● आई-वडिलांसह दहा जणांवर गुन्हा दाखल
सोलापूर : एका अठरा दिवसाच्या नवजात बाळाची तीन लाखाला विक्री करण्याची ही शहरातील पहिली घटना घडली. अशा अनेक घटना या शहरात उघडकीस येत आहेत. परंतु सदर बझार पोलीस ठाण्याच्या पथकाने या नवजात बाळ अपहरण प्रकरणाचा पर्दाफाश करत केवळ दोन दिवसात ते बाळ सुखरूप आई-वडिलांच्या ताब्यात दिले. ‘shocking’ incident in Solapur; Sale of 18-day-old newborn baby, case registered against 10 people
यात बाळाला विकल्याप्रकरणी आई-वडिलांसह, त्या बाळाला विकण्यासाठी मदत केलेल्या सर्व १० जणांवर सदर बझार पोलिस ठाण्यात अल्पवयीन न्याय कायदाअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी फिर्याद दिली आहे.
या घटनेची हकीकत अशी की, शहरातील एका गरीब कुटुंबियातील महिलेला ३० एप्रिल रोजी तिसऱ्यांदा शासकीय रुग्णालयात बाळ झाले. तो मुलगा होता. याचा फायदा घेत त्या महिलेच्या ओळखीच्या एका महिलेने ओळख काढून यापूर्वी तुला तीन मुलं आहेत. तुझी आर्थिक परिस्थिती पाहता हे चौथे बाळ सांभाळणे अशक्य आहे. शिवाय जन्मताच त्याला मेंदूचा आजार असल्याने ते आयसी होत आहे.त्यामुळे हे बाळ तू दुसऱ्या एखाद्याला दत्तक म्हणून देऊन टाक असे सांगितले.
यावर नवरा बायकोने विचार करून ते मुल दत्तक देण्यास राजी झाले.परंतु प्रत्यक्षात या प्रकरणात बाळाचा आर्थिक सौदा झाला. एजंटगिरी करणाऱ्या तीन महिलांनी त्या अभागी महिलेस फसवले.या प्रकरणात नऊ महिला व एक पुरुषाचा समावेश आहे.
हे बाळ दत्तक देण्यासाठी एकूण ३ लाखाचा सौदा झाला. तसा बॉण्ड ही करण्यात आला. परंतु प्रत्यक्षात ते पैसे त्या बाळ विकणाऱ्या अभागी महिलेच्या हातात पडले नाहीत. या प्रकरणात तीन महिलांनी या ठिकाणी एजंट म्हणून एजंटगिरी केली व त्यांनी आपआपला हिस्सा काढून घेतला व ते बाळ दुसऱ्याकडे सुपूर्त करण्यात आले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
दोन दिवसांनी या बाळाच्या मातेने त्या प्रथम महिलेकडे बाळासंदर्भात व त्याच्या आजारपणा संदर्भात चौकशी केली असता प्रथमतः त्या महिलेने काही सांगण्यास नकार दिला. बाळावर वैद्यकीय उपचार असल्याचे त्यांनी सांगितले. बाळ कोणास विकले हे दाखवा हे सांगितले. परंतु त्या महिलेने नकार दिला. त्यामुळे बाळास पैशासाठी कोणास तरी विक्री केली असावी असे खात्री झाल्याने त्या नवरा बायकोने सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केला.
सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरसागर, धायतोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल रफिक इनामदार यांनी २ दिवसात या प्रकरणाचा तपास लावून बाळ दत्तक घेण्याची कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता बेकायदेशीर रित्या सांभाळण्यास दिले. या कलमाखाली १० जणावर गुन्हा दाखल केला आहे.
प्रत्यक्षात हे बाळ नेमके कुठे आहे याची चौकशी करत असताना संबंधिताच्या घरापर्यंत गेलो असताना तेथील शेजाऱ्यांनी हे बाळ हैदराबादला घेऊन गेले आहेत. असे खोटे सांगितले, परंतु आम्ही खाक्या दाखवल्यानंतर आणि मोबाईल लोकेशन चेक केल्यानंतर ते बाळ सोलापुरातच एका महिलेकडे असल्याचे निष्पन्न झाले.
- रफिक इनामदार
पोलीस हेड कॉन्स्टेबल
》 सोलापूर रेल्वेच्या वतीने ७८ युवकांना नियुक्तीपत्रे प्रदान
सोलापूर : येथील मध्य रेल्वेच्या वतीने रोजगार मेळावा २०२३ मोहिमेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोलापूरच्या ७८ युवकांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आली.
येथील रेल्वेस्थानकामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे, अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक शैलेंद्रसिंह परिहार यांच्या हस्ते ७८ उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी मुख्य चिकित्सा अधिकारी डॉ. रामकृष्ण माने, वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी जी पी भगत, मंडल कार्मिक अधिकारी मच्छिंद्र गलवे, सहायक कार्मिक अधिकारी शेख मस्तान आणि सहायक कार्मिक अधिकारी सुधीर खोत, सहायक वाणिज्य प्रबंधक श्रीमती कल्पना बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्य कल्याण निरीक्षक अजय सावंत, महावीर नेमाणी, अक्षय गर्दने, मुख्य कार्यालय अधिक्षक ब्रम्हय्या. जी, अमित शिंदे, संजीव कुमार, नागेश नवले यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन विभागीय सहायक कार्मिक अधिकारी सुधीर खोत यांनी केले.