करमाळा, – कोलकात्यामधल्या आरजी कार मेडिकल कॉलेज रुग्णालयात डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेधार्थ देशभरात आंदोलने सुरू आहेत. या अमानुष घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन (महाराष्ट्र राज्य) द्वारे शनिवारी राज्यभर ‘ओपीडी’ सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आज इंडियन मेडिकल असोसिएशन, करमाळा शाखा, करमाळा तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन, करमाळा मेडिकोज गिल्ड या संघटनांच्या वतीने या बंदला पाठिंबा देऊन नियमित वैद्यकीय सेवा बंद ठेवून शहरातून मूक मोर्चा काढला.
याबाबत तहसील कार्यालय करमाळा आणि करमाळा पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ९ ऑगस्ट २०२४ रोजी, आरजी कार मेडिकल कॉलेज, कोलकाता येथे तरुण पोस्ट-ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिनच्या विद्यार्थीनीचा कर्तव्यावर असताना निर्दयपणे बलात्कार करुन हत्या करण्यात आली, या भीषण घटनेने वैद्यकीय समुदाय आणि देशाला धक्का बसला आहे. याच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी आधीच संप सुरू केला आहे आणि इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरात आंदोलन आणि निषेध मोर्चे आयोजित केले आहेत.
या गुन्हयाच्या तपासात कॉलेज प्रशासन आणि पोलिसांचा प्रतिसाद संशयास्पद होता आणि प्रामाणिकपणे तपास सुरू ठेवण्यास ते अवशस्वी ठरले. आर जी कार महाविद्यालय प्रशासन व पोलिस यांच्या संगनमताने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याने दि. १३ ऑगस्ट २०२४ रोजी कोलकता उच्च न्यायालयाने राज्य पोलिसांना या प्रकरणाची जबाबदारी केंद्रीय तपास यंत्रणेला (CBI) हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत.
१५ ऑगस्ट २०२४ रोजी, आरजी कार मेडिकल कॉलेजला मोठ्या जमावाने तोडफोड केली आणि आंदोलन करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांवर हल्ला केला. यावेळी जमावाने गुन्हा झालेल्या जागेचीही तोडफोड करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हा घटनाक्रम डॉक्टर, विशेषतः महिलांच्या हिंसेच्या वाढत्या धोक्याचा आणि वैद्यकीय सुविधांमध्ये सुरक्षेच्या आवश्यकतेचा संकेत देतो.
त्यामुळे या गुन्ह्यातील पीडितेच्या समर्थनार्थ आणि चालू असलेल्या हिंसाचारविरोधात करमाळ्यातील सर्व डॉक्टर संघटना १७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६ ते १८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६ पर्यंत २४ तासांच्या सेवा बंदचे आवाहन करत आहेत. या बंद दरम्यान केवळ अत्यावश्यक व आपात्कालीन सेवा सुरू राहतील पण नियमित बाह्यरुग्ण तपासणी आणि शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आल्या असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
शनिवारी सकाळी पोथरे नाका येथील महात्मा गांधी पुतळ्यापासून निघालेल्या या मूक मोर्चात शहर व तालुक्यातील सर्व डॉक्टर्स सहभागी झाले होते. शहरातील महिला डॉक्टरांची या मोर्चाला लक्षणीय उपस्थिती होती. पोथरे नाका-जय महाराष्ट्र चौक-सुभाष चौक-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक-गायकवाड चौक-महात्मा फुले चौक या मार्गाने हा मोर्चा तहसील कार्यालयात धडकला. नायब तहसीलदार माजिद काझी यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारून आंदोलनकर्त्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवणार असल्याचे सांगितले.