परवडणारे नाही. शेतकऱ्यांना दुधाचे पैसे द्यावे लागणार असल्याने कमी दरात विक्री करावी लागत आहे. त्यामुळे दुधाचे दर कमी करावे लागले आहेत. केंद्र सरकारने कोणतेही पदार्थ आयात करणार नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले असले तरी खरेदीदारांनी दर कमी केले असल्याने नाईलाजाने दरात कपात करावी लागली असल्याचे मयुर जामदार (व्यवस्थापक नेचर डिलाईट डेअरी लि.कळस.) यांनी सांगितले.